फडणवीसांचे पीए म्हणतात , मी आता जनतेचा पीए !

तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, दारू विक्री, गुटखा, मटका आणि जुगार बंद करा अन्यथा मला बाहेरचे अधिकारी आणून त्यांच्यामार्फत धाडी टाकाव्या लागतील.
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar

औसा  : चोवीस तारखेपर्यंत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीए (स्वीय सहायक) होतो. मात्र आता मी जनतेचा पीए झालोय . ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांची सेवा केली, त्याच पद्धतीने आता लोकांची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. निवडणूक संपली. माझेही राजकारण संपले.  आता मी कोण्या एका पक्षाच्या लोकांचा आमदार नसून मी सर्वांचा आमदार आहे, असे मत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शुक्रवारी (ता.१) येथे घेतलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत व्यक्त केले. 

सर्वांना समान दृष्टिकोनातून बघून सर्वांच्या हिताचे काम मला करावयाचे आहे त्यासाठी सर्वांनी मला साथ द्या. प्रशासन, शासन आणि लोकांच्या सहकार्याने औसा तालुका एका विकासाच्या नव्या वळणावर घेऊन जायचा आहे  अशी अपेक्षा आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली . 

आमदारांच्या बैठकीला तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे संकेत आहेत. मात्र,  स्वीय सहायक असताना व आता आमदार असतानाही पवार यांनी त्यांचा दबदबा कायम ठेवल्याचे दिसत आहे. त्यांच्या शुक्रवारच्या पहिल्याच बैठकीला  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली, हे विशेष. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्यासह जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

या वेळी आमदार पवार यांनी आमदार बसवराज पाटील आणि दिनकर माने यांच्या कामाचे कौतुक केले .  तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, दारू विक्री, गुटखा, मटका आणि जुगार बंद करा अन्यथा मला बाहेरचे अधिकारी आणून त्यांच्यामार्फत धाडी टाकाव्या लागतील. आणि बाहेरचे अधिकारी आणून धाडी टाकण्याची नामुष्की ओढवू नका असा इशाराही त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला. 

अवैध धंद्यात माझे कार्यकर्ते असतील तर त्यांचीही गय कोणी करू नये आणि मीही करणार नाही. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून तुम्हाला त्रास होणार नाही फक्त तुम्ही लोकांना त्रास होईल असे वागू नका. काम नाही केले तर त्याचा त्रास होणार असल्याचे त्यांनी बजावले. गुत्तेदारी, टक्केवारीला स्थान देणार नसून दर्जेदार आणि वेळेत कामे झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com