Adhalrao is misleading public on Maratha reservation : Dilip Walse Patil | Sarkarnama

आढळरावांनी मराठा आरक्षणाबाबत  जनतेची दिशाभुल करु नये :  दिलीप वळसे पाटील 

सुदाम बिडकर
शनिवार, 1 डिसेंबर 2018

" मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना अनुसुचीत जाती व जमाती , इतरमागास प्रवगार्तील विद्यार्थांना उच्च व्यावयायिक शिक्षणातील फीसच्या प्रतिपूर्ती  देण्याचा निर्णय घेतला होता . त्यावेळी  मराठा समाजाबरोबरच खुल्याप्रवर्गातील इतर समाजातील विद्यार्थांनाही  फीसची 50 टक्के रक्कम परतीचा क्रांतीकारी निर्णय घेतला होता.

-दिलीप वळसे पाटील 

पारगाव, (पुणे) : "आढळरावांनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची माहीती पसरवून  जनतेची दिशाभुल करु नये . राष्ट्रवादी कॉग्रेसने नेहमी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याची भुमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला तर सुरुवातीपासुनच पाठींबा दिला आहे ,"असे प्रत्त्युत्तर  माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आज शनिवारी दिले.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेची चुकीची माहीती पसरवून दिशाभुल करण्याचा प्रयाण चालवला आहे , असे सांगून श्री. वळसे पाटील  पुढे म्हणाले ,"मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मांडले असताना त्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्षाच्या वतीने मागणी केली की आरक्षणा संदर्भातील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा . परंतु  तो मांडला गेला नाही.  थेट आरक्षणाचे विधेयकच मांडले .  माझा आग्रह हे आरक्षण न्यायालयातही टिकावे यासाठी ते निर्दोष असावे असा होता .  विधेयकामध्ये  कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत , त्याला आव्हान देता येणार नाही न्यायालयात हा विषय गेल्यानंतर धोका पोचणार नाही, हे तपासुन पाहावे यासाठी मी आग्रही होतो . "

ते पुढे म्हणाले ," समाजाला मिळालेले आरक्षण खुप कष्टातुन मिळाले आहे. हे आरक्षण मिळत असताना सरकार बरोबर झालेल्या चर्चेच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मला सहभागी होता आले होते. अंतीम निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी या राज्यामध्ये 58 मोर्चे निघाले 42 जणांचे मृत्यु झाले .मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर  सभागृहात  जवळपास आठ दिवस विरोधी पक्षाच्या वतीने सभागृह बंद पाडण्यात आले.  त्याच्यानंतर सरकारने निर्णय घेतला."  

सभागृहात विधेयक आमच्यासह सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केले असे ठासून सांगत श्री. वळसे पाटील म्हणाले,"सभागृहामध्ये विधेयक मंजुर करण्यापुर्वी विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक झाली.  त्यामध्ये विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , माजी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबऴ, गणपत देशमुख, मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचेही काही नेते व मी स्वतः  उपस्थित  होतो .  त्यानंतर सभागृहात  एकमताने विधेयक मंजुर करण्याचा निर्णय झाला . त्यामुळे विनाकारण निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी लाभ मिळेल या हेतुने काही तरी चुकीची माहीती पसरविण्याचे काम खासदारांनी करु नये."

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख