बाळासाहेबांबद्दलचा आदर, २८८ मतदारसंघांची माहिती अन संघात लावलेली हजेरी! 

बंगालीबाबू प्रणव मुखर्जी संदर्भकोष आहेत असे सारे सांगत. महाराष्ट्र कॉंग्रेससाठी सर्वात महत्वपूर्ण राज्य असल्याचे प्रणवदांचे प्रतिपादन विलासराव देशमुख सांगत अन बाळासाहेब थोरातही. मान्सून कसा झालाय ,मुंबईत नवी जुनी कॉर्पोरेट घराणी किती कर भरताहेत याची आकडेवारीही प्रणवदा खिशात बाळगून असत
Pranab Mukherjee with Various Leaders
Pranab Mukherjee with Various Leaders

हाराष्ट्रातल्या प्रत्येक न प्रत्येक म्हणजेच २८८ मतदारसंघांची प्रणवदांना माहिती आहे; तरूण व वृध्द नेते ,पिकपाणी ,जातीय समीकरणे आणि छोटे मोठे उठाव......कॉंग्रेस महाराष्ट्रातल्या सर्वात मोठया संकटाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्मितीचा काळ अनुभवत होती तेंव्हा तत्कालिन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांनी सांगितले होते. या संकटात गरज पडेल तेंव्हा दोघांनी बरोबर यावे याची सोय तेच बघतील हे ही आडून सांगितले जात होते. निवडणुकांनंतर लगेच दोघे सरकार स्थापनेसाठी एकत्र आले, तेंव्हा दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी या बेरजेची पडद्यामागची कहाणी सांगताना प्रणवदांचा उल्लेख केलाच. 

केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर १५,१६ राज्यांची खडानखडा माहिती त्यांना तोंडपाठ असते असेही कौतुकाने सांगितले जाई. बंगालीबाबू प्रणव मुखर्जी संदर्भकोष आहेत असे सारे सांगत. महाराष्ट्र  कॉंग्रेससाठी सर्वात महत्वपूर्ण राज्य असल्याचे प्रणवदांचे प्रतिपादन विलासराव  देशमुख सांगत अन बाळासाहेब थोरातही. मान्सून कसा झालाय ,मुंबईत नवी जुनी कॉर्पोरेट घराणी किती कर भरताहेत याची आकडेवारीही प्रणवदा खिशात बाळगून असत. सन २००४ नंतर महाराष्ट्रात नेतृत्वाची स्पर्धा सुरु झाली. सुशीलकुमार शिंदेंनी आल्पकाळ मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळले. मर्यादित षटकात नि वडणूक जिंकवून देणारे निर्णय  घेतले  तरी विलासरावांना पर्याय नसल्याचे लक्षात घ्या, असे सोनिया गांधींना सांगण्यातही मुखर्जींचीही भूमिका होती असे म्हणतात. 

युतीत मुख्यमंत्रीपदाची अर्धवट संपलेली कारकिर्द पूर्ण करण्याच्या महत्वाकांक्षेने सेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणेंचा या पदासाठी विचारही होवू शकत नाही हे सांगत नेतानिवड दुसऱ्या दिवशी होणार असतानाही अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, ही घोषणा  केली होती ती प्रणव मुखर्जींनीच. महाराष्ट्रात उभे झालेले संस्थांचे जाळे  अनुकरणीय असल्याचे ते अन्य राज्यातल्या नेत्यांना आवर्जून सांगत. भेटीला गेलेल्या प्रत्येक नेत्याला ते अर्थविचार समजून घेण्याची सूचना करत .

राजीव गांधींच्या गैरसमजामुळे  पक्षाबाहेर घालवलेली दोन चार वर्षे वगळता ते काँग्रेससाठी निवडणूक व्यवस्थापकाचे काम लीलया करत. २०१२ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ते मैदानात उतरले तेंव्हा पी.ए.संगमा समोर होते. विजय निश्चित होता पण तरीही सर्व संबंधितांना मतासाठी भेटणे हे प्रणवदांनी मनावर घेतले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व खासदार आमदारांची बैठक आयोजित झाली होती. खचाखच भरलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रणवदा मतांचा जोगवा मागत नव्हते तर ते आयडिया अॉफ इंडिया उलगडून सांगत होते. 

त्या भाषणानंतर लगेचच मंचावरच त्यांची  पत्रकारपरिषद झाली. पवारसाहेब हजर असलेल्या सहा सातपैकी एकेका पत्रकाराची ओळख करून देत होते अन दोनतीन शब्दात व्यक्तीगत दखल घेत प्रणवदा प्रश्नांची उत्तरे देत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रश्न विचारताच त्यांच्या पक्षाची मते मिळणे राजकीय अर्थाने महत्वाचे नाही का, अशी मिष्कील टिप्पणी करत ते दिलखुलास हसले होते. गाड्या लगेचच बांद्रयाला जाणार होत्या अन मातोश्रीवर बैठक, खाना असेच आयोजन अगोदरच निश्चित झाले होते. बाळासाहेब भारतातले महत्वाचे नेते आहेत हे सांगायला ते विसरले नव्हतेच.

प्रणवदांच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत सत्तांतर झाले. ल्युटियन्स दिल्लीत भाजप प्रथमच स्वबळावर सत्तेत आली. मार्गदर्शक पिढीत पोहोचलेल्या लालकृष्ण अडवाणींचे मित्र  असलेले प्रणवदा नवा मनू लक्षात घेत मोदींच्या व्यक्तीमत्वातील गुणांवर बोलू लागले. कित्येक कॉंग्रेसजन ते खरे तेच बोलतात असे मान्य करत  मोदी वावटळ खाली बसेल, अशी आशा बोलून दाखवत. बघता बघता राष्ट्रपतीपदाची  ही  कारकिर्दही संपली.

नंतर प्रणवदांचा महाराष्ट्रात प्रवास झाला तो ऐतिहासिक कारणासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजर रहाण्यास त्यांनी होकार दिला होता. नितीन गडकरी या भाजप नेत्याचीही मुखर्जी मुक्तकंठाने तारीफ करु लागले होते. कॉंग्रेस अस्वस्थ झाली होती. पण इलाज नव्हता. संघाचे आद्य संचालक हेडगेवार अन व्दितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी नागपूर परिसरातले. त्यांच्या निवासस्थानालाही मुखर्जींनी भेट दिली. तेथून बाहेर पडताना विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना दिलेला मदतीचा हात, हा तर या दशकातल्या बहुचर्चित फोटोंपैकी एक ठरावा. जाहीर भाषणात  मात्र प्रणवदांनी भारत संस्कृतीसंकराची भूमी असल्याचे विधान केले होते.नंतर लगेचच   'भारतरत्न' ठरलेले प्रणव मुखर्जी तसेच होते राजकीय संकर मान्य असलेले, सर्वसमावेशक. महाराष्ट्रातील कित्येक नेत्यांचे मार्गदर्शक!
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com