साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या शर्तीवर अविनाश जाधवांना जामीन - Thane court grants bail to MNS leader Avinash Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या शर्तीवर अविनाश जाधवांना जामीन

दीपक शेलार
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राजकीय हेतूने गोवल्याचा मनसेचा आरोप

ठाणे : मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शुक्रवारी तब्बल सात दिवसांनंतर ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांच्यावर राजकिय गुन्हे असुन त्यांनी जनतेसाठी आंदोलन केले असल्याने न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला, अशी माहीती न्यायालयात जाधव यांची बाजु मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. तर,न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असुन हा जनतेचा विजय असल्याच्या भावना मनसैनिकांनी व्यक्त केल्या.

 ठाण्यातील कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात अविनाश जाधव यांनी रुग्णालयाला भेट देऊन आंदोलन छेडले होते. याप्रकरणी,कापुरबावडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवुन 31 जुलै रोजी जाधव यांना अटक केली होती. जाधव यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी ठाण्याच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.यावेळी वकील शिरोडकर यांनी,जाधव यांच्यावर जनतेसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी राजकिय गुन्हे दाखल आहेत.तसेच, ते ठाण्यातच राहात असले तरी साक्षीदारांवर कोणताही दबाव आणणार नाहीत,अशी हमी न्यायालयाला दिली. त्यानुसार,न्यायालयाने जाधव यांना 15 हजारांच्या व्यक्तीगत जात मुचलक्यावर मुक्तता केली.

दरम्यान,न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडच्या कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती पुढे देखील अशीच लढाई जनतेसाठी सुरू राहील.असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख