बंगालची वाघिण जिंकली; महाराष्ट्राचा वाघ कधी जिंकणार? - tigress of Bengal won when will tigers of Maharashtra win is the question | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

बंगालची वाघिण जिंकली; महाराष्ट्राचा वाघ कधी जिंकणार?

प्रकाश पाटील
सोमवार, 3 मे 2021


शिवसेना आज पंचावन्न वर्षाची आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवित आहेत. गेल्या पाच दशकात शिवसेनेला विधानसभेत आमदाराचंे कधी शतकही झळकविता आले नाही. जो भाजप शिवसेनेचे बोट धरून मोठा झाला त्यांनी दोन वेळा शतक झळकविले. ममता बॅनर्जी यांनी तर कॉंग्रेस सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापला. त्यांनी सलग तीन वेळा पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला. असा विजय शिवसेना कधी मिळवून देणार!

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. जखमी वाघिण बलाढ्य अशा भाजपला म्हणजेच मोदी-शहांना पुरून उरली. वास्तविक पाच राज्यांच्या निवडणुका होत्या पण, साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते पश्‍चिम बंगालकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जादू करून दाखवतील. मोदी है तो मुमकीन है!, ही नेहमीच भाषा यावेळीही वापरली गेली. तरीही मोदींची जादू चालली नाही. ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्‍चिम बंगाल जिंकून दाखविले त्याबद्दल बॅनर्जी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

मोदी-शहांबरोबर देशातील सर्वच पक्षांनी जसे त्यांचे अभिनंदन केले तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले. तेथे भाजपचा पराभव झाल्याने विशेषत: शिवसेनेला सर्वाधिक आनंद झाला आहे. या पक्षाच्या मुखपत्राने तर ममतांची आरती ओवाळतांना भाजपचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो घेतला आहे. अर्थात ते अपेक्षितच होते. खरंतर जे ममता बॅनर्जींना जमते ते महाराष्ट्रातील दोन वाघांना (उद्धव आणि राज) कधी जमणारस असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे.

शिवसेना आता पंचावन्न वर्षे झाली आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. प्रारंभीपासून या पक्षाची भूमिका प्रादेशिकच राहिली आहे. तिने हिंदुत्वाचे कातडे अंगावर चढविले असले तरी खऱ्या अर्थाने ती कधी हिंदुत्ववादी झाली नाही. म्हणजेच भाजपचं आणि शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे आहे हे या पक्षाचे विरोधक डावे आणि भाईसाथीही मान्य करतात. म्हणूनच की काय राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करताना या पक्षाच्या प्रमुखांना काही अडचण आली नाही. शिवसेनेने आतापर्यंत अनेक पक्षांशी आघाडी, युती केली आहे. पण, सर्वाधिक काळ भाजपबरोबर या पक्षाची घट्ट मैत्री होती. या मैत्रीला खऱ्या अर्थाने तडा गेल्या त्या 2014 मध्ये.

मोदी लाटेतही भाजपला बहुमत नाही

मोदी लाटेचा पुरेपुर फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजपने केला खरा तरीही त्यांना मॅजिक फिगर गाठता आली नाही. जे उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असले तरी यापूर्वीच शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे 2014 मध्ये झाला असता. मात्र भाजपने ते होऊ दिले नाही. त्यावेळी युती तुटल्यानंतर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले होते. पुढे काही घडामोडी घडल्या. भाजपला अधिक न दुखविता शिवसेना सत्तेत सहभागी झाली ती दुय्यम खाती घेऊन. भाजपने टाकलेल्या तुकड्यावर समाधान मानत या पक्षाला धडा शिकविण्यासाठी वेळ पाहत होती. ती वेळ आली 2019 मध्ये.

गेल्या निवडणुकीत भाजपशी युती केली. एकत्रित निवडणुका लढल्या आणि पुन्हा सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे फडणविसांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले. हा सर्व इतिहास असला तरी शिवसेनेला राज्यात कधी तरी स्वबळावर निवडून येता येईल का ? मनसेलाही ते जमेल का? ममता बॅनर्जी, जयललिता यांना जे जमले ते या पक्षांना का जमत नाही असे प्रश्‍न पुढे येणे स्वाभाविक आहे.

जखमी वाघिण डगमगली नाही

ममता या आज भाजपच्या विरोधात असल्या तरी त्यांनीही फायद्या तोट्याचे राजकारण यापूर्वी केले आहे. ज्या भाजपला आज ममता एक नंबरच्या शत्रू वाटत आहेत त्या यापूर्वी "एनडीए'च्या घटक पक्ष होत्या. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या. जयललितांचाही त्यांना पाठिंबा होता. मात्र या दोघींनी नेहमीच आपल्या राज्याचा विचार केला. वाजपेयींनाही त्यांनी शांतपणे कारभार करू दिला नाही. वाजपेयी यांनी एकदा ममता यांच्या मातु:श्रीची भेट घेतली असता ते म्हणाले होते, की आपकी बेटी मुझे बहुत परेशान करती है ! आता त्याच ममतानीं मोदींनाही परेशान केले असे म्हणावे लागेल. वीट का जवाब पत्थरसे देंगे!, अशा शब्दात ममतांनी मोदी-शहांचा समाचार घेतला होता. म्हणजे त्या बलाढ्य अशा महाशक्तीला डगमगल्या नाही.

उद्धवनीही जशास तसे उत्तर दिले पण...!

महाराष्ट्रात अमित शहांनी जेंव्हा `पटक देंगे`ची भाषा केली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही शहा यांना जशास तसे उत्तर दिले होते. आम्हाला पटकायला जन्माला यायचा आहे असे सडेतोड उत्तर दिले होते. त्यावेळी महाराष्ट्राने उद्धव यांना डोक्‍यावर घेतले होते. मोदी-शहांना ते पुरून उरतील असा समज मराठी माणसांनी करून घेतला होता. पण, तो समज चुकीचा ठरला. याच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने मोदी-शहांशी जुळवून घेतले. अर्थात अमित शहांनीही मातु:श्रीच्या पायऱ्यावर नाक घासले. उद्धव यांनी आपली भूमिका तिच ठेवली असती. 2014 च्या निवडणुकीनंतर विरोधी बाकांवरून सत्तेत ती गेली नसती तर आज महाराष्ट्रात भाजपला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या मिळाल्या असत्या का? शिवसेना बरोबर नसेल तर विरोधीबाकावर बसावे लागते याचा अनुभव भाजपची मंडळी घेत आहे. युतीत आमची 25 वर्षे सडली, याचा अनुभव यायला शिवसेनेला पंचवीस वर्षे लागली. कधी भाजपच्या जवळ जायचे, कधी विरोध करायचा. कधी आरती ओवाळायची तर कधी टोकाची भूमिका घ्यायची त्यामुळे जनतेचाही विश्वास राहत नाही. भूमिकेवर जर ठाम राहिले तर काहीवेळा तोटाही होऊ शकतो पण, त्याचे फायदेही होऊ शकतात. 
महाराष्ट्रात ज्या शिवसेनेचे बोट धरून भाजपने राजकारण केले त्याच शिवसेनेला संपवायला कोण निघाले होते हे कधी लपूनही राहिले नाही. याचेही उशिरा शहाणपण आले.

सर्व जातीबांधवाना बरोबर घेण्याची गरज

शिवसेना आजही केडर बेस असलेला पक्ष आहे. या पक्षाने ठरविले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. अकरा कोटी जनतेचा विश्वास निर्माण करण्यात ती किती यशस्वी होते हे पाहावे लागेल. पूर्वी ग्रामीण भागातून मुख्यमंत्री होत असे आता तसे होत नाही. वाढत्या शहरीकरणांमुळे आमदारांची संख्याही शहरी भागातून अधिक दिसून येत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता त्यादृष्टीने पाऊले टाकली पाहिजेत. याबाबत भाजपने बऱ्यापैकी बांधणी केल्याचे दिसून येत आहे. परप्रांतीय मंडळी अजूनही शिवसेना का नको म्हणते याचा विचार करायला हवा. ममता यांनी तसे केले नाही. सर्वजातीधर्मांना बरोबर घेऊन त्यांनी मोट बांधली आहे. पश्‍चिम बंगालच्या अस्मितेचे राजकारण करीत राष्ट्रीय पक्षाचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. शिवसेनेने यापुढे भाजपशी युती न करता फायद्या तोट्याचे राजकारण केले पाहिजे. जर शिवसेना बरोबर नसेल तर पाच वर्षानी राज्यात भाजपच्या किती जागा निवडून येतील याचाही विचार केला पाहिजे.

ईडी मागे लागताच सेना नेते गर्भगळीत होतात

मोदी सरकारने डोळे वटारले की शिवसेना हतबल होते. तडजोडीची भाषा करते. वास्तविक मोदी-शहांनी ममतांना काही कमी त्रास दिला नाही. तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या नेत्यांना तुरूंगात डांबले. चौकश्‍या सुरू केल्या तरीही त्यांनी आपल्या विरोधाची धार कमी केली नाही. महाराष्ट्रात नेमके उलटे होते. चौकशा मागे लागल्या की मराठी नेते गर्भगळीत होतात. जे मोदीशहांना खुलेआम विरोध करीत होते त्यांची ईडीची चौकशी लागताच टीका करायचेच थांबले. घाबरले. अशाने लढायचे कसे, हा प्रश्‍नच आहे. रणांगणात उतरायचे तर परिणामांना सामोरे जावेच लागेल. आज भाजप केंद्रात आहे उद्या कॉंग्रेसही येईल. पण, डगमगून चालणार नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना तत्कालिन कॉंग्रेस सरकारनेच सीबीआयचा ससेमिरा लावून तुरूंगात टाकले होते. पुढे त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. कॉंग्रेसविरोधात लढले आणि मुख्यमंत्री बनले. आज तेथे कॉंग्रेसची काय अवस्था आहे हे आपण पाहतच आहोत. शिवसेनेलाही संधी आहे. मात्र न डगमगता बलाढ्य शक्तीशी प्राणपणाने लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. गेल्या पंच्चावन वर्षात शिवसेनेने कधी शंभर आकडाही पार केला नाही. भाजप याच पक्षाचे बोट धरून मोठा झाला त्यांच्या आज शंभरच्यावर जागा आहेत. शिवसेना शतक कधी मारणार, हाच खरा प्रश्‍न आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख