नागपुरात आणणार "आप'ची सत्ता, वानखडे जगजितसिंग यांचा निर्धार

 नागपुरात आणणार "आप'ची सत्ता, वानखडे जगजितसिंग यांचा निर्धार

नागपूर : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा झाडू दिल्लीवर चालला. त्यामुळे "आप'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे. आज येथील "आप'च्या कार्यालयासमोर दिल्लीतील विजयाचा जल्लोष करण्यात आला. दोन वर्षांनंतर होणारी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी संपूर्ण शक्तीनिशी लढविणार असून सत्ता हस्तगत करण्यासाठी आम्ही आजपासूनच कामाला लागलो असल्याचे "आप'चे पूर्व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे आणि राज्य कोषाध्यक्ष जगजितसिंग यांनी "सरकारनामा'ला सांगीतले. 

दिल्ली हे विकासाचे मॉडेल म्हणून देशात पुढे येत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचे वचन आप सरकारने दिले होते, ते पूर्ण केले. आज दिल्लीतील शाळांचा निकाल 96 टक्के आहे. देशातील अनेक राज्य विकासाचे मॉडेल म्हणून दिल्लीचे अनुकरण करीत आहे. महिला सुरक्षेसाठी शहरभर सीसी टीव्ही कॅमेरे, विजेच्या घरगुती ग्राहकांना 100 ते 200 युनिटपर्यंत मोफत विज देण्याबाबत आज अनेक राज्ये विचाराधीन आहेत. पहिल्यांदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. जे दिल्लीत घडले, ते नागपूर महानगरपालिकेतही आम्ही करु शकतो असे वानखडे यांनी सांगितले. 

सद्यस्थितीत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने शहराची स्थिती खराब करुन ठेवलेली आहे. शहरात महापालिकेच्या 450 पेक्षा अधिक शाळा होत्या, त्यातील अर्ध्याअधिक बंद पाडल्या. 150 दवाखाने आहेत, पण एकाही दवाखान्यात पुरेसे डॉक्‍टर नाहीत. सरकारी बसेस खासगी कंपन्यांना चालवायला दिल्यात, पण त्यातून अपेक्षीत उत्पन्न पालिकेला मिळत नाही. पाणी वाटपाचेही खासगीकरण करुन ठेवलेले आहे. त्यामुळे दर उन्हाळ्यात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतात. केवळ जाती-धर्माचे राजकारण करुन लोकांना लढवणे, येवढेच भारतीय जनता पक्ष करीत आहे. महापालिकेत सत्ता आणून आम्ही शहराची ही स्थिती निश्‍चितपणे बदलविणार असल्याचे देवेंद्र वानखडे म्हणाले. 

इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यांनादेखील जनतेने सत्तेतून खाली खेचले, हा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचेही सरकार जाईल आणि आपचे सरकार येईल. विकास आणि केवळ विकासासाठी "आप' कटीबद्ध आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी आमच्याकडे दोन वर्षे वेळ आहे. येवढा वेळ आम्हाला पुरेसा असल्याचेही वानखडे म्हणाले. याकामी त्यांच्यासोबत जगजितसिंग, अमृत सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंघल, गिता कुहीकर, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, ऍड. राजेश भोयर यांच्यासह "आप'चे सर्व संयोजकांनी कंबर कसली असल्याचेही वानखडे म्हणाले. 

वेगळ्या विदर्भाला पाठींबा 
छोट्या राज्यांचा विकास झपाट्याने होऊ शकतो, हे छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी दाखवून दिले. विदर्भ वेगळा झाल्यास या राज्याचा विकासही झपाट्याने होईल. त्यामुळे आम्ही वेगळ्या विदर्भाला समर्थन करणार. विदर्भ राज्य समितीच्या आंदोलनांना आमचा वेळोवेळी पाठींबा राहणार असल्याचे देवेंद्र वानखडे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com