राणांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून सेनेला डिवचले, पण टायगर अभी जिंदा है..!

भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘पैलवान’ नेत्यांनी महाविकासची खेळी केली. तेव्हापासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले जात आहे.
राणांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून सेनेला डिवचले, पण टायगर अभी जिंदा है..!
Shivsena, Ravi Rana, Navnit Rana, BJPSarkarnama

नागपूर : भोंगे आणि हनुमान चालिसा या दोनच गोष्टींभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या तीन दिवसांपासून फिरते आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टहास केला. त्यांच्या या भूमिकेमागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय.

महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १०५ आमदार निवडून आणून मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तेपासून दूर राहिला. नव्हे भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘पैलवान’ नेत्यांनी महाविकासची खेळी केली. तेव्हापासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सरकार पाडण्यासाठी तारखा वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या. पण सरकार काही पडण्याचे नाव घेत नाहीये.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप जेवढ्या जोमाने प्रयत्न करीत आहे, तेवढाच महाविकासचा जोड पक्का होत चालला आहे. ईडी, सीबीआय सर्व आयुधं भारतीय जनता पक्षाने अजमावून पाहिली, पण सरकार पडण्याची सुतराम शक्यता सध्यातरी दिसत नाहीये. त्यामुळे अधिकच चिडून जाऊन भाजपने वेगळ्या मार्गाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू केले. राज ठाकरेंचा भोंगा भाजपच वाजवत आहे आणि हनुमान चालिसा प्रकरणामागेही भाजप नेत्यांचेच पाठबळ असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राणा दाम्पत्याला मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी प्रवृत्त करून भाजपने सरकार अस्थिर करण्याचा पुन्हा एक जोरदार प्रयत्न केला. पण महाविकासच्या नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ते जितका सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील, तेवढेच हे सरकार अधिक मजबूत होत जाईल’, या वक्तव्याची प्रचिती आली. तीन पक्ष मिळून महाविकासने १७५ हा आकडा विधानसभेत गाठला आणि १०५ आमदार असलेल्या भाजपला विरोधात बसवले. आता लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली आहे, तर पाच वर्ष सत्ता भोगू देणे आणि आपण विरोधकांची भूमिका बजावणे, येवढा सोपा हा कार्यक्रम आहे, असे महाविकासच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पण भाजपने केंद्रातील सत्तेच्या जोरावर राज्यातील सत्ता उलथवण्याचा चंग बांधला आहे.

Shivsena, Ravi Rana, Navnit Rana, BJP
राणा दांपत्याला उच्च न्यायालयाचा धक्का; याचिका फेटाळली

हनुमान चालिसावरून गेल्या चार दिवसांपासून राज्यात जो काही तमाशा सुरू आहे, तो राज्यातील जनता केवळ निमूटपणे बघत नाहीये, तर सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्तसुद्धा होत आहे. या विषयात नेटकरी १०० पैकी ८० प्रतिक्रिया भाजपच्या विरोधात व्यक्त करीत आहे. महत्वाचे म्हणजे ४० पैसे, ६० पैसे घेऊन सोशल मिडिया गाजवणारेही या प्रकरणात शांत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या काही प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत, त्या उत्स्फूर्त आहेत, असे समजायला काही हरकत नाही. सत्तेत असल्यामुळे शांत बसलेला वाघ म्हणजेच शिवसेना भाजपच्या ‘हनुमान चालिसा’ प्रकारामुळे खवळली आहे, त्याची प्रचिती गेले दोन दिवस खार येथे राणांचे निवासस्थान, अमरावती शहर आणि मातोश्रीवर येतच आहे. त्यामुळे शांत बसलेल्या वाघाला डिवचणे भाजपला महागात तर पडत नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतो आहे. काहीही असो पण या प्रकरणामुळे शिवसैनिकांवरील मरगळ मात्र झटकल्या गेली, हे खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.