आता गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येऊन मोदी-शहांना टक्कर द्यावी!

शीर्षस्थ नेत्यांनी नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) पंख छाटले आणि आता फडणवीसांची कारकीर्द ऐन भरात आली असताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीसांचेही पंख छाटून टाकले.
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin GadkariSarkarnama

राष्ट्रीय स्तरावर नेता होणे, हे सोपी गोष्ट नसते. यशवंतराव चव्हाण, शरद पवार (Sharad Pawar) या महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधानपदाच्या शर्यती पोहोचण्याची धडक मारली. दुसरीकडे भाजपकडून प्रमोद महाजन, (Pramod Mahajan) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या अकाली निधनाने या नेत्यांचीही दिल्लीतील कारकिर्द संपृष्टात आली. आता भाजपचा सर्वत्र बोलबाला असताना महाराष्ट्रातील नेत्यांनाही दिल्लीत दूर सारले जात आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे 2013 मध्ये दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची तयारी होत असताना अचानक त्यांच्या कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडले. या छाप्यांतून काहीच आढळले नाही. पण भाजप अध्यक्षाची निवड होण्याच्या वेळीच या छाप्यांनी टायमिंग साधले. त्यामुळे गडकरी यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची संधी हुकली. त्यानंतर राजनाथसिंह हे पक्षाचे अध्यक्ष झाले. तेथून नरेंद्र मोदी यांचा बोलबाला देशात सुरू झाला. गडकरी अध्यक्ष असते तर मोदींची अशी निरंकुश सत्ता निर्माणच झाली नसती, असे आजही बोलले जाते. गडकरी हे आपले स्पर्धक होतील म्हणून दिल्लीतील नेत्यांनी त्यांना राजकीय प्रक्रियेत फारसे स्थान ठेवलेेले नाही. तुम्ही आणि तुमचे खाते, एवढेच पाहा, असे संदेश देण्यात आला आहे. त्या अर्थाने नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी गडकरींना निर्णय प्रक्रियेतून बेदखल केले आहे. तसेच आता देवेंद्र फडवणीस यांचे पंख छाटण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कधी नव्हे येवढी उलथापालथ गेल्या दोन तीन दिवसांत झाली. जे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते, ते उपमुख्यमंत्री झाले आणि जे उपमुख्यमंत्री होणार होते, ते मुख्यमंत्री बनले. शेवटच्या क्षणी येवढा मोठा आणि धक्कादायक बदल होण्याची बहुधा महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू झाली नसती, तर नवलच.

काल सायंकाळपासून फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) समर्थकांमध्ये निराशेची आणि काही अंशी संतापाची भावना बघायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांनी तर मोदी (Narendra Modi) शहांबाबत (Amit Shah) भलेबुरे बोलून भडास काढून घेतली. भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांकडून भरारी घेत असलेल्या नेत्यांचे पंख छाटण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे या नेत्यांचे पंख छाटण्याचे कार्यक्रम झालेले आहेत. यांपैकी तावडे आणि मुंडे आजही राष्ट्रीय संघटनेत आपले योगदान देत आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरली अन् आमदार झाले. बावनकुळेंचेही पुनर्वसन झाले.

उपरोक्त नेत्यांचे पंख छाटण्याची जबाबदारी मोदी-शहांनी फडणवीसांवर टाकली होती. तेव्हा फडणवीसांनी अनिच्छेने हे निर्णय जाहीर केल्याचे सांगितले जात होते. खासकरून बावनकुळेंच्या बाबतीत ते अतिशय भावुक झाल्याचे तेव्हा बघायला मिळाले होते. या सर्व प्रक्रियेमध्ये फडणवीसांना जवळ करून गडकरींना दूर लोटण्याचेही उद्योग आपसूकच घडले.

शीर्षस्थ नेत्यांनी फडणवीसांच्या हातून गडकरींचे पंख छाटले आणि आता फडणवीसांची कारकीर्द ऐन भरात आली असताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीसांचेही पंख छाटून टाकले. काल पत्रकार परिषदेत आणि त्यानंतरही फडणवीसांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपता लपत नव्हती. शरद पवारांनी तर तसे बोलूनही दाखवले. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत असे राजकारण खेळून वरिष्ठांना साधायचे तरी काय आहे, असा प्रश्‍न आम जनतेला पडल्यावाचून राहात नाही.

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
फडणवीस नाराज दिसत होते, हे शरद पवारांच्या नजरेेनेही टिपले..

गडकरी आणि फडणवीस यांनी तोंडावर किंवा माध्यमांसमोर दोघांतील मतभेदांची कधीच वाच्यता केली नाही. हे दोघे सुसंस्कृत नेते आहेत. एकाच शहरातील असले तरी एकमेकांचे राजकारण संपविण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्या बाजूने दोन्ही बाजूंनी संयम ठेवण्यात आला आहे. पण आता श्रेष्ठींनी दोघांचेही पंख छाटल्यानंतर गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

मोदी-शहांच्या जोडीला टक्कर देतील असे दोनच नेते महाराष्ट्रात आणि देशात आहेत. गडकरी यांनी आपल्या कामातून देशात छाप उमटवली आहे. मोदी सरकारने केलेल्या कामांत गडकरींची बाजू उजवी आहे. फडणवीस यांनीही मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात प्रभावी काम केले. महाराष्ट्रभर या दोन्ही नेत्यांचा सर्वपक्षीय जनतेमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. नजीकच्या भविष्यात हे दोन्ही एकत्र आले तर त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल. सध्या भाजपमध्ये अमित शहा यांच्या इच्छेनुसारच काम सुरू आहे. दोन गुजराती नेते एका मनाने आणि एकदिलाने काम करून देशावर राज्य करू शकतात तर महाराष्ट्रातील या दोन नेत्यांना का जमू शकत नाही? मोदी आणि शहांच्या विरोधात कोणी ब्र देखील काढू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातून अनेकदा एकतर्फी निर्णय होत आहेत. त्याला अटकाव गडकरी आणि फडणवीस हेच करू शकतात. त्यामुळेच आता या दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com