नवविचारांतून करा राष्ट्रविकास - अभिजित पवार - Abhijeet Pawar Aurangabad YIN Speech | Politics Marathi News - Sarkarnama

नवविचारांतून करा राष्ट्रविकास - अभिजित पवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 एप्रिल 2019

कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात यशाचे शिखर गाठता येते. आपला जन्म कुठे झाला याला फारसे महत्त्व नसते. नव्या पद्धतीने विचार करून स्वत:च्या विकासासोबतच आपण कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले.

औरंगाबाद - कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात यशाचे शिखर गाठता येते. आपला जन्म कुठे झाला याला फारसे महत्त्व नसते. नव्या पद्धतीने विचार करून स्वत:च्या विकासासोबतच आपण कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले.

‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) मंगळवारी येथे ‘यिन टॉक शो’ हा कार्यक्रम झाला. ‘शेपिंग फॉर फ्युचर’ या विषयावर अभिजित पवार यांनी तरुणाईशी मनमोकळा संवाद साधला. एमआयटी महाविद्यालयाच्या तुडुंब भरलेल्या सभागृहात पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती. अनेकांनी दोन तास उभे राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या वेळी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जात, धर्म, भाषा या भावनिक विषयांच्या आहारी न जाता मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू, अशी सामुदायिक शपथ तरुणांना देत ‘यिन’च्या ‘आय विल व्होट’ या राज्यव्यापी जागृती मोहिमेची मोठ्या दिमाखदार पद्धतीने सुरवात करण्यात आली. औरंगाबादसह बीड, उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली अशा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

पवार म्हणाले, ‘आयुष्य कसे हवे आहे, हे आपल्यालाच ठरवता आले पाहिजे. त्यासाठी आयुष्यातील वेळेचे नियोजन करा. समजा, २५ वर्षे वय असलेल्यांचे ७५ वर्षे बाकी आहेत, असे गृहीत धरले तर तुमच्याकडे तीन लाख तास आहेत. ते स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी किती आणि कसे खर्च करायचे याचे नियोजन करा. विनासायास, मोफत काहीच मिळत नाही. आयुष्यात यश मिळवण्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा ‘फोकस क्‍लीअर’ ठेवा. कायम विद्यार्थी राहा, वाचन, मनन करा, महापुरुषांना समजून घ्या. आपण जन्म घेतला आहे, तर समाजाचे देणे लागतो, याची जाणीव ठेवा.’

‘सकाळ’ने तेरा वर्षांपूर्वी कृषी क्षेत्रासाठी ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून काम सुरू केले तेव्हा परिस्थिती बिकट होती. मात्र आज ‘सकाळ’ तेच माध्यम वापरून ३ लाख शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी काम करत आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीत आपण खासदारांची निवड करणार आहोत याची जाणीव ठेवा. जबाबदाऱ्या पेलणाऱ्या उमेदवाराची निवड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उदाहरणांसह उत्तरे देतानाच जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा, असा सल्लाही पवार यांनी दिला. एमआयटीचे महासंचालक मुनिष शर्मा यांनी अभिजित पवार यांच्यासोबतचे अनुभव कथन करीत ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

चार आघाड्यांवर करा विचार
राज्यात ‘यिन’चे २५ लाख सदस्य आहेत. ‘यिन’ सदस्यांनी प्रत्येकी दहा ते बारा जणांचा गट तयार करून शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक अशा चार आघाड्यांवर विचार करा. शारिरीक सुदृढतेसाठी ‘स्कूल ऑलिम्पिक’च्या धर्तीवर महाविद्यालयांमध्येही अशा स्पर्धा घेता येतील. आजपासून शरीराला चांगली सवय लावण्याचा निर्धार करा. मानसिक सक्षमता कायम ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करताना अभिजित पवार यांनी सामाजिक दायित्व निभावण्यासाठी समूहाने उभे राहणाऱ्या समाजघटकांच्या पाठीशी ‘सकाळ समूह’ ठामपणे उभा राहील, असा विश्‍वास दिला. ‘यिन’ आणि ‘तनिष्का’ची ताकद ‘लाल दिव्या’पेक्षाही अधिक आहे. या संघटनशक्तीचे रूपांतर चळवळीत झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अभिजित पवार म्हणाले...
शेवटच्या श्‍वासापर्यंत सशक्त आयुष्य जगता आले पाहिजे.  
राज्यघटना, अन्य पुस्तकांचे वाचन करा, महापुरुषांचे चरित्र आत्मसात करा.  
स्वत:त सतत बदल करुन घेण्याची तयारी ठेवा.
आईवडिलांची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख