Kasba Peth Bypoll Election Result : कार्यकर्ते, मतदारांनी दाखविला भाजपला आरसा

Maharashtra Politics : कसब्याच्या निकालाने भाजपचे आडाखे चुकले
BJP Flag
BJP FlagSarkarnama

Pune Bypoll Election Result : कसब्यात सरळ लढतीत महाआघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारून भाजपचा परंपरागत बालेकिल्ला हिसकावून घेतला तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीमुळे महायुतीच्या अश्विनी जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. केवळ दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुका म्हणून याकडे पाहणे चुकीचे आहे. राज्यातील सध्याच्या अस्वस्थ राजकारणाचा पोत पाहिल्यास या निकालाचे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीवर परिणाम अटळ आहेत. त्यामुळे आगामी काळात या निकालांची चर्चा सातत्याने होत राहील आणि त्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षाला तातडीने आत्मपरीक्षण करून पावले उचलावे लागतील.

या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रचारात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. त्यामुळे तेथे कोणीच कमी पडले नाही. पण प्रयत्नांची शिकस्त करूनही हक्काच्या मतदारांनी का पाठ फिरवली याचा विचार भाजपच्या नेत्यांना आता तटस्थपणे करावा लागणार आहे. कसब्याच्या निकालाने भाजपचे अनेक आडाखे चुकले असून यातून महाविकास आघाडीच्या एकत्रित येण्याला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या दृष्टीने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासारखा तुल्यबळ कार्यकर्ता असलेला आमदार पक्षाला मिळाला असून पक्षाच्या पुनरुज्जीवनाला त्याचा लाभ होणार आहे.

कार्यकर्त्याला मिळाली प्रतिष्ठा

या निकालाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आलेले महत्त्व. गेल्या काही वर्षांत राजकारणाचे स्वरूप पुरते बदलून गेले आहे. ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता, पैसे खर्च करण्याची ताकद आहे अशांची प्रत्येक राजकीय पक्षात चलती सुरु झाली. यामुळे पक्षासाठी, जनतेसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता दुर्लक्षित होवू लागला. नेत्यांसाठी हे दुर्लक्ष इतके सरावाचे होत गेले की हळूहळू त्यांचा सर्वच पक्षातील धुरिणांना विसरच पडू लागला. कार्यकर्त्यांना जर गृहीत धरले तर काय होवू शकते याचा धडा या निकालातून मिळाला आहे.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या रुपाने सर्वसामान्य कार्यकर्ता अचानक चर्चेत आला असेच म्हणावे लागेल. कारण धंगेकर यांची ओळखच हाडाचा राजकीय कार्यकर्ता अशी होती. पक्ष कोणताही असो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्री अपरात्री धावून जाणारा कार्यकर्ता हीच त्यांची ओळख आहे, आणि मतदारांना तीच भावली. त्यामुळेच त्यांचा पक्ष कोणता, आधी ते कोणत्या पक्षात होते याचा काहीही परिणाम त्यांच्या प्रचारात झाला नाही. त्यांच्या विजयासाठी महाआघाडीतील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. कार्यकर्त्यांना जर सांभाळले तर काय होवू शकते याचा धडा या निवडणुकीने सर्वच पक्षांना दिला आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात सत्ता असलेल्या भाजपने, विरोधी पक्षातील अनेक चांगले लोकांना पक्षात घेतले. त्याचा त्यांना लाभही झाला. पुणे महापालिकेत पक्षाचे प्रथमच ९९ नगरसेवक निवडून आले. आताही भाजपचा अन्य पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्याची शक्यता वर्तविली जाते. अशा वेळी पक्षातील अनेक कार्यकर्ते कमालीचे नाराज होतात. उमेदवार निवडून आणता आला नाही तरी त्याला पराभूत करण्यासाठी क्षमता त्यांच्यात असते. अशा वेळी पक्षातील कार्यकर्त्यांना गृहीत न धरण्याचा सांगावा या निकालांनी दिला असून येथे भाजप नेतृत्वाचा कस लागणार आहे.

मतदारांना गृहीत धरणे महागात

कसब्यात मतदारांच्या बाबतीतही काहीशी अशीच स्थिती पहायला मिळाली. पुण्यात ब्राम्हण मतदारांची तसेच भाजपच्या पाठीराख्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र गेल्या विधानसभेपासून भाजपकडून उमेदवारी देताना त्यांना डावलले जात असल्याची भावना या मतदारांमध्ये निर्माण झालेली आहे. जातीच्या निकषावर उमेदवारी देणे चूक की बरोबर यावर मतमतांतरे असू शकतात. पण मतदारांना गृहीत धरले जाते, त्यांना विश्वासातच घेतले जात नाही, त्यांच्या भावनांची कदर केली जात ही सार्वत्रिक भावना मतदारांमध्ये खोलपणे रुजत चालली आहे. ही भावना मतपेटीतून व्यक्त झाली.

साधे उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या वेळी कसब्यातून दिवंगत मुक्ता टिळक या २८ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्रभाग क्रमांक १५ मधून तब्बल २१ हजार मतांची आघाडी मिळाली होती. यंदा याच हक्काच्या स्वतःच्या प्रभागात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना तेथे केवळ ७२५६ मतांची आघाडी मिळाली. हा फरकच धंगेकर यांच्या विजयात निर्णायक ठरला. ज्या प्रभागाला भाजपने आमदारपद, महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले, नेमक्या त्याच प्रभागातील मतदारांनी पाठ का फिरवली, याचे तटस्थ सखोल विश्लेषण आता भाजपच्या नेत्यांना करावे लागणार आहे. केवळ त्यावर न थांबता काही कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत. उमेदवारी देतानाही जनभावनेचा विचार करणे भाग पडणार आहे.

केवळ पक्षाचा विस्तार घातक

भाजपप्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटालाही या निवडणुकीने अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. एकास एक उमेदवार दिला आणि त्याच्या पाठीशी एकदिलाने उभे राहिले तरच विजय मिळतो हे कसब्याने दाखविले. त्याचवेळी चिंचवडमध्ये (Chinchwad) अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यात तिन्ही पक्षाचे नेते अयशस्वी ठरले. मतविभागणीचा फटका महाआघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांना बसला आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विजयी झाल्या.

महाआघाडीच्या नेत्यांना ही बाब कळत नाही अशातला भाग नाही, पण प्रत्येक पक्षातील इच्छुकांना थांबवायचे कसे? हाच त्यांच्यापुढे यक्षप्रश्न राहणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी केवळ विस्तारवाढीला महत्त्व देणे घातक ठरेल. त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार आहे. भाजप व एकनाथ शिंदेची (Eknath Shinde) शिवसेना यामुळे महाआघाडीतील तिन्ही पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दशकात महाराष्ट्रात प्रथमच भाजप विरुद्ध अन्य तीन मोठे पक्ष अशी लढत होण्यासारखी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नव्याने राजकीय फेरमांडणी होण्याचा हा काळ आहे. अशा वेळी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवले तरच महाआघाडी स्पर्धेत टिकाव धरू शकणार आहे. त्या दृष्टीने मतदार व कार्यकर्त्यांनी निवडणूक निकालातून दाखविलेला आरसा प्रत्येक राजकीय पक्षाच्या धुरिणांनी गांभीर्याने पाहिला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in