डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात राष्ट्रवादीला अपयश; सनातन संस्थेचा आरोप - Sanatan Targets NCP over Dabholkar Murder Case Investigation | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात राष्ट्रवादीला अपयश; सनातन संस्थेचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

डॉ. दाभोलकर प्रकरणात त्यांच्याच गृहखात्याने केलेल्या चुकीच्या तपासाचा परिणाम सनातन संस्थेला भोगावा लागत आहे, असे असताना जर राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार जर सीबीआयला अपयशी ठरवत असतील तर ते त्यांचेच अपयश आहे, अशी टीका सनातन संस्थेने केली आहे.

ठाणे : सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून तपास काढून तो सीबीआयकडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे सीबीआयला लक्ष्य करून राष्ट्रवादीचे नेते वक्तव्ये करत आहेत; मात्र डॉ. दाभोलकर प्रकरणात त्यांच्याच गृहखात्याने केलेल्या चुकीच्या तपासाचा परिणाम सनातन संस्थेला भोगावा लागत आहे, असे असताना जर राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार जर सीबीआयला अपयशी ठरवत असतील तर ते त्यांचेच अपयश आहे, अशी टीका सनातन संस्थेने केली आहे.

२०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने तपास करत, मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्र तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्तुलांनीच दाभोलकरांची हत्या झाली, याविषयीचा पुरावा म्हणून त्यांनी फॉरेन्सिक अहवालही न्यायालयात सादर केला होता. यानंतर या तपासावर असंतुष्ट असणाऱ्या दाभोलकर परिवाराने उच्च न्यायालयात याचिका करून तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली.

त्यानुसार सीबीआयने तपास चालू केला आणि तोही न्यायालयाच्या निरीक्षणाच्या अंतर्गत चालू आहे. असे असताना जर राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार आज सीबीआयला अपयशी ठरवत असतील तर ते त्यांचेच अपयश आहे. सीबीआयच्या अपयशाविषयी बोलायचे झाले, तर आर. आर. पाटील यांच्या काळातील तपासावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होतात. जर या दोन शस्त्र तस्करांचा गुन्हा फॉरेन्सिक अहवालातूनही सिद्ध होतो, तर मग त्या दोघांना क्‍लीन चीट कशी काय मिळाली? याबाबत ना दाभोलकर परिवार, ना तत्कालीन राज्य सरकार कोणीच काही बोलत नाही, असे प्रश्‍न सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी उपस्थित केले आहेत.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख