action against auasa council chief | Sarkarnama

औसाचे नगराध्यक्ष अफसर शेख अपात्र; नगरविकास खात्याने केले पदावरून दूर

दीपक क्षीरसागर
बुधवार, 12 डिसेंबर 2018

लातूर : औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यावर नगरविकास खात्याने कारवाई केली असून त्यांना अपात्र ठरवून पदावरून दूर करण्यात आले. 

लातूर : औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यावर नगरविकास खात्याने कारवाई केली असून त्यांना अपात्र ठरवून पदावरून दूर करण्यात आले. 

शेख हे पदावर निवडून आल्यापासून मनमानी कारभार करून नगर परिषदेची आर्थिक स्थिती डबघाईला आणल्याची तक्रार नगर परिषदेचे भाजपचे गटनेते सुनिल रेवणसिद्धप्पा उटगे यांनी केली होती. डॉ. अफसर शेख आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष भरत प्रभाकर सुर्यवंशी यांनी नगर परिषदेच्या हिताविरोधी कृत्य केले असून त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५ चे कलम ५५ अ व ब मधील तरतूदीनुसार नगराध्यक्ष अफसर शेख यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याकडे करण्यात आली होती.

त्यांच्या तक्रारीवर १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सुनावणी झाली. सुनावणीनंतर नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ही कारवाई केली.  शेख यांचे दीर्घ रजेवर जावून इतरांकडे पदभार सोपवणे, मुख्याधिकारी यांच्याशी सल्ला मसलत न करता सर्वसाधारण सभा बोलावून अजेंड्यात नमूद विषयात व्यतिरिक्त इतर विषय घेणे, सात महिने सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. 

स्थानिक विकास निधीचे तीन वर्षे लेखा परिक्षण न करणे, भरत सूर्यवंशी यांच्याकडे पाच महिने प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार असताना एकही सर्वसाधारण सभा न घेणे, राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करणे, नगराध्यक्षांनी पदावर असताना कर्तव्यात केलेली कसूर आदी बाबींचा ठपका ठेवून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरवून त्यांना अपात्रतेच्या दिनांकापासून पुढील सहा वर्षांसाठी नगरपरिषद सदस्य म्हणून राहण्यासही अपात्र ठरविले आहे.

तत्कालीन उपनगराध्यक्ष भरत सुर्यंवंशी हे परिच्छेद ४ (व्ही) मध्ये नमूद केल्याप्रमाणे आता उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत नसले तरी त्यांच्याविरुद्ध नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ५५ नुसार कार्यवाही करता येईल किंवा कसे या बाबतचा निर्णय नगर विकास विभागाने घ्यावा व त्यानुसार कार्यवाही व्हावी असे नगरविकास विभागाने म्हंटले आहे. 

नगराध्यक्षांवर अपात्रतेची कार्यवाही होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात सुरू होती. या विषयावर अखेर पडदा पडला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख