सांगली, मुख्यमंत्रीपद आणि टप्प्यात कार्यक्रम करणारे जयंतराव!

जयंत पाटील हे असे नेते आहेत की त्यांच्या मनाचा थांग ते सहसा कोणाला लागू देत नाहीत. तरी त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून राज्यात चर्चा सुरू केली...
Jayant Patil
Jayant Patil

सांगली : "मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही?' असं सहज बोलून राज्याच्या राजकारणात धुरळा उडवणारे जयंत राजाराम पाटील चर्चेत आहेत. अगदी शरद पवार यांनीही त्यावर आज "मला पण मुख्यमंत्री व्हावे वाटते' अशी मिश्‍किल टिप्पणी केली. तत्पूर्वी अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांनीही त्यांना पाठींबा असल्याचे सांगून टाकले. जयंतराव जिथे बोलले आणि ज्या मूडमध्ये बोलले ते पाहता हा विषय राज्याच्या राजकारणात या घडीला फार काही उलथापालथ करणारा आहे किंवा असेल, असे अजिबात नाही. तरी त्याने जी राजकीय चर्चा व्हायची ती झालीच आहे.  त्याला कारणही तसेच आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे किती काळ राहणार, हा कळीचा मुद्दा आहे. अडीच वर्षांनंतर हे पद राष्ट्रवादीकडे येऊ शकते, अशी चर्चा नेहमीच होत असते. तशी काही योजना राष्ट्रवादीच्या मनात आहे का, असा सवाल जयंतरावांच्या विधानामुळे निर्माण झाला आहे. 

वसंतदादा पाटील यांच्यापासून ते आर. आर. पाटील यांच्यापर्यंत सांगली जिल्हा नेहमी राजकीय बातम्यांचे आगार राहिला आहे. त्या आगारात "जयंतरावांनी मुख्यमंत्री होण्याची मनिषा' ही भर. तशी ती नवी नाहीच मुळी, याआधीही त्यावर चर्चा झडल्या आहेत. त्या "सुफळ संपूर्ण' होतील, अशी शक्‍यता सध्या तरी नाही, अशी कबुली स्वतः जयंत पाटील यांनीच दिली आहे. जयंतरावांचा स्वभाव वाट पाहण्याचा आहे, त्यासाठी परिश्रम करण्याचा आहे आणि योग्य संधीच्या वेळी षटकार ठोकण्यातही ते माहीर आहते. मुख्यमंत्रीपदासाठी जे-जे हवं ते सारं जयंत पाटील यांच्याकडे आहे. राजकारणातील दीर्घ अनुभव, सर्वपक्षियांना हाताळण्याचे कसब, टप्प्यात आल्यावर एखाद्याचा कार्यक्रम करण्याची प्रचंड हातोटी या जमेच्या बाजू असल्याने खुद्द शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम असणाऱ्या लोकांच्या यादीत त्यांना अग्रक्रम दिला होता असे म्हणतात.

सांगली हा बड्या नेत्यांचा जिल्हा

 
सांगली जिल्ह्याने वसंतदादांच्या रुपाने चारदा मुख्यमंत्रीपद अनुभवले आहे. त्यानंतर आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री झाले. पतंगराव कदम यांनी अनेक मंत्रिपदे भूषवली. शिवाजीराव देशमुख यांच्या घरीही सत्ता तहयात होती. पतंगरावांचे नाव अनेकदा मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये राहिले. त्यांची मोठी इच्छा यासाठी होती त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. पण त्यांचे ते स्वप्न अधुरे राहिले. या यादीत आता जयंत पाटील यांचेही नाव जोडले जाईल. मुळात मुख्यमंत्री होऊन "वर्षा'वर राहणे हे स्वप्न राजकारणात अनेकांना पडते. खरे तर जयंत पाटील हे असे नेते आहेत की त्यांच्या मनाचा थांग ते सहसा कोणाला लागू देत नाहीत. त्यांच्या राजकीय चाली कित्येकदा स्वत:च्या पक्षाच्या धोरणापेक्षाही वेगळ्या असतात. राजकारणातील शह-काटशहाच्या राजकारणात त्यांच्यासारखा खुन्नस असलेला नेता विरळच! कधी मित्राला शत्रू करतील तर कधी शत्रूला हाताशी धरून एखाद्याचा पत्ता कधी ते कापतील, हे अनेकदा गेम होईपर्यंत अनेकांना कळत नाही. यादृष्टीने जयंत पाटील यांचे राजकारण पाहिले तर त्यांच्या जवळ आलेले अनेक लांबही गेले, पण जयंतरावांनी याची कधी फिकीर केली नाही. मोठे नुकसान झाले तरी त्यांनी अनेकदा आपली चाल बदलली नाही.

सांगलीला चार वेळा मुख्यमंत्रीपद

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादांनी जे केले ते राज्यात कोणालाही जमले नाही. दादा तब्बल चारवेळा मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय देखील घेतले पण एकदाही त्यांना पूर्ण टर्म गाठता आली नाही. कारण मुख्यमंत्र्यांची खुर्ची काटेरी असते याचा अनुभव या काळातला इतिहास देतो. अर्थात दादांचा काळ वेगळा होता. त्या काळात सांगली हे राज्याचे केंद्र बनले होते. येथूनच मंत्रिमंडळ ठरायचे. राज्यभरातून नेत्यांचा राबता सांगलीत असायचा. त्यानंतर सांगलीला उपमुख्यमंत्रीपद लाभले ते आर. आर. आबा यांच्यामुळेच! जयंतरावांची स्पर्धा दादांच्या पश्‍चात त्यांच्या घराण्याशी खूप होती. वसंतदादा व राजारामबापू यांच्यातील वादाची पार्श्‍वभूमी यामागे होती. पण नंतरच्या काळात दादा घराण्याशी त्यांनी मैत्रीदेखील केली. स्वपक्षातील नेते आर. आर. पाटील यांच्याशीसुध्दा जयंतरावांची वर्चस्वासाठी स्पर्धा होती ती सर्वश्रुत आहे. आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा जयंतराव त्यांचे स्पर्धक होते. पण राष्ट्रवादीच्या वर्तुळात आर. आर. आबाच वरचढ ठरले. 

आता एकदिवस आपण मुख्यमंत्री व्हायचे, याबाबत जयंतरावांची मनिषा हे दीर्घकालीन नियोजन असू शकते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि यामध्ये जयंतरावच उपमुख्यमंत्री होतील, अशी मोठी शक्‍यता होती. या स्पर्धेतील अजितदादांनी बंड केले होते, त्यामुळे पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. जयंत पाटील हेच उपमुख्यमंत्री असतील, असे अंदाज होते. ते चुकले, पण जयंतरावांचे राज्याच्या राजकारणातील महत्व व चमक प्रदेशाध्यक्षपदामुळे कायम राहिली. संघटना बांधणीत जयंतरावांनी भरपूर वेळ दिला आहे, त्यांचे फळ त्यांना कसे मिळेल हे येणारा काळ ठरवेल! अर्थातच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी पक्ष वाढावा लागेल, संख्या वाढावी लागेल आणि हो, सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या मनात जयंतरावांचे नाव यावे लागेल. राष्ट्रवादीतील अंतर्गंत स्पर्धा पाहिली तर सोपे नाही पण म्हणतात ना "कुछ भी हो सकता है!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com