ठाण्यात सेना-मनसे सोशल मिडियावरची लढाई आली रस्त्यावर - Social Media War Between MNS and Shivsena in Thane | Politics Marathi News - Sarkarnama

ठाण्यात सेना-मनसे सोशल मिडियावरची लढाई आली रस्त्यावर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

कोविडबाबतच्या  उपाययोजनेवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर शिवसेना-मनसेत सुरू झालेले सोशल वॉर आता हातघाईवर आले आहे

ठाणे  :  कोविडबाबतच्या  उपाययोजनेवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर शिवसेना-मनसेत सुरू झालेले सोशल वॉर आता हातघाईवर आले आहे. सोशल मिडीयात आक्षेपार्ह टीप्पणी करणाऱ्या मंगेश माने (रा.सिद्धेश्वर तलाव) या मनसे समर्थक तरूणाला शिवसैनिकांनी चोप देत नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

याप्रकरणी, गुन्हा दाखल करून तरूणाला अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली.नदरम्यान,सेनेच्या आमदार, खासदारांनी मनसेला प्रतीआव्हान दिल्यानंतर रविवारी शिवसेना महिला आघाडीनेदेखील पालकमंत्र्याबाबत ब्र काढल्यास तंगडया तोडू, असा इशारा दिला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

स्वतः पालकमंत्री शिंदे यांनी जाधव यांना फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली असली तरी, शिवसैनिक आणि पदाधिकारी मात्र संतापले आहेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी जाधव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत, एका रात्रीत केवळ व्हिडिओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, असा टोला हाणला. उचलून न्यायची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, असा इशारा खासदार विचारे यांनी दिला आहे. 

तर,दुसरीकडे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य असले तरी, याचा गैरफायदा कुणी घेऊ नये वसंत डावखरे, गणेश नाईक संपले... आता तुम्हीही संपाल,आणि संपल्यावर घरातून उचलून घेऊन जाऊ. असे म्हणणे, तेही पालकमंत्री आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना बोलणे चुकीचे आहे.आम्ही गप्प बसणाऱ्यापैकी नाही.असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 

दरम्यान,सोशल मिडीयातही दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.आक्षेपार्ह टिप्पणी केली म्हणुन शनिवारी रात्री मनसेचा समर्थक असलेल्या माने या तरुणाला शिवसैनिकांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. तर,रविवारी दुपारी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीने जिल्हा शाखेवर एकत्र येऊन थेट तंगडे तोडण्याचा इशारा दिला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख