सावध व्हा, सजग रहा, कोरोनाचा वेगळा ‘पेपर’ येऊ शकतो?

दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अस्वस्थ आहे.
सावध व्हा, सजग रहा, कोरोनाचा वेगळा ‘पेपर’ येऊ शकतो?
OmicronSarkarnama

नाशिक : स्वेटर घालून थंडीत फिरत असलो म्हणजे थंडी नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. थंडी आहे, पण स्वेटरमुळे ती कमी प्रमाणात जाणवते. अशाच प्रकारे लसीकरणाचे (Vaccination) कवच लाभल्याने ओमिक्रॉनचा सामना करण्याची प्रतिकार क्षमता आपल्यात निर्माण झाली आहे, हा सरळ सरळ अर्थ आहे. त्यामुळे कोरोनाचा (Covid19) नवा अवतार येऊ शकतो याची जाण सगळ्यांनीच ठेवणे आवश्यक आहे.

Omicron
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, `मी सर्व ठिकाणी मास्क घालतो`

दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अस्वस्थ आहे. कोरोनाचा पहिला फटका मार्च २०२० मध्ये बसला. लॉकडाउनचं अंधार युग सुरू झालं. अनेक उद्योगधंद्यांवर कोरोनानं प्रहार केले. अनेक उद्योग कायमचे बंद झाले. अचानक ओढावलेल्या स्थलांतरामुळे मजूर वर्गाचे अतोनात हाल झाले. ठराविक क्षेत्रांनी उचल खाल्ली, मात्र अधिकांश क्षेत्रांवर कोरोनाची काळी छाया पसरली. साधारण डिसेंबर २०२०, जानेवारी-फेब्रुवारी २०२१च्या मध्यापर्यंत गाडी रुळावर येतेय, असं वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट एवढी भयंकर होती, की असंख्य कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली, अनेक जीव गेले. ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर हे तेव्हा परवलीचे शब्द बनले होते. कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या व्हेरियंटनीही दुसऱ्या लाटेत मोठी जीवितहानी केली.

Omicron
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोनाबाधित

डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून आता तिसऱ्या लाटेचा जोर वाढतोय. जगभर ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ सुरू आहे. जेवढा संसर्ग अधिक, तेवढे मृत्यूचे प्रमाण कमी असं एक सूत्र सध्या जगभर प्रचलित झालं आहे. दक्षिण आफ्रिकेत जेवढ्या वेगाने ओमिक्रॉनचा प्रभाव वाढला, तेवढ्याच वेगाने तो कमीही झाला, असं असलं तरीही ओमिक्रॉनचा प्रभाव कमी जाणवण्यामागे आत्तापर्यंत वेगाने झालेलं लसीकरण हे प्रमुख कारण असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र आपण

आपल्याकडे जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही अथवा गंभीर स्वरूप धारण करत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य नागरिक जागृत होत नाहीत. पहिल्या लाटेत लोकांच्या मनात कोरोनाबाबत प्रचंड भीती होती. त्यामुळे लॉकडाउन यशस्वी झाला. संसर्ग वाढला; पण मृत्यूचं प्रमाण या लाटेत कमी होतं. दुसऱ्या लाटेत लोकांच्या मनातील भीती गेली; पण ही लाट एवढी भयंकर होती, की ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिव्हिर मिळविणे म्हणजे आयुष्य मिळविणे, असंच जणू समीकरण बनलं होतं. स्मशानभूमींमधील विदारक दृश्ये अस्वस्थ करणारी होती. भीती फार उरली नसली, तरी जवळच्या व्यक्तींना गमावण्याचं डोंगराएवढं दुःख अनेक कुटुंबांनी सोसलं. ज्या कुटुंबांनी दुसऱ्या लाटेत मृत्यू जवळून पाहिला, केवळ त्यांच्यामध्ये गांभीर्य जाणवत होतं.

दुसऱ्या लाटेत बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची एवढी कमतरता भासेल, असं स्वप्नातही कोणाही वैद्यकीय तज्ज्ञाला किंवा सरकारातील अधिकाऱ्याला वाटलं नव्हतं. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बेडची कमतरता तिसऱ्या लाटेत जाणवेल, अशी शक्यता वाटत नाही. ऑक्सिजन किंवा रेमडेसिव्हिरची तर गरज लागण्याची शक्यताही कमी दिसतेय. या तिन्ही पातळ्यांवर सज्जता चांगल्या प्रकारची आहे. रेमडेसिव्हिर तर वापरात येण्याची शक्यता धूसर आहे. रेमडेसिव्हिरमुळे निर्माण झालेल्या म्युकरमायकोसिसचे अत्यंत घातक परिणाम काही रुग्णांवर दिसले, म्युकरमायकोसिसचा पेपरही अनपेक्षितपणे आला, वैद्यकीय क्षेत्राची प्रचंड तारांबळ उडाली.

त्यामुळे रेमडेसिव्हिरचा उपयोग यापुढे कोरोनासाठी अशक्यप्राय आहे. आता प्रश्न उरतो, तो म्हणजे तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती काळ टिकेल, कोणत्या घटकांवर तो राहील. आधीप्रमाणे अनपेक्षित पेपर कोरोनानं टाकला म्हणजे त्याला कसं सामोरं जायचं? याची नेमकेपणानं माहिती, अचूक अंदाज सध्या कोणीही वर्तवू शकत नाही. सकारात्मक बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे सुरू झालेले बूस्टर डोस आणि १५ ते १८ वयोगटातील युवकांचे सुरू झालेले लसीकरण. तज्ज्ञ असं सांगताहेत, की १५ वयोगटाखालील मुलांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक वाढल्यास पेपर पुन्हा चुकू शकतो. त्यातल्या त्यात शून्य ते चार वयोगटातील चिमुरड्यांमध्ये संसर्ग वाढल्यास चिंतेत अधिक भर पडू शकते. एवढ्या लहान शिशूंवर उपचार करण्यासाठी उपलब्ध लोकसंख्येच्या तुलनेत व्यवस्था आपल्याकडे नाही. प्रत्येक वेळी ज्याची सज्जता ठेवली, त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडत आलंय. ओमिक्रॉन सौम्य असल्यानं तो पटकन निघून जाईल, असं म्हणत निष्काळजीपणा बाळगण्यात काही अर्थ नाही. आवश्यक तेवढी खबरदारी घेत पुढे जात राहायचं, सध्यातरी एवढंच आपल्या हाती आहे. आत्ताचा पेपर सोपा की अनपेक्षितरीत्या कठीण हे स्पष्ट होण्यासाठी अजून काही काळ नक्कीच जाऊ द्यावा लागेल.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in