ठाणे महापालिकेला तारण्यासाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे २२५ कोटींची मागणी - Thane Mayor Demands Two Hundred Twenty Five Crore Help to CM | Politics Marathi News - Sarkarnama

ठाणे महापालिकेला तारण्यासाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे २२५ कोटींची मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

ठाण्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासनाने युद्धपातळीवर काम केल्यामुळे ठाण्यातील कोरोना आटोक्‍यात येण्यास मदत झाली. परंतु महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात आलेला आहे. अशा वेळी पालिकेतील इतर दैनंदिन कामेदेखील करणे आवश्‍यक आहे. कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून, पालिकेकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे स्रोत नाही. याचा परिणाम इतर नागरी कामांवर होत असल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली आहे

ठाणे :  ठाणे शहराने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चांगले काम केल्याचे प्रशस्तिपत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, पण त्याच वेळी कोरोनाच्या काळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने महापालिकेचा कारभार चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठाणे महापालिकेला तब्बल २२५ कोटी रुपयांचे आर्थिक साह्य करावे, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या मागणीकडे मुख्यमंत्री किती सकारात्मक पद्धतीने पाहतात याकडेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करणे, विलगीकरण कक्ष उभारणे, आवश्‍यक तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती करणे, औषधे उपलब्ध करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विलगीकरण कक्षातील नागरिकांना आवश्‍यक सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

ठाण्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासनाने युद्धपातळीवर काम केल्यामुळे ठाण्यातील कोरोना आटोक्‍यात येण्यास मदत झाली. परंतु महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात आलेला आहे. अशा वेळी पालिकेतील इतर दैनंदिन कामेदेखील करणे आवश्‍यक आहे. कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून, पालिकेकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे स्रोत नाही. याचा परिणाम इतर नागरी कामांवर होत असल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली आहे. निधीची कमतरता अशीच राहिली, तर भविष्यात शहरातील विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

विकास कामांसाठी निधीची गरज
महापालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणे आवश्‍यक आहे. तसेच कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भविष्यातही अनेक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. यासाठी निश्‍चितच निधीची आवश्‍यकता आहे. सद्यस्थितीतील महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या दृष्टीने आवश्‍यक कामे करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळेच कोरोना व त्यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला २२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातच महापालिकेची सद्य:स्थितीतील आर्थिक परिस्थिती विचारात घेता पालिकेतील अन्य नागरी कामे आथिकदृष्ट्या करणे शक्‍य नाही. त्यामुळे अनुदान स्वरूपात रुपये २२५ कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी महापौरांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख