आष्टीत सुरेश धस यांचा विधानसभेला 'धस अँड सन्स  लि.' फॉर्म्युला  ?  - Aashti assembly constituency : Sursh Dhas & sons limited formula | Politics Marathi News - Sarkarnama

आष्टीत सुरेश धस यांचा विधानसभेला 'धस अँड सन्स  लि.' फॉर्म्युला  ? 

दत्ता देशमुख 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भाजप आमदार सुरेश धस यांचे थोरले चिरंजीव असलेले जयदत्त धस मतदार संघात सक्रीय तर आहेतच. शिवाय आता विकास कामांचे उद॒घाटनेही त्यांच्या हस्ते होत आहेत. लोकसभेला मतदार संघातून भाजप उमेदवाराला ७० हजारांचे मताधिक्य  आणि दरेकरांचे जावई ही देखील त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

बीड : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेच्या माध्यामातून पुन्हा आमदार झालेले सुरेश धस येत्या विधानसभा निवडणुकीसाठी  आपले चिरंजीव  जयदत्त धस यांना सध्या प्रोजेक्ट करताना दिसत आहेत . आष्टीत सुरेश धस यांचा विधानसभेला 'धस अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड  ' फॉर्म्युला राबविण्याचा विचार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 

सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गाव दौरे आणि गाठीभेटी घेणारे भाजप आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव आता राजकीय कार्यक्रमांतही आग्रभागी असतात. विशेष म्हणजे आता विकास कामांचे उद॒घाटनेही त्यांच्या हस्ते होत आहेत. वडिल सुरेश धस यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांनी यंत्रणा सक्षमपणे हाताळली. त्यांचा राबता पाहता ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उरतीलच असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. 

त्यातच दरेकरांचे जावई ही देखील त्यांच्यासाठी राजकीय जमेची बाजू आहे. सरपंच, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री अशी सुरेश धस यांची आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघात कारकिर्द राहीलेली आहे. धस कोणत्याही पक्षात असले तरी मतदार संघात त्यांनी स्वत:च्या समर्थक कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण केलेली आहे. सध्याही मतदार संघातील तीन पैकी दोन पंचायत समित्या आणि तीनही नगर पंचायती आणि इतर सहकारी संस्थांवर सुरेश धसांचेच वर्चस्व आहे. धस राष्ट्रवादीतून भाजपात जाताच या संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकला. 

लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात भाजपच्या डॉ. प्रितम मुंडेंना सर्वाधिक ७० हजारांवर मताधिक्क्य आष्टी मतदार संघातूनच मिळाले. सहाजिकच याचे श्रेयही सुरेश धस यांच्याच पारड्यात आहे. दरम्यान, त्यांचे चिरंजीव जयदत्त धस मागच्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघात सक्रीय आहेत. पुर्वी लग्न समारंभ, सुख - दु:खाच्या निमित्ताने सामान्यांत राहणारे जयदत्त धस अलिकडे राजकीय व्यासपीठांवरही आग्रभागी असतात. 

जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारानंतर सुरेश धस यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनाचा प्रमुख भारही त्यांनी पेलला. आता लोकसभा निवडणुकीतही प्रचाराचे मोठे नियोजन त्यांच्याच हाती होते. वडिलांकडूनच राजकीय डावपेचांचे धडे मिळालेल्या जयदत्त धस यांना राजकीय अनुभवही आलेला आहे. अलिकडे तर त्यांच्या हस्ते रस्ता, सभामंडप अशा कामांची उद॒घाटनेही होत आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांच्या नियोजनाच्या मेळाव्यात त्यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते . 

'‘आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो’ या त्यांच्या समर्थकांच्या घोषणा आणि सोशल मिडीयावरही हाच गजर पाहता जयदत्त धस विधानसभेच्या मैदानात उरतील असेच मानले जात आहे. मितभाषी असलेले जयदत्त धस तसे राजकीय चाणाक्ष देखील आहेत. दरम्यान, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या नातीशी त्यांचा झालेला विवाह हा विधानसभेची पायाभरणी मानली गेली होती. आता तर लोकसभेला मिळालेले भरमसाठ मताधिक्क्याने त्यांचा आणि समर्थकांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. मात्र, येथून भाजपचे भीमराव धोंडे प्रतिनिधित्व करत असल्याने उमेदवारीचा पेच तर आहेच. याला सुरेश धस काय पर्याय शोधतात यावर पुढील वाटचाल अवलंबून आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख