Abhay Chitgaonkar Visits Harshwardhan Jadhav | Sarkarnama

हर्षवर्धन जाधव माझे बालमित्र, त्यांना नव्या पक्ष स्थापनेच्या शुभेच्छा - अभय पाटील चिकटगांवकर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आमदारकीच्या राजीनामा दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या शहराती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (ता.18) म्हणेजच विजयादशमीला होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांनी भेटीगाठींचा धडका सुरू केला आहे.

औरंगाबाद : "हर्षवर्धन जाधव माझे लहानपणीचे मित्र आहेत, शिवाय आमचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध देखील आहेत. भेटायला या असा त्यांना निरोप आल्यानंतर मी आज त्यांची भेट घेऊन त्यांना नव्या पक्ष स्थापनेच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमागे कुठलेही राजकारण किंवा स्वार्थ नाही," असा दावा राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी अभय पाटील चिकटगांवकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केला. 

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आमदारकीच्या राजीनामा दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या शहराती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (ता.18) म्हणेजच विजयादशमीला होत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांनी भेटीगाठींचा धडका सुरू केला आहे. सोमवारी आमदार बच्चू कडू यांची भेट घेत जाधव यांनी खळबळ उडवून दिली होती. आगामी लोकसभा औरंगाबादमधून लढण्याची घोषणा आणि तयारी हर्षवर्धन यांनी सुरू केली आहे. नव्या पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील दणक्‍यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी राजकारणातील आपल्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले आहे. यापैकीच एक नाव म्हणजे वैजापूर येथील राष्ट्रवादीचे युवा नेते अभय पाटील चिकटगांवकर. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत गेल्या महिन्यात नव्या पक्षाची घोषणा केली होती. 

अदालत रोड या मुख्य रस्त्यावरील भव्य संपर्क कार्यालयातून हर्षवर्धन जाधव आपल्या नव्या पक्षाचा कारभार चालविणार आहेत. जाधव यांच्या नव्या वाटचालीस आणि पक्ष स्थापनेच्या शुभेच्छा देण्यासाठी अभय पाटील चिकटगांवकर यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संपर्क कार्यालय गाठले. भलामोठा पुष्पगुच्छ देऊन चिकटगांवकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यांशी प्रदीर्घ चर्चा देखील केली. 

दोन मित्रांची भेट...वैजापूरचे माजी आमदार दिवंगत कैलास पाटील चिकटंगावकर यांचे चिरंजीव आणि विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचे अभय पाटील हे पुतणे. वैजापूर मतदारसंघात तरुणांमध्ये अभय पाटील यांची चांगली क्रेझ आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी देखील अभय पाटील चिकटगांवकर यांचे नाव चर्चिले जाते. या शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्व म्हणून तालुका त्यांच्याकडे पाहतो आहे. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांची त्यांनी भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पण या चर्चेला अजून हवा मिळू नये याची काळजी घेत अभय पाटील यांनी मात्र ही दोन मित्रांची भेट असल्याचे सांगून टाकले आहे. हर्षवर्धन आणि मी लहानपणीचे मित्र आहोत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील आम्ही सोबत काम केले आहे. या शिवाय आमचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध देखील आहेत. 

मित्राने एक धाडसी निर्णय घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला, मला फोन करून भेटायला बोलावले. तेव्हा त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देणे माझे कर्तव्यच आहे. या भावनेतूनच मी हर्षवर्धन जाधव यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटलो. यापलीकडे या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ कुणी काढू नये असे देखील अभय पाटील चिकटगांवकर यांनी स्पष्ट केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख