देवेंद्र फडणवीस राज्यात 'करेक्ट कार्यक्रम' करणार का? - is it possible Devendra to topple the Mahavikas Aghadi Govt after Pandharpur election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

देवेंद्र फडणवीस राज्यात 'करेक्ट कार्यक्रम' करणार का?

सायली नलवडे-कविटकर
सोमवार, 3 मे 2021

पंढपुरातील या विजयाने भाजपच्या आत्मविश्वासात भर पडणार असून देवेंद्र फडणवीस यांनी 'पंढपुरात समाधान आवताडे यांना विजयी करा, राज्यातील करेक्ट कार्यक्रम करतो' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे पंढपूरकरांनी त्यांनी त्यांचे काम केल्यानंतर फडणवीसही त्यांचं काम करणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

सर्वाधिक आमदार असूनही महाराष्ट्रात सत्ता नाही, पदवीधर निडणुकीत झालेला दारुण पराभव, दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूती आणि कोरोना मदतीवरून केंद्र-राज्यात सुरु असलेल्या वादाची पार्श्वभूमी, असं चित्र असताना 'पंढरपूर'ची निवडणूक विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे परीक्षाच होती. मात्र पंढपुरात या परीक्षेत फडणवीस 'पास' झाले असून नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील दारुण पराभवाची परतफेड करुन दाखवली आहे. भाजपच्या पंढरपूरमधील विजयाचा परिणाम राज्याच्या राजकीय समिकरणांवर थेट होणार नसला तरी पंढरपुरात केलेल्या घोषणेनुसार फडणवीस आता राज्यात 'करेक्ट कार्यक्रम' करणार का? याकडे लक्ष असेल.

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटूंबीयांना सहानुभूती मिळणार हे उघड होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला कडवा संघर्ष करावा लागणार, हेही स्पष्ट सत्य होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भालके विरोधकांची मोट यशस्वीपणे बांधण्यात यश मिळवलं, हेच यावरुन स्पष्टपणे दिसले. परिचारक गट, आवताडे गट आणि मोहिते-पाटील कुटुंबियांचा या भागात असलेला प्रभाव या सर्व घटकांची एकत्रित मोट बांधण्यात भाजपला यश मिळाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, परिचारक गटाची मोठी 'वोट बँक' आवताडे यांच्याकडे वळवण्यात भाजपला मोठे यश मिळाले, असे चित्र आहे.

पंढपुरातील या विजयाने भाजपच्या आत्मविश्वासात भर पडणार असून देवेंद्र फडणवीस यांनी 'पंढपुरात समाधान आवताडे यांना विजयी करा, राज्यातील करेक्ट कार्यक्रम करतो' असे वक्तव्य केले होते. त्यामुळे पंढपूरकरांनी त्यांनी त्यांचे काम केल्यानंतर फडणवीसही त्यांचं काम करणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र फडणवीस यांची ही घोषणा प्रत्यक्षात येणार की निवडणुकीतील भाषणबाजी ठरणार? हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे. शिवाय राज्यात 'करेक्ट कार्यक्रम' करणे हे फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्व हाताशी असल्याशिवाय अशक्यच आहे.

बंगालमधील पराभव 'करेक्ट कार्यक्रमा'तील अडथळा?

एकीकडे पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी अवलंबून असल्याचं बोलणं जात होतं. मात्र या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील 'करेक्ट कार्यक्रमा'चं काय होणार हा प्रश्न आहे. कारण देशात पुन्हा एकदा कोरोना उद्रेकाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत 'ऑपरेशन लोटस'बाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व पावले टाकतील का? याबाबत साशंकता आहे. मात्र तरीही पंढरपुरचा विजय राज्यात तरी भाजपला बळ देणारा ठरेल हे नक्की.

भाजपला उभारी देणारा विजय?

राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला खातही उघडता आलं नव्हतं. स्वाभाविकपणे या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फोडलं गेलं. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यावर काय चित्र असू शकतं? याचा अंदाजही महाराष्ट्राला त्या निकालाने आला होता. मात्र काही महिन्यांपूर्वीच आलेल्या त्या निकालाला पंढरपूरच्या निकालाने छेद दिला आहे. त्यामुळे पंढरपूरचा निकाल भाजपमध्ये उत्साह वाढवणारा ठरणार आहे.

अजितदादा मैदानात उतरुनही पराभव !

एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोना उद्रेकाची परिस्थिती गंभीर बनत असताना दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार मात्र पंढरपूर निवडणुकीच्या नियोजनात व्यस्त होते. पंढरपूरमधील राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करत असताना, सभांचा धडाकाही अजितदादांनी लावला होता. शिवाय अजितदादांनी अनेक मंत्र्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ही निवडणूक गमावल्याची चर्चा अधिकच होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख