`आढळराव पुरावा देऊ शकले नाहीत`

`आढळराव पुरावा देऊ शकले नाहीत`

नारायणगाव : पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षप्रमुखांनी हकालपट्टी केल्याचे आढळराव पाटील सांगत आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा पुरावा द्या मी पाहिजे ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. मात्र आढळराव पाटील पुरावा देवू शकले नाहीत. आरोप सिद्ध न करताच कारवाई केली जाते. पक्ष संघटनेचे मी वीस वर्षे प्रामाणिकपणे काम करत असताना पक्षाकडे उमेदवारी मागणे माझा गुन्हा आहे काय? असा प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित केला

निष्ठावान शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी मी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारच, अशी घोषणा या वेळी बुचके यांनी केली.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या बुचके यांची शिवसेना पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली. आपली भूमिका विशद करण्यासाठी येथील जयहिंद पॅलेस सभागृहात आज दुपारी काही कार्यकर्त्यांशी बुचके यांनी संवाद साधला. या निमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत बुचके भावनाविवश होऊन बोलत होत्या.

या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे, उपतालुका प्रमुख संतोष खैरे, माजी सभापती संगीता वाघ, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, बाजार समितीच्या संचालिका सुरेखा गांजाळे, महेंद्र सदाकाळ, एकनाथ शेटे, अशोक पाटे, पंडित मेमाणे, संगीता खैरे, सरपंच अर्चना औटी, कैलास मनसुख, आशिष माळवदकर आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बुचके यांना पाठिंबा दिला. बुचके यांच्या हाकलपट्टीला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरद सोनवणे हेच जबाबदार असल्याचा आरोप या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

``आढळराव पाटील पराभूत झाले त्यांचे पुनर्वसन केले जाते. मी दोन वेळा पराभूत झाले. माझ्या पुनर्वसनासाठी आग्रह का धरला नाही? पक्षप्रमुखांना चुकीची माहीती देवून दिशाभूल केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली. या पुढे कार्यकर्तेच माझे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अन्याय सहन न करण्याची शिकवण आम्हा शिवसैनिकांना दिली आहे. माझी मायबाप जनताच मला न्याय देईल,``असे बुचके यांनी सांगितले. 

सोनवणे यांना उमेदवारी देण्याची भूमिका असल्याने मातोश्रीवर चुकीची माहीती देवून बुचके यांची हकालपट्टी करण्यास आढळराव पाटील यांनी कट रचला, अशी टीका या वेळी बाळासाहेब पाटे, संतोष खैरे यांनी केली.

`खंडागळे यांना उमेदवारी द्यावी`

आमदार सोनवणे यांनी मागील साडेचार वर्ष शिवसेना विरोधी भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पालिका निवडणुकीत काही शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. असे असताना निष्ठावान शिवसैनिकांना डावलून आमदार सोनवणे यांना उमेदवारी बहाल केली जाते. सोनवणे यांच्याऐवजी तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी,अशी मागणी या वेळी महेंद्र सदाकाळ यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com