परतीच्या रेल्वेसाठी  चाकरमाने घेणार राज ठाकरेंची भेट - Konkan Residents to Meet Raj Thackeray for Starting of Trains | Politics Marathi News - Sarkarnama

परतीच्या रेल्वेसाठी  चाकरमाने घेणार राज ठाकरेंची भेट

दीपक शेलार
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत रेल्वे प्रवासाचे नियोजन करून त्यांच्या परतीच्या प्रवासाचीही विशेष काळजी सरकारने घेतली. मात्र, कोकणी जनतेला दामदुप्पट प्रवास भाडे आणि ई-पासच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा,राज्य सरकारकडून न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याची भावना चाकरमान्यांची झाली आहे

ठाणे : राज्य सरकारच्या धोरणशुन्य कारभारामुळे सतत पाठपुरावा करूनही चाकरमान्यांना गणेशोत्सवाला जाण्यासाठी विषेश रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत असताना कोकणच्या चाकरमान्यांना न्याय देण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घालणार आहे. कालच राज यांनी मुंबईतल्या जिमचालकांना दिलासा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता चाकरमानेही राज यांच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.

त्यानुसार येत्या ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची भेट घेऊन गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष कोकण रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजु कांबळे आणि सुजीत लोंढे यांनी दिली.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवूनही २२ऑगस्टपासुन होणाऱ्या गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. राज्य सरकारने एसटी बस सेवा सुरू केल्या तरी समन्वयाअभावी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

अन्याय होत असल्याची चाकरमान्यांची भावना

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करावी, यासाठी,जून महिन्यापासुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सक्षम नसून केवळ नियमांचे कागदी घोडे नाचवुन सरकारने अन्यायच केला असल्याची भावना समस्त कोकणवासियांची झाली असल्याचे कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून सांगण्यात आले. राज्य शासनाने वेळेत नियमावली बनवून रेल्वे प्रशासनाकडे पाठवली असती तर,अनेक चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाला जाऊ शकले असते. परंतु,नियोजनशुन्य कारभारामुळे चाकरमान्यांची निराशा झाली. तेव्हा,आता कोकणातुन परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

दामदुप्पट भाडे आणि ई-पासचा जाच

गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत रेल्वे प्रवासाचे नियोजन करून त्यांच्या परतीच्या प्रवासाचीही विशेष काळजी सरकारने घेतली. मात्र, कोकणी जनतेला दामदुप्पट प्रवास भाडे आणि ई-पासच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा,राज्य सरकारकडून न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याची भावना चाकरमान्यांची झाली आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घालण्यात येणार आहे. त्यानुसार, किमान,परतीच्या प्रवासासाठी तरी,रेल्वे सुरू करा, या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ,ठाणेचे पदाधिकारी कृष्णकुंजवर धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख