क्रांतीदिन आजही प्रेरणादायी !

आजही 9 ऑगस्ट क्रांतिदिनाची आठवण आली की तिरंगा फडकवणार्‍या अरुणा असफअलींची छबी नजरेसमोर तरळत राहते.
2pawar_ulhas_ff.jpg
2pawar_ulhas_ff.jpg

नऊ ऑगस्ट हा भारताच्या इतिहासातला महत्वपूर्ण दिवस आहे. संपूर्ण देश ढवळून काढणारा असा क्रांतीचा हा निखारा होता. या दिवशी ‘छोडो भारत’, ‘चालते व्हा’ ‘क्विट इंडिया’, ‘चले जाव’ हे मंतरलेले शब्द देशात घुमत होते. वेगवेगळ्या भाषेतले हे दोन शब्द-पण त्याचा अर्थ एकच होता. 1942 च्या जुलै महिन्यात काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यातील सेवाग्राम येथे झाली. ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या अंतिम लढ्यासाठीची रणनिती आखली गेली आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चलेजाव’चा ठराव ब्रिटीशांना अंतिम इशारा म्हणून मंजूर केला गेला. ‘ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावे व हा देश सोडून जावे’ हा परखड संदेश महात्मा गांधींनी याद्वारे दिला होता.
 
8 व 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेसचे महाअधिवेशन भरले. 8 ऑगस्ट 1942 च्या मध्यरात्री 12 वाजता मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सारे वातावरण देशभक्तीच्या भावनेने सळसळत होते. पुढे याच मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले. त्या दिवशी ‘चलेजाव’ हे दोन शब्द म्हटल्याबरोबर देश पेटून उठला. महात्मा गांधी यांनी हे दोन शब्द काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उच्चारले आणि क्षणात देश पेटून उठला. ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या अखेरच्या पर्वाला सुरुवात झाली होती.
 
या आंदोलनाची व्याप्ती सार्‍या देशभर पसरली होती. त्यावेळी भारताची लोकसंख्या साधारणतः 35 ते 40 कोटी होती. पण दोन दिवसात सार्‍या देशात चाळीस लाख लोक तुरुंगात गेले. अनेक लोकांना तुरुंगात ठेवायला जागा नव्हती. मग शाळा-कॉलेज हे सगळे भरून गेले. काहींना जागा नाही म्हणून नावापुरते अटक करुन सोडून दिले. ज्यांना तुरुंगात टाकले ते 40 लाख लोक होते. प्रत्येक 100 माणसामागे एकापेक्षा अधिक माणूस तुरुंगात होता आणि शब्द फक्त दोन ‘चालते व्हा’ ‘क्विट इंडिया’ ‘चले जाव’ असा तो महात्मा गांधींचा उच्चार. 

मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या अधिवेशनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटले. रातोरात पोलिसांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, रफी अहमद किडवाई अशा सार्‍यांना अटक केली. महात्मा गांधी व कस्तुरबा गांधींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि उर्वरीत नेत्यांना नगरच्या तुरुंगात डांबले गेले. मात्र स्वातंत्र्याच्या उर्मीची ही ज्योत विझली नाही. उलट लाखो लोक रस्त्यावर उतरले. 9 ऑगस्ट हा क्रांतिदिन त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ‘टर्निंग पॉईंट’ मानला जातो.

8 ऑगस्ट च्या मध्यरात्री ‘चलेजाव’ची घोषणा झाल्याबरोबर अनेक नेत्यांना ब्रिटिशांनी ताबडतोब अटक केली तर अनेक नेते भूमिगत झाले. मात्र जमलेली लाखोंची गर्दी हटली नाही. आता तिरंगा झेंडा कोण लावणार? हा प्रश्न निर्माण झाला. तोपर्यंत सुर्योदय झाला आणि गर्दीतून विजेच्या चपळाईने, क्षणभर विद्युल्लता जशी आकाशात चमकावी अशी एक तरुणी पुढे आली आणि तिने तिरंगा झेंडा उभारला. तेव्हा ‘भारत माता की जय’च्या नार्‍याने सारे आसमंत दुमदुमून गेले. तिरंगा फडकवून त्याला नमन करून ती तरुणी क्षणात नाहीशी झाली आणि पोलीस बघतच राहिले. हजारो पोलीसांच्या क्रुर लाठीहल्ल्याला न घाबरता तिरंगा फडकवणारी ही तरुणी होती अरुणा असफअली. आजही 9 ऑगस्ट क्रांतिदिनाची आठवण आली की तिरंगा फडकवणार्‍या अरुणा असफअलींची छबी नजरेसमोर तरळत राहते. 

तिरंगा फडकवल्यानंतर ती गर्दीत नाहिशी झाली, भूमिगत झाली आणि पुढे तब्बल चार वर्षे पोलिस तिला देशभर शोधत राहिले, पण ती सापडली नाही. अखेरीस चार वर्षांनी 1946 मध्ये तिच्यावर असलेले वॉरंट रद्द केले गेले आणि मग ती प्रकट झाली. 9 ऑगस्टनंतर सार्‍या देशातच उग्र आंदोलन पेटले. महाराष्ट्रातही हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश सत्तेला खिळखिळी करण्यास सुरुवात केली. हजारो पकडले गेले, अनेक जणांना फाशी दिली गेली. गोळीबारात देखील अनेक जण शहीद झाले. मात्र हा स्वातंत्र्यलढा पेटतच राहीला. 

महाराष्ट्रात याकाळात आष्टी चिमूर सत्याग्रह खूप गाजला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे काव्य गावागावात तरुणांना प्रोत्साहित करत होते. 
“काहे को धूम मचाते हो, दुखवाकर भारत प्यारे ।
आते है नाथ हमारे, नाव लगेगी किनारे ॥
झाड-झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना ।
पत्थर सारे बंम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना ॥”

या गीताने आंदोलन धगधगते राहिले. हजारो तरुण तिरंग्यासाठी प्राण वेचायलाही तयार झाले. असे सामर्थ्य संत तुकडोजींच्या गीतांमध्ये होते. आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटीशांनी अत्यंत निष्ठूरपणे गोळीबार केला व त्यात 11 युवक शहीद झाले. स्वातंत्र्य संग्रामातील ही खूपच मोठी घटना मानली जाते. तेव्हाच्या धुळे जिल्ह्यातील नंदूरबार येथे शाळकरी मुलांनी हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत मिरवणूक काढली. पोलिसांच्या धमकावणीला न जुमानता चाललेल्या या मिरवणूकीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये शिरीषकुमार आणि इतर चार विद्यार्थी गोळ्या लागून ठार झाले. देशाच्या संतापात त्यामुळे भर पडली नसती तरच नवल ! या आणि अशा हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या कथा आजही स्फूरण देत राहतात.

9 ऑगस्ट रोजी गवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकावणार्‍या अरुणा असफअली त्या वेळी भूमिगत झाल्या होत्या. मात्र भूमिगत असतानाही पुण्यात महात्मा गांधींना त्या भेटल्या. पुण्यातील येरवडा येथे महादेवाचे मोठे प्राचिन मंदिर आहे. तेथे प्रख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा वडिलोपार्जित बंगला व बाहेर पर्णकुटी होती. महात्मा गांधींना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केल्यानंतर काही काळ या पर्णकुटीत ठेवण्यात आले होते. पोलिसांचा सक्त पहारा होता. सेवादलाचे तरुण कार्यकर्ते तेथे महात्मा गांधींना सेवा देण्यासाठी असायचे. त्यामध्ये माझे मामा स्वातंत्र्यसैनिक कै. रामभाऊ भोसले देखील असायचे. येथेच भूमिगत असलेल्या अरुणा असफअली या वेगळे नाव धारण करुन पारशी महिलेच्या वेशात आल्या व महात्मा गांधींना भेटल्या देखील. मात्र पोलिसांना यत्किंचीतही संशय आला नव्हता. परराष्ट्र सेवेत असणार्‍या हुसेन या अधिकार्‍याने या भेटीसाठी मोठे धाडस करुन स्वतःची मोटार दिली होती. 

बंगाली हिंदू असणार्‍या या तरुणीने बॅ. असफअली यांच्याशी लग्न केले होते. पुढे 1958 मध्ये अरुणा असफअली दिल्लीच्या महापौर झाल्या. त्या डाव्या विचारांच्या होत्या. मात्र, महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा पगडा त्यांच्यावर होता. त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित केले गेले. आजही मुंबईतील क्रांती मैदानावर 9 ऑगस्ट रोजी झेंडावंदन केले जाते. ते देशभरही केले जाते. याच मैदानावर ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ हे गीत लिहिणारे कवि प्रदीप यांचा सत्कार पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते 9 ऑगस्ट 1981 रोजी झाल्याचे मला स्मरते. पुण्यातही काँग्रेस भवन येथे यादिवशी ध्वजवंदन होत असते. काँग्रेस भवन येथे ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या नारायण दाभाडे या क्रांतिकारक तरुणाच्या स्मृतीस अभिवादन केले जाते. झेंडा वंदन, क्रांती गीते, क्रांतीचे स्मरण यातून हा दिवस साजरा होत राहतो. 

1972 मध्ये मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातील गावागावांमध्ये क्रांतिदिन मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा आणि स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार व्हावा यावर कटाक्ष ठेवला होता. अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यावेळी होते. आता दुर्दैवाने ते नाहीत. काळ खुप पुढे सरकला. मला आजही आठवते की पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये अनेक वर्षे 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला गेला. आचार्य ज.स. भावे, जोशी, आक्का वैशंपायन, ताराबाई साठे, शोभनाताई रानडे अशी अनेक कितीतरी नावे. त्यावेळी खूप स्वातंत्र्यसैनिक हयात होते. सुमारे बारा वर्षांपूर्वी 9 ऑगस्टला आम्ही कॅपिटल बॉम्ब खटल्यात जे लोक अटक होते,(त्याला महाराष्ट्र कटाचा खटला म्हणतात) त्यात हयात असलेले हरिभाऊ लिमये, रामभाऊ तेलंग अशांचा विशेष सत्कार येरवडा तुरुंग येथील क्रांतिस्मारकापाशी केला. पुण्यातील येरवडा तुरुंग येथे हजारो स्वातंत्र्यसैनिकांना अटक करुन ठेवले होते. काहींना येथे फाशीही दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या क्रांती स्मारकाला तेथे जाऊन वंदन करणे हा आमचा त्यावेळी नित्यधर्मच बनला होता. 

क्रांतिकारक स्वा.सेनानी स्व. डॉ. उत्तमराव पाटील व सौ. लिलाताई पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीवर लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन डॉ.शंकरदयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अरुणा असफअली यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बाळासाहेब भारदे प्रमुख पाहूणे होते. त्यांच्यामुळेच मला या कार्यक्रमाला जाता आले. अरुणा असफअली यांनी 9 ऑगस्ट 1942 च्या तेजस्वी आठवणींना उजाळा दिला, तेव्हा उपस्थित सार्‍यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी देखील त्यांच्यापुढे अक्षरशः नतमस्तक झालो. अरुणा असफअली 1981 नंतर पुण्यात गांधीभवन येथे आल्या होत्या. पुण्यातील नाना पेठेत या क्रांतिकारक महिलेची आठवण म्हणून त्या चौकाला ‘अरुणा चौक’ हे नाव देण्यात आले आहे.
 
महाकवी ग. दि. माडगुळकर हे देखील स्वातंत्र्यसैनिक. त्यांची त्यावेळची राष्ट्रभक्तीपर गीते खेड्या पाड्यांत पोहचवण्याचे काम शाहीर शंकर निकम व इतर शाहीर गाऊन करीत. “स्वराज्य मिळवायचंय आवंदा । म्हणूनी कारभारनिया सोडलाय धंदा॥” हे गीत उदाहरण म्हणून सांगतो. महाकवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे त्यावेळचे “गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार ।” हे गीत आजही अंगावर रोमांच उभे करते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेला क्रांतिकारक तरुण चितेवरुन क्रांतिगीत सांगताना शेवटच्या चरणात आपल्या आईला उद्देशून म्हणतो-
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते । उठतील त्या ज्वालांमधुनी भावी क्रांतीचे नेते ॥
कशास आई भिजवीसी डोळे, उजळ तुझे भाल । रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल ॥

विविध कार्यक्रमात स्वा. सेनानी प्रभाकर कुंटे, प्रकाश मोहाडीकर असे अनेक नेते हे गीत गाऊन आठवणींना उजाळा देत. अशा क्रांतिकारक गीतांमुळे स्वातंत्र्याची ज्योत धगधगत राहिली नसती तरच नवल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबूल कलाम आझाद, डॉ.राजेंद्रप्रसाद, रफी अहमद किडवाई, राजगोपालाचारी चक्रवर्ती, बाबू जगजीवनराम असे अनेक नेते व महाराष्ट्रात स्व.एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, यशवंतराव चव्हाण, किसन वीर, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, तात्यासाहेब जेधे असे अनेक ज्ञात-अज्ञात नेते जीवाचे रान करुन स्वातंत्र्यासाठी लढत होते. स्वराज्य यांच्या त्यागातून मिळाले, त्याचे सुराज्यात रुपांतरण करणे हेच खरे स्मरण.

दुर्दैवाने नेहरू-गांधी यांचे कर्तृत्व आणि या दिनाचे महत्व कमी करण्याचे काम आता काही लोक करीत आहेत. मात्र इतिहास पुसून टाकण्याच्या नादात जी माणसे लागली आहेत त्यांच्यामुळे पिढ्यान् पिढ्यांचा इतिहास पुसला जाणार नाही हा विश्वास मला आहे. सत्ता आज आहे उद्या जाईल. मात्र धर्म, जात, प्रांत, वंश, भाषा यामध्ये विभागलेला व तरीही क्रांतिकारकांचा त्याग, महात्मा गांधींचे योगदान आणि काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समता या विचारांच्या त्रिसुत्रीमुळे हा देश एका धाग्यात गुंफला गेला आहे. आपले देशाचे हे वैभव कायम टिकवण्याची जबाबदारी आता तरुणांवरच आहे. हा संदेश 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनानिमित्त सर्वत्र रुजवणे मी महत्वाचे मानतो. यानिमित्त सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतीस मी अंतःकरणपूर्वक नमन करतो.
Edited  by : Mangesh Mahale  
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com