अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे यांच्यात भोकरदनच्या बंगल्यावर खलबते 

रावसाहेब दानवे शुक्रवारी दिल्लीहून भोकरदनमध्ये आले होते. जाफ्राबाद तालुक्‍यातील राष्ट्रवादी व इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. दोन दिवस दानवे भोकरदनमध्ये मुक्कामी असल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची बंगल्यात भेट घेतली.
अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे यांच्यात भोकरदनच्या बंगल्यावर खलबते 

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील बंगल्यावर जाऊन भेट घेतली. तासाभराच्या या भेटीत पक्ष प्रवेश आणि मुलगा समीर सत्तार यांच्या विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर खलबते झाल्याची चर्चा आहे. 

रावसाहेब दानवे शुक्रवारी दिल्लीहून भोकरदनमध्ये आले होते. जाफ्राबाद तालुक्‍यातील राष्ट्रवादी व इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. दोन दिवस दानवे भोकरदनमध्ये मुक्कामी असल्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची बंगल्यात भेट घेतली. भाजप प्रवेशासाठी सत्तार यांच्या मुंबई वाऱ्या सुरू आहेत. परंतु, रावसाहेब दानवे दिल्लीत व्यग्र झाल्यामुळे सत्तारांनी त्यांची भेट घेण्याची संधी हेरलीच. 

येत्या 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान होत आहे. लांबलेला भाजप प्रवेश, मुलाच्या विधान परिषद उमेदवारीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे सत्तार सध्या चिंतेत आहेत. परंतु, विधान परिषदेच्या निमित्ताने वर्चस्व सिध्द करण्याची चालून आलेली आणखी एक संधी सत्तार साधू पाहत आहेत. आपण आता कॉंग्रेसमध्ये नसलो तरी या व इतर अपक्षांचे मिळून आपल्याकडे दीडशे सदस्यांचे बळ असल्याचा दावा करत सत्तार यांनी आपले पुत्र समीर यांना निवडणूक मैदानात उतरवण्याची घोषणा केली आहे. यातून सत्ताधारी शिवसेना-भाजपला एक सूचक संदेश देखील ते देऊ पाहत असल्याचे बोलले जाते. सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, किंवा त्यांना त्याबाबत ठोस शब्द पक्षनेतृत्वाकडून मिळाला, तरच ते विधान परिषदेत युतीला मदत करण्याची भूमिका घेतील अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अर्थात समीर यांच्या उमेदवारीचे हत्यार करत सत्तार आपला हेतू साध्य करू पाहत आहेत. याचा त्यांना कितपत फायदा होतो हे येत्या आठवडाभरातच स्पष्ट होईल. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सत्तार यांनी आज भोकरदन गाठत रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. ऑगस्ट महिन्यात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोकरदनमध्ये दानवे यांच्या निवासस्थानी मुक्कामी येण्याची शक्‍यता आहे.  यावेळी त्यांच्या भोकरदन व सिल्लोडमध्ये देखील जाहीर सभा होणार आहेत. नेमका याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा असे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीतील भूमिका आणि भाजप प्रवेश या विषयावरच दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.

या भेटीनंतर आता सत्तार मुलाला विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरायला लावणार का? आणि भरला तर तो कायम ठेवणार की लोकसभेप्रमाणे माघार घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com