adhalrao patil silence about ss-ncp alliance | Sarkarnama

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील युतीबाबत आढळराव पाटलांचे मौन

भरत पचंगे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

...

शिक्रापूर : शिरुर-आंबेगावमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे हाडवैर राज्याला परिचित आहे. राष्ट्रवादी-शिवसेना राज्यात एकत्र आले तरी दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र येणार का, फिरणार का? दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नवे सरकार आपले वाटणार का, या आणि अशा अनेक किचकट प्रश्नांची उत्तरे आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला हवी आहेत.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र आपल्या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीबाबत मौन पाळणे पसंत केले. 

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबीत प्रश्नांबाबत आपण स्वत: पुढाकार घेणार आहोत. शिवसेना सत्तेत आल्यावर काय करु शकते, त्याचा प्रत्यय या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदारसंघाला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांसद आदर्शग्राम करंदी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांच्या निधीतून हनुमान मंदिर सभामंडप नुकताच पूर्ण झाला. त्याचे औपचारीक उद्घाटन आढळराव यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना श्री आढळराव यांनी सांगितले की, करंदीला चारही बाजुंनी जोडणारे रस्ते, पाणीपूरवठा योजना, दशक्रिया घाट, अंगणवाडी खोल्या, शाळा खोल्या, प्रयोगशाळा, जनावरांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व मंजूर करुन आणण्यात आपण योगदान दिल्याचे समाधान आहे. राज्यात आमचे नेते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने आता शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित कामेही आपण मंजुर करुन आणू आणि भविष्यातहे पूर्वी इतक्याच ताकदीने काम करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अरुण गिरे, अनिल काशिद, पोपट शेलार, सुधीर फराटे, उद्योगपती प्रमोद प-हाड, दादा बांदल, शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार, माजी उपसरपंच चेतन दरेकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष रमेश नप्ते, शिवाजी दरेकर, सुहास ढोकले, संजय दरेकर, राजाभाऊ ढोकले, उपसरपंच विशाल खरपुडे, मोहन दरेकर, नितीन दरेकर, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.  
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख