'शिरुर'मध्ये थापाड्या-सोंगाड्यांच्या उपमांमुळे शिवसेना-राष्ट्रवादीत बेबनाव कायम...!

पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या निवीदा उघडण्यावरुन शिरुरच्या दोन आजी-माजी खासदारांच्या समर्थकांकडून थापाड्या-सोंगाड्या नाट्य सध्या सोशल मिडियावर चांगलेच रंगले आहे
Shivajirao Adhalrao and Amol Kolhe Supporters Taunting Each other on Social Media
Shivajirao Adhalrao and Amol Kolhe Supporters Taunting Each other on Social Media

शिक्रापूर  : पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्याच्या निवीदा उघडण्यावरुन शिरुरच्या दोन आजी-माजी खासदारांच्या समर्थकांकडून थापाड्या-सोंगाड्या नाट्य सध्या सोशल मिडियावर चांगलेच रंगलेय. मंजुर कामाच्या टेंडरचे श्रेय घेण्यासाठी दोघे सरसावल्याने दोन्ही बाजुंच्या समर्थकांनी दोघांच्याही वृत्तपत्रिय बातम्यांना पुढे करुन थापाड्या-सोंगाड्या संबोधल्याने राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीतील ’शिरुर-बेबनाव’ अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.

खासदारकीची हॅट्रीक केलेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या कामकाजात बिल्कूल बदल केलेला नसून गेली १६ वर्षे त्यांचा लांडेवाडीतील 'जनता-दरबार' हे त्याचेच द्योतक आहे. अर्थात मतदार संघातील प्रत्येक प्रश्नाबाबत पुढे होवून, प्रत्येक गावांमधील स्थानिक राजकारणाकडे लक्ष ठेवून आवश्यक त्या कार्यक्रमांची आणि राजकीय टोलेबाजीची एकही संधी ते सोडायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमिवर त्यांनी त्यांच्या काळात ज्या प्रश्नांचा पाठपुरावा केला त्या प्रत्येक प्रश्नांबाबत ते अजुनही पाठपुराव्यात आहेत. 

त्याच अनुषंगाने सध्या पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या टेंडर प्रक्रीया होणार असल्याचे वृत्त एकाच दिवशी त्यांचे व विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या नांवे दोन वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाले व आपल्याच पाठपूराव्याबद्दल दोघांनी त्यात दावे केले. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडीयामध्ये याच दोन्ही वृत्तपत्रीय बातम्यांवरुनच जुगलबंदी सुरू झाली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आढळराव-पाटील यांचा थापाड्या असा नामोल्लेख करीत खिल्ली उडविली तर लगेच त्याला सडेतोड प्रतिउत्तर देत शिवसैनिकांनीही कोल्हे यांचा सोंगाड्या असा उल्लेख करीत त्यांच्या राजकीय अभिनय कौशल्याचा उध्दार केला.  

दरम्यान या कामाबाबत आपणच प्रस्तावापासून ते पाठपूराव्या पर्यंत प्रयत्न केल्याचा दावा शिवसैनिकांचा आहे तर डॉ.कोल्हे यांनी पाठपूरावा केल्यानेच टेंडर प्रक्रीया होत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आहे. पर्यायाने यावेळी पहिल्यांदा दोघांनाही अनुक्रमे थापाड्या-सोंगाड्या म्हटले गेल्याने ही जुगलबंदी सध्या सोशल मिडीयात चर्चेचा विषय असून अनेक उलटसुलट मतमतांतरांमुळे सामान्य मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. 

अर्थातच राज्यात कधी नव्हे ती महाआघाडी सत्तेत आल्यानंतर राज्यातील सत्तेत शिवसेना-राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्याचे दाखविले जात आहे. मात्र शिरुर लोकसभा मतदार संघात आणि विशेषत: आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात मात्र कार्यकर्त्यांची मने जुळलेली आहेत असे एकही उदाहरण सरकार स्थापने पासून दिसून आलेले नाही. पर्यायाने आता थापाड्या-सोंगाड्या म्हणण्यापर्यंत दोन्ही कार्यकर्त्यांची मजल गेली असेल तर राज्यातील महाआघाडी शिरुरमध्ये मात्र 'महाबिघाडी' दर्शविते हे मात्र नक्की.    

बैलगाडा शर्यतींसारखी विमानतळाचीही तारीख जाहीर होणार का...?

खेडला विमानतळ होणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील आठवड्यात आडवळणाने बोलल्याने त्याबाबत खासदार कोल्हे यांनीही दुजोरा दिला. अर्थात याबाबत आढळरावांनीही या घोषणेचे स्वागत केले. मात्र ते कधी होणार, कसे होणार, कुठे होणार याबाबत थेटपणे कुणाकडेचे माहिती नसल्याने शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये सोशल मिडीयात सध्या चांगलीच उपहासात्मक जुगलबंदी अशी सुरू आहे.

खासदार कोल्हे हे निवडून आल्यावर पंधरा दिवसात बैलगाडा शर्यती सुरू करणार होते तशाच पध्दतीने ते आता खेड विमानतळ कधी होणार त्याची तारीख त्यांनी जाहिर करावी असेही उपहासात्मक आव्हान त्यांना सोशल मिडीयावर दिले जातेय. पर्यायाने या राजकीय जुगलबंदीने सध्या शिरुर लोकसभा मतदार संघ चांगलाच ढवळून निघालाय.        

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com