मॉर्निंग वॉकला निघालेल्या पत्रकार, सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; सहाजण ताब्यात - Action on Curfew Breakers by Latur Collector | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

मॉर्निंग वॉकला निघालेल्या पत्रकार, सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; सहाजण ताब्यात

विकास गाढवे
बुधवार, 1 एप्रिल 2020

संचारबंदीच्या  काळात मार्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. एक) सकाळी चांगलेच 'एप्रिल फुल' केले. नमस्कार घालून स्वागत करणाऱ्या सहा जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले

लातूर : संचारबंदीच्या  काळात मार्निंग वॉक करणाऱ्या सहा जणांचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारी (ता. एक) सकाळी चांगलेच 'एप्रिल फुल' केले. नमस्कार घालून स्वागत करणाऱ्या सहा जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. यात माजी समाजकल्याण सभापती बालाजी कांबळे यांच्यासह पत्रकार व एका महसूल मंडळ अधिकाऱ्याचा समावेश आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अनेकजण ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. घराबाहेर न येण्याचे आवाहन करूनही लोक सकाळपासूनच रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत. पोलिसांनी कारवाई करूनही लोकांचा वावर कमी झालेला नाही. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे.  बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पाचनंबर चौकातून रिंगरोडने जात होते. या वेळी त्यांना अनेकजण मॉर्निंग वॉक करताना दिसले. त्यांनी गाडीतून उतरत फिरणाऱ्यांना विचारणा करण्यापूर्वीच त्यातील काहींनी `नमस्ते साहब` म्हणत त्यांचे स्वागत केले. 

सर्वांनाच जिल्हाधिकारी चांगला प्रतिसाद देतील असे वाटले. फिटनेससाठी कायम आग्रही असणारे श्रीकांत कौतुकच करतील, असेही त्यांना वाटले. मात्र, श्रीकांत यांनी त्यांना एप्रिल फुल करत सर्वांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती कांबळे, बेलकुंड (ता. औसा) येथील मंडळ अधिकारी सुरेश सोनकांबळे व एका मुक्तपत्रकाराचा समावेश आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळीच केलेल्या या कारवाईमुळे लॉकडाऊनच्या काळात फिटनेससाठी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांत खळबळ उडाली. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. अशा लोकांनीच सरकारचे आदेश पायदळी तुडवल्यास सामान्य लोकांनी काय धडा घ्यायचा. कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कारवाईच्या निमित्ताने स्पष्ट केले.        
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख