अब्दुल सत्तारांनी प्रथमच घेतले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन ...

अब्दुल सत्तारांनी प्रथमच घेतले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन ...

औरंगाबाद : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी असल्याने राज्यभरातून शिवसेनेचे आमदार मुंबईत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार यांनी देखील सकाळीच शिवाजीपार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करत त्यांचे दर्शन घेतले. 

अब्दुल सत्तार गेली तीस- पस्तीस वर्ष कॉंग्रेसमध्ये होते. शिवसेना-भाजपवर टीका करतच त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली. पण राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रु किंवा मित्र नसतो याची प्रचिती सत्तार यांना देखील आली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारत बाहेर पडलेल्या सत्तारांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांमुळे तो फसला. पण शिवसेनेत प्रवेश मिळवत सत्तार यांनी भाजपवर कुरघोडी केली. एवढेच नाही तर भाजपकडे असलेला सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी म्हणजे स्वतःसाठी सोडवून घेत मोठ्या मताधिक्‍याने सलग तिसरा विजयही मिळवला. सत्तार यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयावर तीस वर्षांपासून फडकत असलेल्या कॉंग्रेसच्या झेंड्याने आता भगव्याने जागा घेतली. 

राहूल, सोनिया, अशोक चव्हाण यांच्या तसबीरी हटून तिथे आता बाळासाहेब, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. सत्तार यांच्यात झपाट्याने घडलेले हे बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत असतांनाच इकडे मतदारसंघ आणि संपर्क कार्यालयात देखील सत्तार यांनी विशेष तयारी केली होती. सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात बाळासाहेबांची छबी रांगोळीतून साकारण्यात आली होती. तसेच कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागात बाळासाहेंबाचे मोठे छायाचित्र अभिवादनासाठी लावण्यात आले होते. आज दिवसभर सत्तार यांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. 

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात शिवसेना गेली कित्येक वर्ष फक्त नावापुरती होती. पण सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाने सध्या संपूर्ण तालुका शिवसेनामय आणि भगवा बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पस्तीस वर्ष कॉंग्रेसमध्ये राजकारण केल्यानंतर सत्तार यांनी आपल्या अंगावरची कॉंग्रेसची झूल बाजूला सारत परिधान केलेला भगवा पाहता, सत्तार अगदी कमी वेळात कट्टर शिवसैनिक झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com