पोलिस अधीक्षक सिंह यांची प्रेरणास्थाने अण्णा हजारे व ए.पी.जे. अब्दुल कलाम - Abdul Kalam and Anna Hazare are my Inspirations say Nagar SP Akhilesh Kumar Singh | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधीक्षक सिंह यांची प्रेरणास्थाने अण्णा हजारे व ए.पी.जे. अब्दुल कलाम

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 एप्रिल 2020

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी काल सायंकाळी उशिरा येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या स्थितीची माहिती सिंह यांनी दिली.

राळेगणसिद्धी  : ''यूपीएससीची तयारी करताना माझ्यासमोर माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम व अण्णा हजारे ही प्रेरणास्थाने होती. त्या काळात कलाम व हजारे यांच्याविषयी खूप वाचले. नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. हजारे यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला आवडेल.'' अशा शब्दांत पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी काल सायंकाळी उशिरा येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या स्थितीची माहिती सिंह यांनी दिली. लॉकडाउन काळात अनेक दानशूर व्यक्ती गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मदतीचे वितरण करताना प्रशासनाला सहकार्य करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करू,असा शब्द हजारे यांनी त्यांना दिला. हजारे यांनी सिंह यांना विविध पुस्तके भेट म्हणून दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांची गरज असल्याने, आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे हजारे यांनी याआधीच केली होती. त्यानुसार सुरक्षा कमी करण्याचा आग्रह अण्णा हजारे यांनी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे धरला. त्यावर, आपल्या सुरक्षेचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील असल्याचे सिंग यांनी त्यांना सांगितले. 

सरकारचे कौतुक 

हजार यांनी या वेळी केंद्र राज्य सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, "कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलत योग्य वेळी लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाला रोखण्यात आपल्याला चांगले यश आले. नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून, घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.''

हे देखिल वाचा - एका ट्विटची दखल घेत तासभरातच जिल्हाधिकाऱ्यांनी औषधे पोहोचवली घरपोच

नगर  : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मुकुंदनगर परिसर प्रशासनाने 'हॉट स्पॉट' जाहीर केला. परिणामी, येथील अत्यावश्‍यक सेवाही पूर्णपणे बंद आहेत. अशात आजारी आईच्या औषधांसाठी मुलाने थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाच ट्विटरवरून साद घातली. त्यांनीही याला प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात आवश्‍यक औषधे मुकुंदनगरमधील संबंधित मुलाच्या घरी पोच केली.....सविस्तर वृत्त येथे वाचा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख