"जय महाराष्ट्र'ला अब्दुल सत्तार यांचे "जय श्रीराम'ने उत्तर

"जय महाराष्ट्र'ला अब्दुल सत्तार यांचे "जय श्रीराम'ने उत्तर

औरंगाबाद : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार रविवारी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. अंबादास दानवे यांनी सत्तारांना पाहताच "जय महाराष्ट्र' घातला, पण हजरजबाबी सत्तार यांनी दानवे यांच्या जय महाराष्ट्रला "आता जय श्रीराम' असे म्हणत उत्तर दिले. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत अब्दुल सत्तार यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आपणच कसे योग्य होतो हे सांगायला देखील सत्तार विसरले नाहीत. 

जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सत्तार यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. जालन्यात सत्तार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मदत करण्याची भूमिका घेतली, तर औरंगाबादेत त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर करत वेगळीच खेळी केली. पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसने निवडणुकीदरम्यानच अब्दुल सत्तार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे संतापलेल्या अत्तार यांनी थेट भाजपशी घरोबा करत कॉंग्रेसला अद्दल घडवण्याची ठरवले. अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश केव्हाही होऊ शकतो, शनिवारी सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्या जय महाराष्ट्रला आता जय श्रीराम म्हणून दिलेले उत्तर म्हणूनच बरेच सूचक वाटते. 

घडले असे की, एका खासगी कार्यक्रमात अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे समोरासमोर आले. कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असलेल्या सत्तारांना पाहून अंबादास दानवे यांनी जय महाराष्ट्र असे म्हणत नमस्कार केला. त्याला सत्तार यांनी "आता जय महाराष्ट्र नाही, तर जय श्रीराम' असे म्हणत आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिल्याचे बोलले जाते. येत्या पाच-सहा दिवसात अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्‍यता आहे. त्यांना नव्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देखील दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे . या पार्श्वभूमीवर जय श्रीरामचा नारा देत सत्तार यांनी भाजपचे कमळ हाती घेण्याचे निश्‍चित केल्याचे समजते. 

जिल्हा परिषदेत सत्ताबदल? 
दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत औरंगाबादेत वेगळेच समीकरण जुळून आले होते. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने चक्क कॉंग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता काबीज केली होती. या आगळ्यावेगळ्या प्रयोगासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला होता. अब्दुल सत्तार आणि दानवे यांच्या राजकीय खेळीतूनच जिल्हा परिषदेत कॉंग्रेस- शिवसेना युती झाली होती. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत शिवसेनेने अधक्ष्यपद पटकावले आहे. आता सत्तार यांच्या नव्या भूमिकेने जिल्हा परिषदेतील सत्ताकेंद्र बदलण्याची शक्‍यता आहे. 

सत्तार यांचा भाजप प्रवेश झाल्यास कॉंग्रेस शिवसेनेची साथ सोडून भाजपासोबत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जय महाराष्ट्र ऐवजी आता जय श्रीराम म्हणणाऱ्या सत्तार यांनी एक प्रकारे शिवसेनेला हा इशारा दिल्याचेच मानले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com