फडणविसांनी खडसेंना भाजपमधून संपवलं.. यात खडसेंच काय चुकलं?

खडसेंचे पुनर्वसन करणे भाजपला सहज शक्य होते. तरीही ते का टाळले? यात एकट्या फडणविसांनी खडसेंचा राजकीय गेम केला की त्याला केंद्रीय नेतृत्त्वाचीही साथ होती, हा प्रश्नच आहे.
eknath khadase devendra_fadnavis
eknath khadase devendra_fadnavis

भाजपचे एकेकाळचे चेहरा असलेल्या एकनाथ खडसे यांनी कमळाची साथ घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. सलग चार दशके पक्षात राहून पक्ष महाराष्ट्राच्या गावखेड्यात पोहोचवण्याचं खडसे यांचं योगदान वादातीत आहे. मात्र एवढा मोठा कालखंड भारतीय जनता पक्षात राहून देखील केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसेंना शह मिळवता आला नाही. हे खडसे यांचेच अपयश नाही का?

कोणताही पक्ष आणि त्यातील नेत्यांना असणारे अंतर्गत विरोधका हे राजकारणात नवं नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच चालत आलंय. किंबहुना राजकारणाचा तो अविभाज्य भागच असतो. मात्र एखादा पक्षांतर्गत विरोधक वारंवार आपले डावपेच टाकत असेल आणि त्यात तोच दरवेळी प्रभावी ठरत असेल तर हे अपयश पराभूत होणाऱ्याचेही नाही का?  खडसे ज्यावेळी राज्य पातळीवरील नेते म्हणून प्रभावी होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा राज्याच्या पातळीवर जन्मही झाला नसेल. मात्र तरीही खडसेंच्या कारकिर्दीचा विचार करता काल-परवा आलेले फडणवीस खडसे यांच्यावर वरचढ ठरले. यावर खडसेंनी आत्मचिंतन करावं, अशी परिस्थिती म्हणता येईल.

खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस वगळता माझी कोणाबद्दल काहीही तक्रार नाही, असे सांगीतले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे, खडसे यांनी फक्त आणि फक्त फडणवीस यांच्यामुळेच भाजपची साथ सोडली. केंद्रीय नेतृत्वावर कोणतीही टीका टिपण्णी त्यांनी केली नाही. पण याच केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास संपादन करायला खडसे कमी पडले, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. खडसेंना हे जमलं असतं तर कदाचित खडसेंना चार दशके असलेल्या पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली नसती. केंद्रीय नेतृत्वाला आपली फारशी दखल घ्यावी वाटली नाही, याचंही चिंतन खडसेंना क्रमप्राप्त आहे.

भारतीय जनता पक्षाचाच विचार केला तर अंतर्गत विरोध आणि राजकारणाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही सामोरे जावे लागले. यातून मुंडे अनेकदा खचले पण पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय त्यांनी घेतला नाही. कदाचित त्यांच्या मनात विचार आलाही असेल, मात्र ते पक्षांतर्गत लढत राहिले आणि त्यांनी त्यात यशही मिळवले. पक्षात राहून पक्षांतर्गत विरोध थोपवण्यात मुंडे यशस्वी झाले, असं म्हणणं धाडसाचं ठरणारे असले तरी ते अपयशी झाले, असाही निष्कर्ष काढता येणार नाही. कारण केंद्रात सत्ता आली आणि ते मंत्रीही झाले. मात्र त्यांचेच शिष्य असणाऱ्या खडसेंना हे का जमलं नाही? हा नक्कीच चर्चेचा विषय ठरु शकतो.

राष्ट्रवादीच्या दिग्गजांच्या रांगेत खडसे !

खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केल्यानंतर त्यांना आता राष्ट्रवादीतील दिग्गजांच्या रांगेत बसावं लागणार आहे. बहुजन चेहऱ्याचाच विचार केला तर त्यांची स्पर्धा छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याशी असेल. शिवाय अजित पवार यांना पुण्यात खडसे यांच्या प्रवेशाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी 'मला काही माहिती नाही', असे उत्तर दिले होते. राजकीय दृष्ट्या हेही अधोरेखित होण्यासारखेच आहे.

खानदेशात राष्ट्रवादीला भक्कम करण्याचं आव्हान !

खडसे हे राज्य पातळीवरील चेहरा असले तरी त्यांना राष्ट्रवादी खानदेशात मजबूत करण्याचं आवाहन असेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर गुलाबराव देवकर आणि विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीचे चेहरे होते. मात्र आता देवकर यांचं राजकीय दृष्ट्या घटलेलं वजन आणि गावित पक्षात नसल्याने खसडे यांना पक्ष बांधणीची मेहनत करावी लागणार आहे. त्यात त्यांना किती स्वातंत्र्य मिळणार आणि कसा प्रतिसाद मिळणार, यावर पुढचे आडाखे अवलंबून आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com