पोलिस उपअधीक्षक ते बिहारचा लोकप्रिय नेता : रामविलास पासवान

राजकारणात उतरल्यावर त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता.
1R_3.jpg
1R_3.jpg

दलित समाजातील वेगळा चेहेरा अशी प्रतिमा असलेले रामविलास पासवान राष्ट्रीय राजकारणात सातत्याने वावरले. बिहारमधील नेते असूनही संपूर्ण राज्यावर मात्र ते आपली छाप पाडू शकले नाही. ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते अऩ्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री होते. त्यांचा जन्म बिहारात 5 जुलै 1946 मध्ये झाला. 2000 मध्ये लोकदलातून बाहेर पडून त्यांनी लोकजनशक्ती हा त्यांनी स्वतः काढलेला पक्ष फारसा प्रभाव पाडू शकला नाही, पण राजकारणात प्रभावी अशी त्यांची व्यक्तीगत प्रतिमा राहिली. आठवेळा ते लोकसभेचे सदस्य होते, सध्या राज्यसभेचे सदस्य होते. 

संयुक्त सोशॅलिस्ट पक्षाचे सदस्य सुरवातीच्या काळात झालेले पासवान यांनी 1969 मध्ये बिहार विधानसभेत प्रवेश केला, त्यानंतर 1974 मध्ये स्थापन झालेल्या लोकदलात सामील झाले. त्याचे सरचिटणीस झाले. आणीबाणीला विरोध केल्याने त्यांना अटक झाली.

1977 मध्ये बिहारातील हाजीपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. त्यानंतर 1980, 1989, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. 2000 मध्ये लोकजनशक्ती पक्ष स्थापून ते त्याचे संस्थापक अध्यक्ष झाले. 2004 मध्ये ते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारात रसायन, खते आणि पोलाद खात्याचे मंत्री झाले. 2004 मधील लोकसभा निवडणूक जिंकले, पण 2009 च्या निवडणुकीत पराभूत झाले, मग 2010 ते 2014 या काळात राज्यसभेचे सदस्य झाले. 2014 मध्ये सोळाव्या लोकसभेवर पुन्हा निवडून गेले.

बिहारातील दलित समाजात जन्मलेल्या पासवान यांची पिलखीच्या कोसी महाविद्यालयातून एमए आणि पाटणा विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. 1969 मध्ये बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून पोलिस उपअधीक्षक झाले. राजकारणात उतरल्यावर त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता.

आणीबाणीच्या काळात त्यांनी राजनारायण, कर्पूरी ठाकूर आणि सत्येंद्रनारायण सिन्हा यांच्यासोबत काम केले. काही काळ ते लोकबंधू राजनारायण यांच्या जनता पक्ष (एस) मध्ये होते. आणीबाणीचा पूर्ण काळात तुरूंगवासात घालवल्यानंतर ते सुटकेनंतर जनता पक्षात दाखल झाले. दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी 1983 मध्ये दलित सेनेची स्थापना केली होती. 1989 मध्ये विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रीमंडळात ते कामगार कल्याण खात्याचे मंत्री होते. 1996 मध्ये ते केंद्रीय रेल्वेमंत्रीही होते. आॅक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2001 दरम्यान ते केंद्रीय दूरसंचार आणि त्यानंतर एप्रिल 2002 पर्यंत कोळसा मंत्री होते. 

फेब्रुवारी 2005 मधील बिहार विधानसभेची निवडणूक लोकजनशक्ती पक्ष आणि काँग्रेसने लढली, पण निर्णायक बहुमताअभावी सरकार होणे अवघड झाले. लालूप्रसाद भ्रष्ट असल्याने त्यांना आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) उजव्या विचारसरणीची म्हणून नितीशकुमारना पाठिंबा नाही, अशी भूमिका पासवानांनी घेतली. त्याचवेळी त्यांचे 12 आमदार नितीशकुमारांकडे गेले, पण राज्यपाल बुटासिंगांनी विधानसभा विसर्जीत करण्याची सूचना केली, पुन्हा निवडणुका झाल्या आणि नितिशकुमारांचे सरकार आले. पण त्याचा केंद्रातील आघाडीवर परिणाम झाला नाही, लालूप्रसाद आणि पासवान दोघेही तेथे मंत्री राहिले.पासवान यांनी आपल्या कारकिर्दीत पाच पंतप्रधानांसोबत मंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते यूपीए आणि एनडीए या दोन्हीही आघाड्यांसोबत राहिले. 

2009 च्या निवडणुकीवेळी पासवान आणि लालूप्रसाद एकत्र आले, त्यानंतर मुलायमसिंह यादवही त्यांना मिळाले आणि चौथी आघाडी स्थापन केली गेली. पासवान हाजीपूरमधून 33 वर्षांत पहिल्यांदा पराभूत झाले, येथून बिहारचे माजी मुख्यमंत्री जनता दलाचे रामसुंदर दास विजयी झाले. पंधराव्या लोकसभेत पासवानांच्या पक्षाचा प्रतिनिधीच नव्हता. 2014 मध्ये ते पुन्हा हाजीपूरमधून निवडून आले, त्याचवेळी त्यांचा मुलगा चिराग जमुईमधून लोकसभेवर निवडून गेला. 2014 मध्ये आणि पुन्हा 2019 मध्ये पासवान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. 2002 मध्ये याच पासवानांनी गुजरात दंगलीचे कारण देत मंत्रीपद सोडले होते.

पासवान मुळचे बिहारातील शाहरबानीचे (जि. खगारिया). ते स्वतःला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांच्या विचाराचे अनुयायी समजतात. 

1960 मध्ये त्यांचा राजकुमारीदेवींशी विवाह झाला, तथापि 2014 मध्ये त्यांनी राजकुमारींना 1981 मध्येच घटस्फोट दिल्याचा दावा केला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना उषा आणि आशा या कन्या आहेत. 1983 मध्ये त्यांनी अमृतसरच्या रिना शर्मा या हवाईसुंदरीशी विवाह केला. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा चिराग अभिनेता आणि राजकारणी आहे.
 
पासवान यांनी 1977 मध्ये हाजीपूरमधील निवडणूक 4.24 लाख मताधिक्याने जिंकली, त्यांचे हे रेकाॅर्ड 1991 मध्ये पी व्ही नरसिंहराव यांनी मोडले. विश्वनाथप्रताप सिंहांच्या मंत्रीमंडळात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालेल्या पासवानांनी त्यांच्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला जोरदार पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते एच डी देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल या पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळातही होते.

त्यानंतर ते अटलबिहारी वाजपेयी, मग डाॅ. मनमोहनसिंग आणि आता नरेंद्र मोदी या पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ही त्यांची वाटचाल पाहता दिल्ली दरबारात आपले वजन स्थापीत करून त्याचा फायदा मिळवण्यात ते सातत्याने यशस्वी झाले होते. त्यांचा एक भाऊ खासदार तर दुसरा आमदारही होता. पासवान यांनी 2019 ची निवडणूक लढवली नाही, तरी त्यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे सहाजण बिहारातून निवडून आले, यात तिघांमध्ये त्यांचा मुलगा आणि दोन भाऊ होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com