अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी गृहखाते गंभीर नाही : प्रताप सरनाईक  - Home Department not serious about Naik's suicide: Pratap Saranaik | Politics Marathi News - Sarkarnama

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी गृहखाते गंभीर नाही : प्रताप सरनाईक 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहखाते गंभीर आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका मराठी आर्किटेक्‍टच्या मृत्यूच्या तपासाबाबत गृहखाते गंभीर नसल्याने या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी थेट मंत्रालयासमोर सत्याग्रह करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 

ठाणे : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहखाते गंभीर आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका मराठी आर्किटेक्‍टच्या मृत्यूच्या तपासाबाबत गृहखाते गंभीर नसल्याने या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी थेट मंत्रालयासमोर सत्याग्रह करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी या सत्याग्रहासाठी परवानगी मिळावी; म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयासहित दुपारी बारा वाजता मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असे आवाहन सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केले आहे. तसेच, या विषयात मुख्यमंत्री यांनी स्वत: लक्ष घालून अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. 

मुंबईतील मराठी आर्किटेक्‍ट अन्वय नाईक यांचा पाच मे 2018 रोजी अलिबाग येथे राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अन्वय नाईक यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट पोलिसांना प्राप्त झाल्याने या गुन्ह्यासंदर्भात ती सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली होती. परंतु या प्रकरणाचा तपास तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्यांच्या दबावामुळे योग्य प्रकारे होऊ शकला नसल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून मी सुद्धा गृहमंत्र्यांना पत्र देऊनही या प्रकरणासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन गृहखात्याकडून मला मिळाले नाहीत. त्यामुळेच, या विषयात लक्ष वेधण्यासाठी सत्याग्रहाचा इशारा दिला आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा : आमदार दिलीप मोहिते यांना कोण धमकी देणार आहे? 

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी अधिकाऱ्यांना अडथळे आणायचे काम करू नये. तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या साथीची गंभीर परिस्थिती आहे. असे असताना सर्व प्रशासनाला आमदारांनी विश्वासात घेऊन कामाला लावले पाहिजे, त्याऐवजी मोहिते त्यांच्या बदल्या करण्याच्या मागे लागले आहेत. सध्या परिस्थिती काय आणि आमदारांचे चाललंय काय? तुमच्या मर्जीतील अधिकारी येथे आणून तुम्हाला चुकीची कामे करायची आहेत का? असा सवाल माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी विरोधक असलेल्या मोहिते यांना लक्ष्य केले आहे. 

आमदार मोहिते यांनी तहसीलदार आमले यांच्या पतीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील शिवसेना शाखेत पत्रकारांशी गोरे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे रामदास धनवटे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख