दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसमोर भाजपचा महापालिका निवडणूक हरलेला उमेदवार !

नुपूर शर्मा किंवा तेजिंदर बग्गा (हरीनगर) यांच्यासारखे दिल्लीचे भाजप युवा नेतेही कितीतरी लोकप्रिय आहेत. यादव वकील आहेत व आपल्या भागात सामाजिक कामेही ते करतात. तरीही थेट केजरीवालांसमोर त्यांचे नाव जाहीर केल्यावर खुद्द भाजपमध्ये आश्‍चर्याची प्रतिक्रिया उमटली.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसमोर भाजपचा महापालिका निवडणूक हरलेला उमेदवार !

नवी दिल्ली : केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या व दिल्लीत सातच्या सात खासदार असलेल्या भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कोण, हा पेच काल मध्यरात्रीच्या अंधारात सोडविला व सुनील यादव यांची उमेदवारी गुपचूप जाहीर करून टाकली. आता नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल -सुनील यादव -रमेश सभरवाल अशी अत्यंत विषम मांडणी दिसते ती पाहता केजरीवालांना एकतर्फी विजय (बाय किंवा वॉकओव्हर) मिळेल याचीच तजवीज भाजप व कॉंग्रेसने केल्याचे हे निदर्शक मानले जाते. यातूनही या दोघांपैकी एकाने केजरीवालांना जोरदार टक्कर दिली तर भाजप -कॉंग्रेस मुख्यालयांत त्याचा जंगी सत्कारच करावा लागेल अशी एकंदर स्थिती आहे. 

भाजपने काल रात्री एकनंतर गुपचूप जारी केलेल्या यादीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर सुनिल यादव नावाचे जे नेते उतरिवले आहेत ते 2017 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक हरले होते. त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतरही भाजपमधील नवी दिल्लीबाबतचा गोंधळात गोंधळ चालूच आहे. यादव हे दिल्लीचे युवा मोर्चा अध्यक्ष असले तरी त्यांची ख्याती समाज माध्यमांवर विरोधकांवर येथेच्छ टीकाटिप्पणी करणे एवढ्यापुरतीच राहिल्याचे भाजपमध्ये मानले जाते. 

नुपूर शर्मा किंवा तेजिंदर बग्गा (हरीनगर) यांच्यासारखे दिल्लीचे भाजप युवा नेतेही कितीतरी लोकप्रिय आहेत. यादव वकील आहेत व आपल्या भागात सामाजिक कामेही ते करतात. तरीही थेट केजरीवालांसमोर त्यांचे नाव जाहीर केल्यावर खुद्द भाजपमध्ये आश्‍चर्याची प्रतिक्रिया उमटली. खरे तर भाजप नेतृत्वाने नवी दिल्लीच्या जागेसाठी सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी, केजरीवालांशी फाटलेले कवी कुमार विश्‍वास, माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आदी नावे होती. पण भाजप नेतृत्वाने सारे प्रयत्न करूनही त्यांच्या मनातील नावांकडून त्यांना होकार मिळेना. 

शेवटी 2013 व 2015 मध्ये भाजपनेच तिकीट नाकारलेले यादव यांच्यावर पक्षाचे गाडे येऊन थांबले. नंतर भाजपने 2017 मध्ये त्यांना पालिका निवडणुकीत "ऐन्ड्य्रूज गंज' भागातून तिकीट दिले पण ते जोरदार आपटले. ते भाजप युवा मोर्चाचे बूथ व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. आज सकाळी त्यांच्या उमेदवारीची बातमी समजताच नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इतकी अस्वस्थता पसरली की दिल्लीचे प्रभारी श्‍याम जाजू यांनी यादव यांना अचानक बोलावून घेतले. यादव यांना नाव मागे घेण्यास सांगण्यात आले अशीही जोरदार चर्चा सुरू झाली. पण दुपारी जाजू यांनी, "यादव हेच भाजपचे उमेदवार असतील व आम्ही निवडणुकीतील विजयाबद्दल आश्‍वस्त आहोत,' असे जाहीर केले व नंतरही हा गोंधळ चालूच राहिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com