सुशांतसिंह प्रकरणी लक्ष्य होणाऱ्या सेनेकडून अन्वय नाईकांच्या आत्महत्येच्या चौकशीचा पाठपुरावा - shivsena MLA demands fresh enquiery in Anvay Naik Suicide case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणी लक्ष्य होणाऱ्या सेनेकडून अन्वय नाईकांच्या आत्महत्येच्या चौकशीचा पाठपुरावा

दीपक शेलार
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

आत्महत्या करण्यापूर्वी अन्वयच्या 'सुसाईड नोट'मध्ये आत्महत्येचे कारण व संबधित वाहिनीचा पत्रकार व इतर 2 नावे लिहून ठेवली होती.पण,दाद मागुनही यातील कुणावरही कारवाई झालेली नाही, असे कुटुंबाचे म्हणणे असल्याचा दावाही सरनाईक यांनी पत्रादवारे केला आहे.

ठाणे :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या आकस्मिक मृत्युचे प्रकरण गाजत असताना 2018 साली आत्महत्या केलेल्या मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईकच्या दोषींवर कारवाई करून त्याच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सुशांतला न्याय मिळवुन देण्यासाठी वार्ताकन करून मोहीम राबवणाऱ्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराकडे (अर्णब गोस्वामी) अंगुलीनिर्देश करीत सखोल तपासाची मागणी करणारे पत्र आमदार सरनाईक यांनी दिले असुन यासाठी मृत आर्किटेक्टच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या संवादाचा व्हायरल व्हीडीओचा संदर्भदेखील जोडला आहे.

सरनाईक यांच्या पत्रानुसार,अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात संबधित वृत्तवाहीनीचे पत्रकार वार्ताकन करताना खालच्या दर्जाचे राजकारण करून अनेकांना नाहक बदनाम करीत आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस योग्य तपास करीत असताना केवळ राजकीय हेतूने आरोप करून, महाराष्ट्र सरकारची विनाकारण बदनामी आपल्या शो मधून करीत असल्याची जनतेची भावना झाली आहे.

या पार्श्वभूमीवर,मे 2018 रोजी अलिबाग येथे राहत्या घरी मृत्यू झालेल्या मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद यांच्या दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अन्वयच्या 'सुसाईड नोट'मध्ये आत्महत्येचे कारण व संबधित वाहिनीचा पत्रकार व इतर 2 नावे लिहून ठेवली होती.पण,दाद मागुनही यातील कुणावरही कारवाई झालेली नाही, असे कुटुंबाचे म्हणणे असल्याचा दावाही सरनाईक यांनी पत्रादवारे केला आहे.

या घटनेचा पोलिसांनी तपास केला नाही व गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली नाही,असा नाईक कुटुंबीयांचा आक्रोश असल्याचे नमूद करून आ.सरनाईक यांनी पत्रासोबत अन्वयच्या पत्नीचे संवाद असलेला व्हीडीओदेखील गृहमंत्र्याकडे पाठवला आहे.

सरनाईक यांच्या मागण्या
काही वर्षांपूर्वी ठाण्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात 'सुसाईड नोट' ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही ? अर्णब गोस्वामी यांचे सुसाईड नोटमध्ये पहिले नाव आहे. अर्णब गोस्वामी यांना केंद्र व राज्य सरकारमधील कोणत्या नेत्याने त्यावेळी वाचविण्याचा प्रयत्न केला ? याचीही चौकशी झाली पाहिजे. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे,पण तशीच तत्परता दाखवून अन्वयच्या आत्महत्येप्रकरणी सखोल तपास करून, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?
अलिबाग पोलिसात दाखल असलेल्या एफआयआरनुसार,पत्रकार (अर्णब गोस्वामी) यांच्या मुंबईतील स्टुडिओचे काम मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या कंपनीने केले होते.त्या कामापोटी उर्वरित रक्कम 83 लाख रुपये गोस्वामी यांनी नाईक यांना काम पूर्ण झाल्यानंतरही दिली नाही. वारंवार मागणी करूनही कामाचे हे पैसे परत न मिळाल्याने आर्थिक व मानसिक दडपण आल्याने नाईक यांनी  5 मे  2018 रोजी आत्महत्या करून जीवन संपवले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख