व्होल्टास कोविड रुग्णालयाच्या निविदेत गैरव्यवहाराचा ठाणे भाजपचा आरोप - BJP Accuses Irregularity in Thane Covid Hospital Tender | Politics Marathi News - Sarkarnama

व्होल्टास कोविड रुग्णालयाच्या निविदेत गैरव्यवहाराचा ठाणे भाजपचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

व्होल्टासच्या कोविड रुग्णालयासाठी वैद्यकिय साहित्याबरोबरच वीज, पाणी, सिव्हील वर्कबाबत तांत्रिक व आर्थिक मान्यता घेतली गेली नाही. परिणामी निविदा १४ कोटींपर्यंत पोहोचली, असा आरोप संजय वाघुले यांनी केला. प्रत्यक्षात किमान आठ कोटींमध्ये काम पूर्ण होऊ शकले असते, असा दावा वाघुले यांनी केला आहे.

ठाणे : सिडकोच्या निधीतून व्होल्टास कंपनीच्या जागेवर कोविड रुग्णालय उभारण्याच्या निविदेच्या कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे कोरोना काळातील आणखी एका गोंधळ उघडकीस आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. सुमारे बारा कोटींच्या रुग्णालयाच्या कामाचे कंत्राट सुमारे तेवीस कोटींपर्यंत पोहोचले आहे. विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर ठेवण्यासाठी राजकीय दबावापोटी सरकारी नियमांचीच पायमल्ली झाली आहे, त्यामुळे संशयास्पद निविदेला स्थगिती देऊन अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

सिडकोच्या निधीतून या हॉस्पिटलचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचेही लक्ष वेधण्यात आल्याची माहिती संजय वाघुले यांनी दिली आहे. व्होल्टास कंपनीच्या जागेवर रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोने महापालिकेला तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियोजित कोविड रुग्णालयाची निविदा ३१ जुलैला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, राज्य सरकारच्या वेबसाईटवर ती पाच ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. 

''त्यासाठी हेतूपुरस्सर दिरंगाई केली गेली. त्यानंतर अचानक कामाचे नाव बदलून कोविड रुग्णालय कन्स्ट्रक्‍शनऐवजी हॉस्पिटल डेव्हलोपमेंट असे करण्यात आले. निविदा भरण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार पर्यंत मुदत होती. मात्र, 13 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता अटी व शर्ती बदलण्यात आल्या. नव्या अटीत कंत्राटदाराला सिव्हील वर्कचा अनुभव अपेक्षित होता. नव्या अटींनुसार निविदा भरण्याची वेळ चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आली. विशेष म्हणजे अटी व मुदत बदलण्याची जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक निविदेमध्ये प्री-बिड करण्याची अट राज्य सरकारने निश्‍चित केली आहे. मात्र, या टेंडरमध्ये प्री-बिड करण्यात आलेले नाही,'' याकडे नगरसेवक संजय वाघुले यांनी आयुक्त शर्मा यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

व्होल्टासच्या कोविड रुग्णालयासाठी वैद्यकिय साहित्याबरोबरच वीज, पाणी, सिव्हील वर्कबाबत तांत्रिक व आर्थिक मान्यता घेतली गेली नाही. परिणामी निविदा १४ कोटींपर्यंत पोहोचली, असा आरोप संजय वाघुले यांनी केला. प्रत्यक्षात किमान आठ कोटींमध्ये काम पूर्ण होऊ शकले असते, असा दावा वाघुले यांनी केला आहे.

आवश्‍यक कागदपत्रांविना दोन कंत्राटदार शर्यतीत!
संबंधित निविदेसाठी चार कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. मात्र, त्यातील दोन निविदा फेटाळण्यात आल्या. आता केवळ दोन कंत्राटदारच अंतिम शर्यतीत आहेत. त्यावरुन संबंधित कामासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाली नसल्याचे उघड होत आहे. या कामासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांनी रुग्णालय उभारणी, व्हेंटीलेटर पुरवठा, मेडिकल व ऑक्‍सिजन पुरवठा, सिव्हील कन्स्ट्रक्‍शन आदींचा अनुभव असलेली प्रमाणपत्रे सादर केली नसल्याचे टेंडर वेबसाईटवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना कोणत्या निकषावर पात्र ठरविण्यात आले, असा प्रश्न नगरसेवक संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख