पप्पू कभी फेल नही होगा...

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी विरोधकांना आपल्या कृतीतून जबरदस्त तडाखा दिला.
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest NewsSarkarnama

Bharat Jodo Yatra : एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा मोठा नेता अख्खा देश पायी चालण्याची स्वातंत्र्योत्तर भारतातील ही पहिलीच वेळ आहे.त्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत मनात मोठे कुतूहल आणि असंख्य प्रश्नही होते.त्यामुळे यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होत ‘आखो देखा हाल' जाणून घेतला.ही यात्रा एकाचवेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना जमिनीवर आणेल यात शंका नाही.या यात्रेचे नेमके फलित काय असेल आणि यात्रेच्या माहोलाबाबतची काही निरीक्षणे...

कडाक्याच्या थंडीत पहाटे बरोब्बर सहाच्या ठोक्याला राहुल गांधी ठरल्याप्रमाणे मोटारीतून उतरतात आणि झप झप चालायला सुरवात करतात..कोणतेही हारतुरे नाहीत की नेत्यांचा गोतावळा नाही.रोज सकाळ अशीच यात्रा सुरु होते असे यात्रेत सुरवातीपासून सहभागी असलेल्या पदयात्रींनी आवर्जून सांगितले.५२ वर्षांच्या राहुल गांधींच्या चालण्याचा वेग एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. त्यांना गाठण्यासाठी त्यांच्या मागे जणू पळावेच लागते.यात कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अक्षरशः पंचाईत होते.त्यामुळे ज्यांना राहुलना भेटायची किंवा हस्तांदोलन करायची इच्छा असेल त्यांना वेगाने आणि दूरवर चालण्याची क्षमता राखावी लागते. (Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा नातू आणि राजीव-सोनिया गांधींचा मुलगा आपल्या गावातून चक्क पायी चालत जात आहे. याचे अफाट कुतूहल स्थानिक लोकांच्या मनात आहे. ते त्यांच्या डोळ्यात सहज दिसत होते.विशेषतः वृद्ध आजी-आजोबांना या तरुण नेत्याचे भारी कौतुक असल्याचे जाणवते. आपल्याकडे राजकीय नेते एक तर हेलिकॉप्टर किंवा मोटारींच्या ताफ्यातूनच फिरतात. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा नेता रोज तेही किमान २२ ते २५ किलोटीर चालतोय.आणि सलग पाच महिने चालणार आहे. याचे सर्वांनाच मोठे कौतुक असल्याचे ग्रामस्थांशी बोलताना जाणवले. त्यामुळे अगदी छोट्या गावांत किंवा वाड्या वस्त्यांतील ग्रामस्थ दारापुढे,रस्त्यावर सडा-रांगोळ्या काढून या नव्या पाहुण्यांचे मोठ्या आपुलकीने स्वागत करतात.

ज्येष्ठ अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका पुस्तकात कॉंग्रेसमधील चमचेगिरीच्या संस्कृतीवर आख्खे प्रकरण लिहले आहे.या यात्रेत राहुल गांधींनी पक्षातील चमचेगिरी हद्दपार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे पदोपदी जाणवते. कारण वाटेत राहुल केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच भेटतात.मोठे नेते,गावचे पुढारी यांना त्यांच्या जवळपास फिरकूही दिले जात नाही. वाटेत कोठेही हारतुरे स्वीकारत नाहीत की फटाक्यांची आतषबाजी होत नाही. एखाद्या राजकीय नेत्याच्या पदयात्रेतील हे वेगळेपण ठळक जाणवते.

Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News
'भारत जोडो यात्रा' चव्हाण, पाटील, कदमांची हवा.. शिंदे, पृथ्वीराजबाबा अहिस्ता-अहिस्ता

रोजच्या त्यांच्या चालण्याच्या वाटेत असंख्य सर्वसारंग येणार नमान्य महिला, मुली,तरुण, अबालवृद्ध भेटतात. प्रत्येकाशी हस्तांदोलन करत शक्य झाल्यास त्यांच्याशी गप्पा मारत राहुल चालत असतात.त्यांच्यासमवेत सलग चालण्यासाठी पोलिसांची तसेच सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी कमांडोंची अक्षरशः दमछाक होते.सलग अडीच तास चालल्यानंतर दहा किलोमीटरच्या टप्प्यावर चहासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) अर्ध्या तासांचा ब्रेक घेतात.तोही रस्त्याकडेच्या एखाद्या शेतात. चहापानात फार वेळ न दवडता थोडे फ्रेश झाले की यात्रा पुन्हा वाऱ्याच्या वेगाने सुरु होते. त्यामुळे त्यांच्यासमवेत चालणाऱ्यांची पंचाईतच होते. कारण फार कमी वेळेचा हा ब्रेक असतो.

रस्त्याच्या दुतर्फा गावांगावत लोक स्वागतासाठी उभे असतात.घराच्या माड्या राहुलला पाहण्यासाठी खचाखच भरलेल्या असतात.त्यांना हाताने अभिवादन करीत राहुल पुढे चालत राहतात.

रस्त्यातून चालताना ते शेतकरी, मजूर, कामगार, महिला-मुली यांच्याशी आवर्जून संवाद साधतात. त्यांच्या भावभावना जाणून घेतात. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले फोटोग्राफर्स त्यांची छबी भराभर टिपत असतात.

यावेळी राहुल यांच्यासमवेत असलेली दिल्लीतील सोशल मिडीयाची टीम कमालीची सक्रिय असल्याचे पदोपदी जाणवते. राहुल यांच्याबरोबर काढलेल्या प्रत्येक फोटीतील व्यक्तीशी ही टीम बोलते. त्यांना ते फोटो शेअर करते. त्यांचे अनुभव कसे आले हे विचारून नोंदवून ठेवते. तसेच दिवसभरातील महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ यात्रेच्या फेसबुक तसेच इन्स्टा पेजवर भराभर अपलोड करते.त्यामुळे त्यांना भेटलेले लोक खूष होतात.

यात्रेतील त्यांचे प्रत्येक भाषणाचे लाइव्ह स्ट्रिमींग केले जात आहेत. तसेच यात्रा मार्गावर सतत ड्रोनच्या साहाय्याने खास शूटिंग केले जात आहे. थोडक्यात सोशल मिडीयातील प्रसाराचा विचार केल्यास कॉंग्रेस पक्ष आता कुठेही मागे नसल्याचे ठळकपणे जाणवते.

ऐतिहासिक पदयात्रेचे नेमके फलित काय?

राहुल यांच्या कार्यक्षमतेबाबत सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. गांधी यांना कोणताच प्रशासकीय अनुभव नसल्याचे भाजपने जनतेच्या मनावर बिंबवले. अर्थात त्यात तथ्य असल्याने राहुल गांधींची नेहमीच पंचाईत होत असे. त्यातच समाजमाध्‍यमांवरील ट्रोलर्सनी त्यांची निर्भत्सना ‘पप्पू़' अशी करीत नेहमीच त्यांची हेटाळणी केली.भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी त्यांच्या विरोधकांना आपल्या कृतीतून जबरदस्त तडाखा दिला आहे.

रोज २५ किलोमीटर पायी चालणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यातही सलग पाच महिने चालत अख्खा देश पायाखाली घालणे म्हणजे सोपी बाब नाही. यासाठी फार मोठी मेहनत व स्टॅमिना, शिस्त अंगी असणे आवश्यक आहे. तसेच घरापासून,रोजच्या कामापासून,राजकारणापासून सलग इतका काळ बाजूला राहून सातत्याने एकच गोष्ट करणे ही अशक्य कोटीतील बाब आहे. राहुल यांच्यावर नेहमी राजकारणात सातत्य न ठेवणारा नेता अशी टीका केली जाते.या टीकेला आता राहुल यांनी या यात्रेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याच नेत्याने इतक्या वेगळ्या पद्धतीने व पायी चालत देश समजावून घेतलेला नाही.त्यामुळे ही यात्रा ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी राहुल गांधी यांची प्रतिमा नक्कीच ‘लार्जर दॅन लाइफ' होणार आहे. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचे स्थान व त्यांच्या शब्दाला यापुढे वेगळे वजन राहील यात शंका नाही. विरोधकांच्या विशेषतः भारतीय जनता पक्षाला आता यापुढे राहुल यांच्या कार्यक्षमतेवर सतत प्रश्न निर्माण करणे कठीण जाणार आहे. त्याची प्रचिती आता गेल्या दोन महिन्यांपासून येत आहे.

Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News
फडणविसांनी एकनाथ शिंदेंना फुगवले... आणि त्यांनी उद्धवजींवर सूड घेतला...

सुरूवातीला त्यांच्या पदयात्रेवर,त्यांनी परिधान केलेल्या टी शर्ट तसेच शूजवरून त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली.पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही.राहुल यांच्या या अनोख्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व पाठिंबा मिळत राहिला.त्यामुळे त्यांच्यावरील टीकेची धार आता बोथट होत जाणार आहे.

अर्थात राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे कॉंग्रेस पक्षाने तत्काळ हुरळून जाण्याचीही गरज नाही. यात्रेमुळे लगेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाईल अशी जर ‘शेखचिल्ली स्वप्ने‘ पाहण्यात काही अर्थ नाही.कारण निवडणुकीचे तंत्र वेगळे असते. त्यात भाजप आता फार पुढे निघून गेला आहे.शिवाय भाजपच्या पाठीशी पक्ष कार्यकर्त्यांचे तसेच राष्ट्रीय स्वंयस्वेक संघाच्या स्वयंसेवकांचे भरभक्कम पाठबळ आहे. त्या तुलनेत कॉंग्रेसची अवस्था दयनीय आहे.अवघ्या दोन राज्यात पक्ष सत्तेत असून कार्यकर्त्यांसमोर कोणताही ठोस कार्यक्रम नाही.

मग यात्रेचा नेमका फायदा काय?

लोकशाहीचा थोडा व्यापक अर्थाने विचार केल्यास केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नव्हे, हे सर्वांनी त्यातही माध्यमांनी लक्षात घ्यायला हवे.सशक्त लोकशाहीसाठी कणखर विरोधी पक्षही लागतोच. तसेच सत्तारुढ पक्षावर दबाव लागतो. वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका अदा करण्याची सवयच नाही.राहुल गांधी यांनी पक्षाच्या हस्तिदंती मनोऱ्यातील नेत्यांना थेट जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल.

‘मोदी है तो मुमकीन है‘ या भर्मात असलेल्या भाजप नेत्यांनाही या यात्रेमुळे थोडे जमिनीवर उतरून विरोधकांकडे पहावे लागेल यात शंका नाही.कारण विरोधी पक्ष राहिलाच कुठे,असा अविर्भाव सध्या भाजप नेत्यांच्या बोलण्यात असतो.सत्तेचा हा दर्प डोक्यात जायला वेळ लागत नाही.अनेक नेत्यांच्या डोक्यात सत्ता एव्हान गेलीच आहे.त्यामुळे २०२४ नंतर विरोधी पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाहीत, अशी शेखी पक्षाचे अनेक नेते मिरवू लागले आहेत.या नेत्यांना राहुल गांधीच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद डोळ्यात अंजन घालणारा ठरेल यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com