शिवसेनेचे बदलतं गेलेलं चारित्र्य

वेगवेगळ्या कालखंडात ठाकरे घराण्यातल्या तीन पिढ्यांनी केलेली ही वक्तव्यं, शिवसेनेचे बदलत गेलेले चारित्र्य या तीन वक्तव्यांमधून स्पष्ट होते.  
Balasaheb Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeraysarkarnama

१९६६ - "माझा बाळ महाराष्ट्राला देतोय." -प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना (Shivsena) स्थापना दिन सभा, शिवाजी पार्क

२०१२ - "मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरुन जा. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडं नाही. उद्धव, आदित्यला मी लादलेलं नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढंही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या." -बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) , दसरा मेळावा, शिवाजी पार्क

२०२२ - "माझ्याच लोकांना मी नको असेन तर मी मुख्यमंत्रीपदच काय पण शिवसेना प्रमुखपदही सोडायला तयार आहे. तसं समोर येऊन सांगा." -उद्धव ठाकरे (Aditya Thackeray), शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाळीनंतर

वेगवेगळ्या कालखंडात ठाकरे घराण्यातल्या तीन पिढ्यांनी केलेली ही वक्तव्यं आहेत. शिवसेनेचं बदलत गेलेलं चारित्र्य या तीन वक्तव्यांमधून स्पष्ट होतं.

पहिलं वक्तव्य १९ जून १९६६ या दिवशीचं आहे, ज्या दिवशी शिवसेनेचा जन्म झाला. त्याला पार्श्वभूमी आहे ती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मराठीजनांच्या चळवळीची. मराठी लोकांच्या प्रचंड संतापापुढं कॉंग्रेसच्या तत्कालीन केंद्र सरकारला सपशेल माघार घ्यावी लागली आहे. मुंबई महाराष्ट्राला देऊन महाराष्ट्राची निर्मिती करणं नेहरू सरकारला भाग पडलं आहे. मात्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन सहा वर्षे झाल्यानंतरही प्रामुख्यानं मुंबईतल्या मराठी माणसांना नोकरी, व्यवसायात दुय्यम स्थान दिलं जात असल्याची लोकभावना आहे. ही खदखद, हा प्रक्षोभ शिवसेनेच्या जन्मास अनुकूल ठरली. 

मराठी माणसांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरही संघर्ष अटळ आहे, म्हणून मी माझा मोठा मुलगा समाजकार्यासाठी देतो आहे, अशी त्याग भावना १९६६ मध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी व्यक्त केली.

Balasaheb Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
शिवसेना बॅकफूटवर : शिंदे गोटातील आमदारांच्या वाढत्या संख्येमुळे उद्धव ठाकरेंची माघार!

घराणेशाहीवरून बाळासाहेबांनी आयुष्यभर कॉंग्रेसवर आणि १९९९ नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेचे प्रहार केले. बाळासाहेबांनी सन २०१२ मध्ये त्यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उपस्थिती लावली. 'एक नेता, एक निशाण, एक मैदान,' अशी सलग ४६ वर्षांची विक्रमी परंपरा या दसरा मेळाव्याला होती. आयुष्यातल्या या शेवटच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे सैनिकांना आदेश देत शिवसेनेचं नेतृत्त्व ठाकरे घराण्याच्याबाहेर जाऊ शकत नाही, शिक्कामोर्तब केलं. सन २०१२ च्या त्या सभेत आदित्य ठाकरे यांचं वय २२ वर्षांचं होतं. या सभेनंतर आदित्य हे लगोलग अखिल शिवसेनेसाठी नवे 'साहेब' झाले. चंद्रकांत खैरेंसारखा तीनदा खासदार झालेला माणूस त्यांचे पाय धरताना शिवसैनिकांनी पाहिला.

मराठी माणसांचे कल्याण साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली शिवसेना आता 'ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड' असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी २०१२ मध्ये स्पष्ट केले.

२०१४ मध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी असणारी २९ वर्षांची युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही मात्र भारतीय जनता पक्ष विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. शंभरपेक्षा जास्त ठिकाणी जनतेने भाजपाचे आमदार निवडून दिले. मात्र बहुमताचा आकडा जुळत नसल्यानं सत्ता स्थापन होईना. त्यावेळी भाजपाने पाठिंबा न मागताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांनी बिनशर्त पाठींबा जाहीर करुन टाकला. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची चलबिचल वाढली. उद्धव ठाकरे यांच्यावरचा दबाव वाढला. होय नाही करता, करता शिवसेनेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे तणावात गेली. तरीही २०१९ मधली निवडणूक भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे लढवली. त्याहीवेळी भाजपा-शिवसेनेने सत्ता स्थापन करावी असा स्पष्ट कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांच्या इतिहासातल्या सर्वात कमी जागा देऊन जनतेने त्यांना विरोधात बसण्याची सूचना केली. मात्र भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सांगण्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शरद पवारांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्रीपद स्विकारले.

Balasaheb Thackeray, Aditya Thackeray, Uddhav Thackeray
मोठी बातमी : मनधरणीसाठी सूरतला गेलेले रवींद्र फाटकच एकनाथ शिंदे गोटात सामील

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभुतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंपुढचे पर्याय संपले. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतरच्या हताश, हतबल क्षणी ठाकरेंनी शेवटचा पर्याय म्हणून भावनिक आवाहन करत मुख्यमंत्रीपदच काय शिवसेनेचं प्रमुखपद सोडण्याची भाषा २२ जून २०२२ च्या रात्री केली. मुख्यमंत्र्यांसाठीचं अधिकृत निवासस्थान वर्षा सोडून ते स्वगृही परतले. विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर 'वर्षा' सोडण्याच्या नामुष्कीपेक्षा हा पर्याय अधिक चांगला. शिवाय त्यालाही पुन्हा भावनिक डूब देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. 

या तिन्ही प्रसंगांमधून बदलत गेलेली शिवसेना दिसते. तुम्ही शिवसेना समर्थक आहात, विरोधक आहात की तटस्थ राजकीय निरीक्षक यावर तुमचे अनुमान ठरेल.

सुकृत करंदीकर (लेखक मुक्त पत्रकार आहेत)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com