पालघर : नौदलातील जवानाचे अपहरण करुन त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. या नौदल जवानाचे चेन्नईतून अपहरण करण्यात आले होते. त्याला पालघरमधील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. यावरुन भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या घटनेच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, या घटनेच्या मुळाशी जाऊन छडा लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या तो जवान ज्या ठिकाणी नियुक्तीस होता तेथून काही माहिती हाती लागते का, हे पाहण्याचे काम महाराष्ट्र पोलीस करीत आहेत.
यावरुन राम कदम यांना राज्य सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनल्यापासून पूर्ण राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. पालघरमध्ये आधी साधुंची हत्या झाली होती. त्यांना न्याय मिळण्याआधीच आता जवानाची हत्या झाली आहे. महाराष्ट्रात आता साधूंबरोबर जवानही सुरक्षित नाहीत.
याविषयी पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले होते की, हत्या झालेल्या नौदल जवानाचे नाव सूरजकुमार दुबे (वय 27) असे आहे. तो कोईमतूर येथील नौदल प्रशिक्षण विद्यालय आयएनएस अग्रणीमध्ये नियुक्तीस होता. तो गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आम्हाला सापडला होता. त्याचे दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते.
दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे चेन्नई विमानतळाजवळून अपहरण करण्यात आले होते. अपहरण करुन त्याला पालघरमध्ये आणण्यात आले होते. नंतर पेट्रोल टाकून त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला आम्ही सुरवातीला कॉटेज रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्याला नौदलाच्या कुलाब्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. तो 90 टक्क्यांहून अधिक भाजल्याने नौदलाच्या रुग्णालयात पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला, असे शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबे हा मूळचा रांची येथील होता. तो 30 जानेवारीला रजा संपवून विमामाने चेन्नईला गेला होता. विमानतळाजवळ तीन अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वर दाखवून त्याचे अपहरण केले आणि त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी त्याला पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीमधून नेले. त्याला तीन दिवस चेन्नईत ठेवण्यात आले होते.
नंतर 5 फेब्रुवारीला त्याला पालघरमधील घोलवाडा जवळील देवजी वैजलपाडा येथे नेण्यात आले. तेथे त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Edited by Sanjay Jadhav

