मोदी पर्यावरणाचे संवर्धन करणारे पंतप्रधान 

नरेंद्र मोदी यांनी जैवविविधतेच्या दृष्टीने केलेल्या प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट डॉल्फिन तसेच जैवविविधता जपणे याबाबत केलेल्या घोषणा महत्वपूर्ण आहेत.
deshmukh.jpeg
deshmukh.jpeg

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैवविविधतेच्या दृष्टीने केलेल्या प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट डॉल्फिन तसेच जैवविविधता जपणे याबाबत केलेल्या घोषणा महत्वपूर्ण आहेत. देशातील नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाने सदैव जगाला दिशा दिली आहे. पंडित नेहरुजी, इंदिरा गांधीजी, राजीवजी, नरसिंहरावजी, अटलजी, मनमोहनसिंहजी यांनी यांनी दिलेला पर्यावरण रक्षणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी मोदींनी आपल्या भूतपूर्व नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवत घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.
 
पंडित नेहरुंचे प्राणीप्रेम  
नैसर्गिक जैवविविवधतेच्या बाबतीत आपल्या देशाला निसर्गाने भरभरून दिले आहे. मानवी विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणाचा नाश होतो. परिणामी, ही नैसर्गिक धरोहर लोप पावते. या निसर्गाच्या अमूल्य ठेव्यांना जपण्यासाठी सरकारकरकडून आवश्यक कायदे करणे, उपाययोजना आखणे गरजेचे असते. आपल्या देशाच्या नेतृत्वाने स्वातंत्र्यापासूनच नैसर्गिक अमूल्य ठेवा जपण्यासाठी दूरदृष्टी दाखवली. १९६२ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीने 'नॅशनल ऍनिमल वेल्फेअर बोर्ड'ची स्थापना करण्यात आली. वन्यजीव संरक्षणासाठी अशा प्रकारचं बोर्ड स्थापन करणारं जगातील हे पहिलं भारत सरकार होतं. वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्या रुख्मिनी देवी यांच्या मार्गदर्शनात बोर्ड मार्फत चांगल्या उपाययोजना आखण्यात आल्या. नेहरुजींच्या प्राण्याबद्दल असलेल्या प्रेमाबाबत एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे त्यांनी जपानला पाठवलेली हत्तीण. अणुबॉम्ब हल्ल्यात जपानमधील प्राणिसंग्रहालायतील हत्ती मृत्यू पावल्याने जपानमधील मुलांनी नेहरुजींना पत्र लिहून त्यांच्या देशातील प्राणिसंग्रहालयासाठी हत्ती पाठवण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला अनुसरून नेहरुजींनी एक हत्तीण जपानला पाठवली होती आणि विशेष म्हणजे त्या हतींनीचं नाव त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून इंदिरा असे ठेवले होते.

जैवविविधता संरक्षण कायदा
पर्यावरण रक्षण तसेच वन्यजीवांच्या रक्षणासाठी सर्वप्रथम राज्यघटनेत तरतूद करणारा कुठला देश असेल तर तो आपला भारत देश आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने कलम ४८A अंतर्गत शासनासाठी मार्गदर्शक तत्व तर ५१A अंतर्गत नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य म्हणून पर्यावरण रक्षणासाठी तरतूद करण्यात आली. इंदिरा गांधी तर वन्यजीव संरक्षणाबाबत सदैव दक्ष असायच्या. औद्योगिक विकासासोबत प्राण्यांची तस्करी यामुळे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेत. सत्तरच्या दशकात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वन्यजीव संरक्षण कायदा आणला. १९७२ च्या या वन्यजीव कायद्याने देशासह जगाच्या वन्यजीव संरक्षणाच्या कायद्यात्मक अंगाला नवी दिशा दिली आणि हा कायदा वन्यजीव संरक्षणासाठी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरले. पर्यावरण संरक्षण अधिक परिणामकारक अधिक व्यापक करण्यासाठी राजीव गांधींनी १९८६ मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा आणला. आपला नैसर्गिक वारसा जपण्यासाठी १९८८ मध्ये राष्ट्रीय वन धोरण आखण्यात आले. २००२ मध्ये अटलजींनी जैवविविधता संरक्षण कायदा आणला.

'हाथी मेरे साथी' अभियान 
वाघांच्या बाबतीत तर आपण नेहमीच दक्षता घेतली आहे. परिणामी, आज जगातील एकूण वाघांपैकी जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाघ आपल्या देशात आहेत. दुर्मिळ होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर आखण्यात आला. याअंतर्गत टायगर रिजर्व तयार करण्यात आले. सुरवातीला टायगर रिजर्वची असलेली संख्या ९ वरून आता जवळपास ५० पर्यंत पोहचली आहे. २००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४०१ इतकी सर्वाधिक खालावली होती. वाघांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नाला अधिकाधिक चालना देण्याची गरज लक्षात घेत पंतप्रधान मनमोहसिंग यांनी नॅशनल टायगर कंन्झरवेशन आँथोरिटी (एनटीसीए)ची स्थापना केली. एनटीसीए च्या स्थापनेने व्याघ्र संवर्धनाला अधिक वेग प्राप्त झाला. १९९२ प्रोजेक्ट इलेफंट सुरू करण्यात आला. २०११ मध्ये 'हाथी मेरे साथी' हे अभियान सुरू करण्यात आले. परिणामी, हत्तीच्या संवर्धनात देखील मोठे यश आले. नैसर्गिक अन्नसाखळीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गिधाडांच्या अस्तित्वाला धोकादायक ठरणाऱ्या डायक्लोफेनेक (Diclofenace) वर देखील २००६ मध्ये बंदी घालण्यात आली होती. गेंड्याच्या संरक्षणासाठी इंडियन ऱ्हाईनो व्हिजन २०२०, हिम बिबट्या साठी स्नो लिओपार्ड प्रोजेक्ट, कासवांसाठी सी टर्टल प्रोजेक्ट,/मगरीसाठी क्रोकोडईल प्रोजेक्ट, काश्मीरमधील हंगुलसाठी प्रोजेक्ट हंगुल यासारखे अनेक प्रकल्प राबवण्यात आले आहेत.

डॉल्फिन संवर्धनासाठी प्रयत्न
डॉल्फिन हा प्राणी देखील दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्युलवन मध्ये डॉल्फिनचा समावेश होतो. गंगा नदीत आढळणाऱ्या डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे. गंगा नदीतील डॉल्फिनसह बिजी (चीन), भुलन(पाकिस्तान), बोटो (अमेरिका) या चार प्रजाती गोड्या पाण्यातच आढळतात. बिजी प्रजाती जवळपास नष्ट झालेली आहे. आपल्या देशातील गंगेतील डॉल्फिन देखील जलप्रदूषणाने त्रस्त आहेत. आपल्या देशात डॉल्फिन संवर्धनासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहेत. पाटणा येथे उभारण्यात येत असेलेले डॉल्फिन संशोधन केंद्र देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.

मोदींची भूमिका स्वागतार्ह
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात माननीय पंतप्रधानांनी जैवविविधतेच्या दृष्टीने केलेल्या प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट डॉल्फिन तसेच जैवविविधता जपणे याबाबत केलेल्या घोषणा महत्वपूर्ण आहेत. देशातील नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाने सदैव जगाला दिशा दिली आहे. नेहरुजी, इंदिराजी, राजीवजी, नरसिंहरावजी, अटलजी, मनमोहनसिंहजी यांनी यांनी दिलेला पर्यावरण रक्षणाचा वारसा पुढे चालवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या भूतपूर्व नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवत घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नसते. त्यासाठी वर्षानुवर्षाच्या कष्टांची तपश्चर्या असते. आज देशात असलेली निसर्गाची धरोहर देखील अशीच एका रात्रीत जतन झालेली नाही. त्यामागे गेल्या सत्तर, ऐंशी वर्षांच्या कष्टाची तपश्चर्या आहे. आता आपण सर्व नागरिकांनी देखील आपले कर्तव्य निभावत आपल्या पूर्वजांनी मोठ्या दूरदृष्टीने आपल्यासाठी जतन केलेली ही धरोहर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जतन करने आवश्यक आहे.
- धीरज देशमुख, आमदार आणि सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ. 

Edited  by : Mangesh Mahale    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com