`ओ दिदी, ओ दिदी,` असे मोदी हिणवत होते तेव्हाच बंगाली माणसाने ठरवले होते...

`बंगालची बेटी`च बंगालवर राज्य करणार, बाहेरच्या उपऱ्यांच्या हाती आम्ही सत्ता देणार नाही, असा निर्विवाद कौल देत पश्चिम बंगालच्या मतदारांनी हिदुंत्वाच्या राजकारणाला साफ नाकारले आहे.
modi- mamata
modi- mamata

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या देशभर चौखुर उधळलेल्या अश्वमेधाला कोणीच रोखू शकत नाही या गृहीतकाला ममतादीदींनी पश्चिम बंगालमध्ये जबरदस्त तडाखा दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल हा देशाच्या राजकारणातील महत्वाचा टप्पा मानला जाईल, यात शंका नाही. भाजपच्या दृष्टीने पश्चिम बंगालला अनन्यसाधारण महत्व होते. गेले दोन वर्षे भाजपने तेथे सारे लक्ष केंद्रीत केले होते. कैलास विजवर्गीयसारखा नेता तेथे ठाण मांडून बसला होता. कोणत्याही परिस्थीतीत यंदा प. बंगालवर भगवा फडकवायचाच असा भाजपने चंग बांधला होता. त्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद कशातही काही कमी पडू न देण्याचे धोऱण अमित शहा यांनी राबविले होते.

मोदी विरुद्ध ममता अशी होती लढत

ममतादीदींवर बंगाली जनतेचे निस्सीम प्रेम आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत तृणमुलमध्ये त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज होते. ही नाराजीची फट शोधून काढत भाजपने तृणमुल कॉंग्रेसच्या बहुतांश महत्वाच्या नेत्यांना फोडण्यात यश मिळवले होते. त्यामुळे ममतादिदींपुढे कडवे आव्हान निर्माण झाले होते. 
देशात सध्या सर्वांत प्रभावशाली व सर्वांत लोकप्रिय नेते म्हणून पंतप्रधान मोदी यांचेच नावे घेतले जाते. त्यांच्या आसपास कोणी पोहचू शकत नाही. अशा मोदींजींनी राज्यात एक दोन नव्हे तर तब्बल २३ जाहीर सभा घेतल्या होत्या. त्या सभांत ओ दिदी, ओ दिदी, असा पुकारा करत एक प्रकार ममतांची हेटाळणी करत होते. त्यांच्या घोषणेला श्रोत्यांतील काही जणांचा प्रतिसाद मिळत होता. पण अनेक जण बंगाली महिला नेत्याबद्दल अशी भाषा वापरली जात आहे, याची नोंदही घेत होते आणि त्याचेच पडसाद निकालात दिसत आहेत.

भाजपचा अपेक्षाभंग

अर्थात इतके सारे करूनही भाजपला शंभरचा आकडाही गाठता आलेला नाही. भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुळचे बंगालचेच. कोलकता येथून त्यांनी निवडणूकही लढली होती. बंगालमध्ये विजय मिळवून त्यांच्या स्मृतींना सादर करण्याचा भाजप नेत्यांची इच्छा यावेळीही फलद्रूप झालेली नाही. अर्थात भाजपने डावे पक्ष व कॉंग्रेसचा सुफडा साफ करून तीनवरून जी झेप घेतली आहे ती जरी कौतुकास्पद असली तरी निवडणुकीत `जो जिता वही सिंकदर` असतो. त्यामुळे ममतादीदींच्या विजयाचे महत्व आजिबात कमी होत नाही.

का जिंकल्या ममतादीदी?

यावेळची निवडणूक ममतादीदींची परिस्थीती करो या मरो सारखी होती. पंतप्रधानांसह भाजपचे आख्खे केंद्रीय मंत्रीमंडळ त्यांच्यावर चालून आले होते. भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीपासून जय श्रीरामचा नारा देत हिंदू ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु केला होता. ममतादीदी मुस्लिमांचे तुष्टीकरण करतात असा भाजपचा जाहीर आरोप होता. त्याचप्रमाणे भाजपने राज्यात प्रथमच जातीय समीकरणांचा वापर केला होता. भाजपच्या या सर्व चालींना ममतादीदींनी प्रतिचाली रचून मात केली.

मुळात पश्चिम बंगालमध्ये देशात सर्वांधिक मुस्लीम मतदार राहतात. त्यामुळे त्यांना दुखवून ममतादीदींनी चालणार नव्हते. त्यांची मते एकगठ्ठा पाठिशी राहण्यासाठी त्यांनी `जय श्रीराम`ला मुद्दाम विरोध केला. याचा त्यांना फायदा झाला. हिंदूंना सुखावण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच स्वतःच्या जातीचा वापर केला. मी स्वतः शांडिल्य ब्राम्हण आहे, मी रोजच चंडीपाठ म्हणते. मला भाजपकडून हिंदुत्व शिकायची गरज नाही, असे जाहीरपणे सभातून सांगत त्यांनी भाजपच्या हिंदू कार्डमधील हवा काढून घेतली. यामुळे मुस्लीमांप्रमाणेच त्यांची हिंदू व्होट बॅंकही शाबूत राहिली.

हिंदुत्वापेक्षा बंगाली अस्मिता भारी

बंगाली माणसाला हिंदुत्वापेक्षा बंगाली अस्मिता भारी वाटते हे दीदींना चांगले ठावूक होते. त्यामुळे त्यांनी मतदारांच्या बंगाली अस्मितेला फुंकर घालत साद घातली. बंगालच्या एकाकी बेटीला बाहेरचे सारे एकत्र येवून विरोध करत आहेत हा त्यांचा आरोप मतदारांना भावला. त्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची सुप्त लाट निर्माण झाली. विशेषतः एका महिलेला सारे एकटे पाडत असल्याची भावना निर्माण झाली. त्याचा कोणालाच आदमास आला नाही. मतदानयंत्रातून ती व्यक्त झाली. प्रचाराच्या सुरुवातीलाच नंदीग्राममध्ये त्यांच्यावर कथित हल्ला झाला. कांगावा करण्यात व त्याचे भांडवल करण्यात दीदींचा हात कोणी धरू शकत नाही. या हल्ल्याचा त्यांनी पुरता राजकीय फायदा उठवला. शेवटपर्यत त्यांनी व्हील चेअरवरून प्रचार केला. याला अफाट प्रतिसाद मिळाला. मोदींनी तर दीदी ओ दीदी अशी चेष्टामस्करी केली. त्याचा फार मोठा फटका भाजपला बसला. प्रामुख्याने महिला वर्ग दीदींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. जातीचे राजकारण फारसे चालले नाही.

भाजपचा सारा जोर जातीय राजकारणावर असतो. अमित शहा याबाबतीच सर्वच नेत्यांपेक्षा फार पुढे आहेत. त्यांच्याकडे त्या त्या राज्यातील जातीनिहाय इत्यंभूत आकडेवारी असते. त्या जोरावर भाजप उमेदवार देते. देशात आतापर्यंत याला फार यशही मिळाले आहे. पण बंगाल तुलनेने पुरोगामी आहे. या राज्यात डाव्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणा झाल्या आहेत. त्याचा फायदा सर्वच जातींना झाला आहे. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे जातीनिहाय मतदान बंगालमध्ये फारसे होत नाही. यंदाही त्याचेच प्रत्यंतर आले.

अफाट लोकप्रियता पडली भारी

अन्य राजकारणी आणि ममतादीदी यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. दहा वर्षे मुख्यमंत्री राहूनही त्या साधी सुती साडी व पायात स्लीपर घालतात. त्यामुळे त्यांची नाळ सर्वसामान्यांशी पटकन जुळते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप आतापर्यंत झालेले नाहीत. त्यांच्या पक्षातील अनेक नेते चिटफंडात अडकले. पण दीदींवर आरोप झाले नाहीत. ही स्वच्छ प्रतिमा त्यांना यावेळी कामी आली. भाजपला त्यांच्यावर वैयक्तिक आरोप फारसे करता आले नाहीत. शिवाय राज्यांत गेल्या ५० वर्षांत ज्योती बसू यांच्यानंतर त्यांच्याइतकी लोकप्रियता कोणाला लाभलेली नाही. त्याचा प्रत्यय मी स्वतः दहा वर्षांपूर्वी निवडणूक कव्हरेज करताना घेताल होता. ही लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांची लोकप्रियता भाजपवर भारी पडली आहे. ममता, मुस्लीम, महिला या तीन एम फॅक्टरनी बंगालची निवडणूक खिशात टाकली हे मात्र खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com