पालघर : नौदलातील अधिकाऱ्याचे अपहरण करुन त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. या नौदल अधिकाऱ्याचे चेन्नईतून अपहरण करण्यात आले होते. त्याला पालघरमधील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते.
या विषयी पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, हत्या झालेल्या नौदल अधिकाऱ्याचे नाव सूरजकुमार दुबे (वय 27) असे आहे. तो कोईमतूर येथील नौदल प्रशिक्षण विद्यालय आयएनएस अग्रणीमध्ये नियुक्तीस होता. तो गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आम्हाला सापडला होता. त्याचे दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते.
A Navy official succumbed to injuries today after being set on fire by unidentified persons in the jungles of Vevaji in Palghar, Maharashtra following unfulfillment of their demand for a ransom of Rs 10 lakhs. He was abducted from near Chennai airport: Palghar SP Dattatray Shinde
— ANI (@ANI) February 6, 2021
दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे चेन्नई विमानतळाजवळून अपहरण करण्यात आले होते. अपहरण करुन त्याला पालघरमध्ये आणण्यात आले होते. नंतर पेट्रोल टाकून त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला आम्ही सुरवातीला कॉटेज रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्याला नौदलाच्या कुलाब्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. तो 90 टक्क्यांहून अधिक भाजल्याने नौदलाच्या रुग्णालयात पोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला, असे शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबे हा मूळचा रांची येथील होता. तो 30 जानेवारीला रजा संपवून विमामाने चेन्नईला गेला होता. विमानतळाजवळ तीन अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वर दाखवून त्याचे अपहरण केले आणि त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी त्याला पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीमधून नेले. त्याला तीन दिवस चेन्नईत ठेवण्यात आले होते.
नंतर 5 फेब्रुवारीला त्याला पालघरमधील घोलवाडा जवळील देवजी वैजलपाडा येथे नेण्यात आले. तेथे त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Edited by Sanjay Jadhav

