एकनाथ शिंदेंच्या रुपाने भाजप नेत्यांच्या डोक्यात पुढची गणिते! फडणवीस दिल्लीत गेले तर....

Eknath Shinde यांना मुख्यमंत्रीपद देऊन 2024 गणिते आताच सोडविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde यांच्या रुपाने भाजपने 2014 गणित मांडल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांत आहे. भाजपच्या विरोधातील राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पक्ष काँग्रेस राजकीय दृष्ट्या कमकुवत आहेत. पण भाजपला काही प्रादेशिक पक्षांशीही झगडावे लागतेय. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीत भाजपने महाराष्ट्रालाही केंद्रस्थानी ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना अनपेक्षित मुख्यंत्रीपद हे भविष्याचीच भाजपची पेरणी आहे. सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सगळे पक्ष संपणार, महाराष्ट्रात शिवसेनाही संपत आहे, या वक्तव्यातूनही महत्वाचे दोन अर्थ निघत आहेत. (Eknath Shinde may option for BJP if Fadnavis shifted to Delhi)

भाजपची राष्ट्रीय पातळीवरील वाटचाल दोनवरुन चारशे खासदारांकडे सरकली. पण, भाजपने आपले पाय रोवताना अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे बोट धरुन नंतर त्यांचा हातच हाती पकडल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर छोटा भाऊ म्हणून राजकीय वाटचाल करताना शिवसेनाच त्यांची ‘सवत’ झाली. महाराष्ट्रात पहिले युती सरकारमध्ये मोठा भाऊ असलेली शिवसेना २०१४ च्या निवडणुकीतील युती तुटल्यामुळे काहीही वैरी झाली. सरकारमध्ये पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले मात्र त्यांच्यातील ऋणानुबंधाला तडा गेला.

२०१९ च्या निवडणुकीत एकत्र लढलेले पक्ष नंतर तर एकमेकांचे वैरीच झाले. शिवसेनेमुळे मुख्यंमत्रीपद गेल्याची भावना देवेंद्र फडणवीसांची झाली आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तेपासून दूर राहावे लागल्याची सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची झाली. त्यामुळे भाजपचा पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू शिवसेना झाली.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडांच्या निमित्ताने भाजपने आपल्या हिशोबातील पहिला डाव खेळला आहे. बंडखोरीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील असे सर्वच महाराष्ट्राच्या मनातील भाकित होते. परंतु, अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकूट चढला आणि सर्वांचेच अंदाज चुकले.

यामागे भाजपच्या भविष्यातील दोन महत्वाच्या खेळ्या असल्याचे मानले जाते. त्यात पहिली शक्यता आहे ती भविष्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे भाजपचे नेतृत्व करतील (जर, शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले, पक्षावर त्यांच्या गटाचा दावा मानला नाही गेला तर त्यांना इतर पक्षांऐवजी भाजपमध्येच स्वत:चा गट विलीन करावा लागेल), तसेच शिंदे गटाची (भविष्यात त्यांना जर शिवसेनेचे चिन्ह/पक्ष भेटला) मोजक्या जागेवर भाजपकडून मनधरणी केली जाऊन २२० पर्यंत जागा भाजप लढवेल अशी भाजपची ‘स्क्रिप्ट’ असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

आता यात काल सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे देशातील भाजप विरोधक सर्व पक्ष संपणार, महाराष्ट्रात शिवसेना संपणार हे वक्तव्य देखील महत्वाचे आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेना संपणार म्हणले असले तरी एकनाथ शिंदेंची शिवसेना वाढणार असेही ठासून म्हटलेले नाही हेही तेवढेच महत्वाचे. त्यात बुधवारी (ता. तीन ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि भविष्यात चिन्ह व पक्षाबाबतच्या वादांचे निकाल देखील महत्वाचे ठरणार आहेत.

मागच्या सव्वा महिन्यात घडलेल्या ताज्या राजकीय घटनांचा संदर्भ एकत्रित केला तर यात पहिली शक्यता चक्रावणारी आहे. यात एकनाथ शिंदे यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद जसे चक्रावणारे होते तसेच भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व करतील अशीही चक्रावणारी एक शक्यता आहे.

त्याचे कारण असे कि, आतापर्यंतच्या देशातील राजकीय बंडांमधील मोठ्या बंडांपैकी व यशस्वी बंड करण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे केंद्रीय भाजप नेतृत्वाला हे बंड खूपच भावलेले आहे. महाराष्ट्रात भाजपला देवेंद्र फडणवीस नकोयत असे नाही. मात्र, केंद्रात देखील भविष्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी नितीन गडकरी यांच्या ऐवजी किंवा त्यांच्या सोबतीला म्हणून देवेंद्र फडणवीसांना बोलविणे येऊ शकते. तसे, यापूर्वी गोवाचे तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची इच्छा नसतानाही केंद्रीय भाजपची गरज म्हणून त्यांना जावे लागले होते. तसे, अडीच वर्षांपूर्वी फडणवीसांना बोलविणे आले असल्याचे सांगीतले जाते. फडणवीस दिल्लीला गेलेच तर त्यांची राज्यातील पोकळी भरुन काढणारा ताकदीचा नेता शिंदेंच्या रुपाने भेटला आहे. जर, शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह भेटले नाही तर त्यांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यासाठी भाजप हाच सक्षम पर्याय असेल. त्यामुळे भाजप आगामी निवडणुक लढताना स्वत:चे व शिंदे गटातील असे एकूण २८८ जागा लढताना साधारण १६३ उमेदवार हे विद्यमान आमदार असतील.

२०१९ च्या निवडणुकीत १६० जागा लढविताना १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यात अपक्ष वेगळेच आहे. त्यामुळे २८८ जागा लढविल्यानंतर पक्ष स्वबळावर सत्तेत येईल, असे गणित भाजपने मांडले आहे. तत्पपुर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील शिंदे गटासोबत आलेल्या खासदारांमुळे भाजपच्या खासदारांची संख्याही वाढेल, असा भाजपच्या वरिष्ठांचा व्होरा असल्याचेही जाणकारांचे मत आहे. दक्षिण व उत्तर भारतात भविष्यात जर भाजपच्या जागा कमी कमी झाल्या तर त्याची कसर या माध्यमातून भरुन निघू शकेल, असेही गणित शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन मांडल्याची मोठी शक्यता आहे. अलिकडे शिंदेंचा वाढलेला दिल्ली दौरा आणि राज्यातील दौऱ्यांकडेही जाणकार लक्ष वेधतात.

यात दुसरी शक्यता अशी आहे कि जर शिंदे गटाला पक्ष वा चिन्ह मिळाले तरी निवडणुकीच्या वाटाघाटीत त्यांना विद्यमान आमदार व इतर १५ - २० जागा द्यायच्या. त्यामुळे पुन्हा भाजप २२० पर्यंत जागा लढवू शकतो. आणि वाटाघाटी तुटल्या (२०१४ प्रमाणे) तरीही मुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपवर आरोप करण्याचे बळ शिंदे गटाकडे नसेल. त्यातच शिवसेनेतील ठाकरे व शिंदे वादामुळे मत विभाजन त्यांचेच होऊन नुकसान पर्यायाने भाजप विरोधीच होईल, असे गणितही भाजपने आतापासूनच तयार केल्याचे मानले जाते. म्हणूनच भाजप विरोधी सगळे पक्ष संपत आहेत, महाराष्ट्रात ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना संपत असल्याचे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचे वक्तव्य महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com