`जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही!`

`जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही!`

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हा खास लेख

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी शरद पवार साहेबांविरुद्ध जेव्हा आरोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली. मी तसा त्यांच्याशी जवळून कधी बोललो देखील नव्हतो. तसेच त्यांना कधी पाहिल देखील नव्हत. परंतु ते पवार साहेबांवर टीका करत होते म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असायचा.

1995 साली आमची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर काही दिवसांनी मी MPSC चा अभ्यास करीत असताना माझ्या वर्गात असलेल्या माझ्या मित्राने एक पेपर माझ्या हातात आणून दिला आणि हा पेपर तुझ्या कामाचा आहे असे मला सांगितले. मी तो वाचला आणि त्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बरच काही लिहिलेलं होते. मी तो पेपर तसाच पवार साहेबांकडे गेलो आणि त्यांच्या हातात दिला. पवार साहेबांनी तो वाचला आणि ड्रॉवरमध्ये खाली फेकून दिला. मला एवढेच म्हणाले, ``जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही. राजकारणात कधीही अशी भावना ठेवायची नसते. आपल्यावर आरोप केले आपण विसरुन जायच असत जनता उत्तर देते.``

मुंडे यांच्या घरावर मोर्चा..

नंतर मी 1996 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि नेमकी जिल्हा परिषदेची निवडणूक संपवून जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड जाहीर झाली होती. त्याच दरम्यान काँग्रेसचे काही निवडून आलेले उमेदवार ह्यांना मुंडे साहेबांनी गायब केले होते म्हणून त्यांच्या घरावर युवक काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आणि मी त्या मोर्चाचे नेतृत्व केलं. जवळ-जवळ 20 ते 25 हजार कार्यकर्ते आम्ही जमवले होते. तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. नंतर माझ्यावर एक केस पडली. सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केलेल्याची ती केस होती. ती केस माझ्यावर पडली म्हणून माझे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद गेले. ती केस खोटी होती हे मलाही माहिती होतं आणि ती केस टाकणा-या पोलीसांनाही माहिती होत. ती कोणी केस कोणी टाकायला लावली हे आजही मला माहिती आहे. पण, त्या माणसाच मला नाव घ्यायच नाही.

`जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही!`
पद्मसिंह पाटलांबद्दल आव्हाडांनी भरभरून लिहिलं.. पवारांसाठी काय केलं, हे पण सांगितलं!

मुंडेंनी मला वाचविले..

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांशी ते सत्तेत आले तेव्हा माझी थेट ओळखच नव्हती. केस पडल्यानंतर माझ्या सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. त्याचवेळेस माझे सासरे जाऊन गोपीनाथरावांना भेटले. गोपिनाथराव पटकन त्यांना म्हणाले ‘जितेंद्र माझ्याकडे कधी का आला नाही हे सगळ सांगायला?`` त्यानंतर त्यांनी मला आत बोलावून घेतले. आणि विचारले, ``तू माझ्याकडे का नाही आलास?`` मी म्हणालो, ``तसं नाही.`` ते म्हणाले, ``अरे वेडा आहेस का?

त्यांच हे वागणं बघूनच मला लाजल्यासारखं झाल. त्यांनी लगेच त्यांचे अण्णासाहेब मिसाळ नावाच्या पीएला फोन करुन सांगितले कि, त्या केसची फाईल मागवून घ्या. तोपर्यंत त्या केसच्या चौकशीकामी अधिकारी असलेले श्री. आडे यांनी मला ह्याबाबत अगोदरच कल्पना दिली होती कि, तुमच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नाही. पण, वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. डेमला आणि श्री. झरेकर हे दोघेही माझ्यावर प्रचंड दबाव आणत आहेत. तुमचे नाव ह्यामध्ये कसेही करुन ओढावं. आडे यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. ही केस माझ्याकडून केस काढून घ्या. पण, मी खोटे काम करणार नाही, असे आडेंनी आधीच सांगितले होते. अण्णासाहेब मिसाळ यांनी फाईल मागवून घेतली. खालच्या अधिका-यांना आनंद झाला. ज्या अर्थी मुंडे साहेबांनी फाईल मागवून घेतली आहे, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपिनाथ मुंडे यांचे इतके वैर आहे कि गोपिनाथ मुंडे हे जितेंद्र आव्हाड यांची आता वाजवून टाकणार. अण्णासाहेब मिसाळ यांनी फाईल मागविल्यानंतर सकाळी 8.30 वाजता ती फाईल घेऊन स्वत: श्री. झरेकर हे मुंडे साहेबांना भेटले. मुंडे साहेबांनी फाईल बघितली आणि सांगितले की फाईल ठेवा. संध्याकाळी या. मी तुम्हांला काय करायचे ते सांगतो. सगळे अधिकारी खूश झाले कि, आता जितेंद्र आव्हाड यांच काही खरं नाही. संध्याकाळी बोलाविल्यावरती त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला कि, किती पैसे घेतले सुपारी वाजवायचे? एखाद्या माणसाच राजकीय आयुष्य तो जेव्हा घडवतो, तेव्हा कितीतरी वर्षे त्यामध्ये तो त्याची चप्पल घासत असतो. हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन केलं? सगळे अधिकारी मान खाली घालून उभे होते. त्यांनी त्या अधिका-यांना सांगितले ही फाईल ताबडतोब मागे घ्या आणि केस मागे घेतल्याचे मला कळवा. ती फाईल तशीच बंद झाली.

`जितेंद्र, त्यांनी वार केले म्हणून आपण कमरेखाली वार केले पाहिजेत असे नाही!`
`मी जास्त काही लिहिले तर राजकीय भूकंप होईल`

विधान परिषदेची ऑफरही दिली...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर एकेदिवशी सकाळीच फोन आला. ``जितेंद्र तुला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे मी आणि प्रमोदने ठरवले आहे. तुझं काय म्हणणे असेल ते तू विचार करुन पत्नी आणि सास-यांशी बोलून ठरवं. मी माझ्या पत्नीशी बोललो. पत्नीला सांगितले कि मी मेलो तरी पवार साहेबांना सोडणार नाही. माझ्यावर मुंडे साहेबांनी केलेल्या उपकाराचे ओझे होते. माझ्या पत्नीने त्यांना दोन तासांनी फोन केला आणि म्हणाली कि, तो तुमच्याशी काही बोलणार नाही व पवार साहेबांना कधीही सोडणार नाही. तर ते हसायला लागले. म्हणाले 'वेडा' आणि त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर त्यांनी हा विषय काढला नाही. खूप वेळा आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. अतिशय प्रेमळ, खांद्यावर हात टाकून त्यांच्या भाषेत ‘काय जितेंद्र’ असे बोलून ते नेहमी मला आपलेपणाने वागवायचे.

अनेकवेळा माझी आणि त्यांची टिव्हीवरती वादविवाद आणि खडाजंगी व्हायची. आदल्या दिवशीचा वादविवाद त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही दिसायचा नाही. कायम प्रेमाने जवळ घ्यायचे. खांद्यावर हात ठेवायचे. त्यांचे उडणारे केस. कंगवा फिरवणं. स्टेजवर आल्यानंतर ते ज्या स्टाईलने जनतेकडे बघायचे. ज्या स्टाईलने खिशातून कंगवा काढायचे आणि केस मागे फिरवायचे. ती स्टाईल आजही डोळ्यासमोर आहे.

29 मे 2014 रोजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मी मंत्रीपदाची शपथ घेतली. 1 तारखेला सकाळीच फोन वाजला. समोरुन आवाज आला, ``अरे जितेंद्र, अभिनंदन! गोपिनाथ मुंडे बोलतोय, मंत्री झालास ना…अरे मी मंत्री झालो पण, तू माझ अभिनंदन नाही केलसं,`` मला लाजल्यासारख झालं. म्हणालो, ``साहेब, मी कुठे तुम्हांला फोन करू? तर ते म्हणाले, तसं काही नाही. चांगल काम कर. संधी मिळाली आहे.`` त्यांनी फोन ठेवला आणि दोनच दिवसांनी सकाळी फोन वाजला. तारीख 3 जून. गोपीनाथराव गेले हा निरोप आला. हे ऐकून सगळा प्रवास डोळ्यासमोर आला. पवार साहेबांवरती त्यांनी केलेले हल्ले, पवार साहेबांनी माझ्या हातातून घेतलेला कागद, आपण कमरेखाली वार करायचा नाही, हा दिलेला संदेश, माझी केस, मुंडे साहेबांच्या मनाचा मोठेपणा. हे सगळं आजही आठवलं कि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. ते गेले याच्यावर आजही माझाला विश्वास बसत नाही. परत सांगतो एवढ्या मोठ्या मनाच्या माणसांची आज महाराष्ट्राला सर्वाधिक गरज आहे. गोपीनाथराव अमर रहे..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in