सत्तारांच्या कॉंग्रेस विरोधाने जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा डाव फसला

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या टोकाच्या कॉंग्रेस विरोधामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा डाव फसला.
Abdul Sattar Gave Surprise to MahaVikasAghadi in Aurangabad Zilla Parishad
Abdul Sattar Gave Surprise to MahaVikasAghadi in Aurangabad Zilla Parishad

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या टोकाच्या कॉंग्रेस विरोधामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा डाव फसला. शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगांवकर यांना समर्थक सदस्यांसह, भाजपच्या 23 सदस्यांचा पाठिंबा मिळवून देत सत्तार यांनी कॉंग्रेसच्या मीना शेळके यांना अध्यक्ष होण्यापासून आज तरी रोखले आहे.

देवयानी डोणगांवकर आणि मीना शेळके यांना प्रत्येकी 29 मते मिळाल्यानंतर आता निवडणुक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आज झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, कॉंग्रेसकडे हे पद जाऊ नये यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळीच खेळी केली.

कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या गटाच्या समजल्या जाणाऱ्या करमाड गटातील मीना शेळके यांना अध्यक्षपद मिळू नये यासाठी सत्तार यांनी आपल्या सहा समर्थक सदस्यांना महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. या नाट्याची स्क्रीप्ट सत्तार आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आधीच लिहल्यामुळे दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्यास उत्सुक असलेल्या देवयानी डोणगांवकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवयानी डोणगांवकर जिल्हा परिषदेत आल्या तेव्हा शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्यात खडाजंगी झाली.

भाजपची माघार, डोणगांवकरांना पाठिंबा..

भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण प्रत्यक्ष सभागृहात मतदानाच्या वेळी भाजपने माघार घेत आपल्या सर्व 23 सदस्यांची मते देवयांनी डोणगांवकर यांना दिली. सत्तार समर्थक सहा सदस्यांनी देखील हीच भूमिका घेतल्याने देवयानी डोणगांवकर यांना 29 आणि महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांनाही तितकीच मते मिळाली.

61 पैकी 58 सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग नोंदवला तर भाजपच्या छाया अग्रवाल यांना सभागृहात येण्यास उशीर झाल्यामुळे मतदानापासून रोखण्यात आले. तर शिवसेनेच्या शितल बनसोड आणि मनिषा शिदलंबे या गैरहजर राहिल्या.

दरम्यान, शिवसेनेच्या सदस्य मोनाली राठोड यांनी हात उंचावून मतदान करतांना महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांच्यासाठी हात वर केला. परंतु, प्रत्यक्षात याची नोंद करून स्वाक्षरी घेतांना मात्र माझे मत देवयानी डोणगावकर यांना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंनी आक्षेप घेत गोंधळाला सुरूवात झाल्याने निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब करत अध्यक्षपदाची निवड पुढे ढकलल्याचे जाहीर केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com