महाली वर्णद्वेष... - Although democracy was overthrown, the monarchy still exists nominally | Politics Marathi News - Sarkarnama

महाली वर्णद्वेष...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

इंग्लंडमध्ये राजाची (किंवा राणीची) सत्ता गुंडाळून लोकशाही अवतरली तरी राजसत्ता नाममात्र अजूनही अस्तित्वात आहे. राजघराण्याचा पैसा, जमीनजुमला, राजवाडे, मालमत्ता याला कशालाही हात लावला गेला नाही. एखादं म्युझियम जतन करावं तसं ते घराणं, काडीचेही अधिकार नसले तरी, तेच शिष्टाचार, त्याच प्रथा, यांची झूल पांघरून ठेवलं आहे. 

इंग्लंडचा धाकटा राजपुत्र हँरी आणि त्याची पत्नी मेघन मर्कल यांनी अमेरिकन टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीनंतर जगभर खळबळ तर माजली आहेच, पण राजघराण्याची लक्तरं सुद्धा बाहेर पडली आहेत. नेमकं काय झालं हे समजण्यासाठी आधी थोडी पार्श्वभूमी माहित असायला हवी. इंग्लंडमध्ये राजाची (किंवा राणीची) सत्ता गुंडाळून लोकशाही अवतरली तरी राजसत्ता नाममात्र अजूनही अस्तित्वात आहे. राजघराण्याचा पैसा, जमीनजुमला, राजवाडे, मालमत्ता याला कशालाही हात लावला गेला नाही. एखादं म्युझियम जतन करावं तसं ते घराणं, काडीचेही अधिकार नसले तरी, तेच शिष्टाचार, त्याच प्रथा, यांची झूल पांघरून ठेवलं आहे. तिथले पंतप्रधान अद्यापही या रबर स्टँप घराण्याच्या नावाने कारभार करतात.

विद्यमान राजपुत्र प्रिन्स चार्ल्स याला त्याची दिवंगत पत्नी डायना (स्पेन्सर) हिच्यापासून दोन मुलगे झाले. मोठा विल्यम आणि धाकटा हँरी. हँरी अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल मेघन मर्कल हिच्या प्रेमात पडला. (तिची मुख्य भूमिका असलेली "सूट्स" ही मालिका तुफान गाजली होती). इथेच पंचाईत झाली. विल्यमची पत्नी केट मिडलटन ही जशी 'तोलामोलाच्या' घरातली होती, तशी मेघन नाही. एकतर ती अमेरिकन मध्यमवर्गीय. शिवाय वडील गोरे पण आई आफ्रिकन - अमेरिकन काळी असल्याने ती सुद्धा काळी. तरीही राजघराण्यात लग्न झालं आणि तिचे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले.

मनमुराद, मोकळं आयुष्य जगायची सवय असलेल्या मेघनने राजघराण्याच्या 'मर्यादशील' वातावरणात सामावून जायचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिला तिथल्या कर्मठांनी आपली मानली नाही. तीन वर्षांपूर्वी तिला दिवस गेले तेव्हा तिच्या मुलाच्या त्वचेचा रंग काय असेल यावरुन राजवाड्यात जशी गलिच्छ चर्चा सुरू झाली तशीच ब्रिटिश माध्यमांनी सुद्धा त्यावर अमाप गॉसिप केलं. तिचा मुलगा आर्ची याला औपचारिक "राजपुत्र" हा दर्जा देता येणार नाही यासाठीही तिथल्या सनातन्यांनी कारस्थानं सुरु केली.

इंग्लंडमध्ये राजघराण्यातील लोकांना काही समारंभांना शिष्टाचार म्हणून जाणं सक्तीचं असतं. मेघन त्या कालबाह्य रितीरिवाजांना उबगली होती. तिने हे तथाकथित शिष्टाचार पाळणं बंद केलं. राजघराण्यातील लोकांना राजकीय भूमिका असता कामा नये हाही एक नियम तिथे आहे. मेघन आपल्या माहेरच्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची कट्टर विरोधक आणि जो बायडन समर्थक होती. ते सुद्धा तिथल्या ढुढ्ढाचार्यांना खपेना. परिणामी तिचे भत्ते बंद करून तिची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली. तिचं इंग्लंडचं नागरिकत्व पुढे ढकललं गेलं.

हँरी मात्र आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यालाही अप्रत्यक्षपणे धमक्या येत होत्याच. आपली आई डायना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक होती. पण शाही विवाहापूर्वी तिची कौमार्य चाचणी करण्यात आली होती. तिच्या गाडीचा भरधाव पाठलाग करणाऱ्या छायाचित्रकारांना चुकवताना झालेल्या भीषण अपघातात तिला मरण आलं होतं, हे नक्कीच त्याच्या लक्षात असेल. 

अखेर त्या दोघांनी इंग्लंडला रामराम ठोकून अमेरिकेत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्याने अधिकृतपणे या बेगडी राजघराण्याचा त्याग केला. कसलेली मुलाखतकार ओफ्रा विन्फ्रीने या दोघांना बोलतं केलं. काही अनुभव सांगताना मेघनला आपले अश्रू अनावर झाले. काही महिन्यांपूर्वीच जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू पाहिलेल्या अमेरिकेसमोर, आणि जगासमोर, इंग्लंडच्या राजप्रासादातील वर्णद्वेष नागड्या स्वरूपात समोर आला. ब्रिटनमध्ये राजसत्ता गेली त्याला काही शतकं लोटली. पण राजाच्या महालातला प्रतिगामीपणा संपलेला नाही हेच खरं!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख