अॅड. असीम सरोदे म्हणतात...राणेंना जामीन द्यायला हवा होता! 

ज्या वक्तव्याच्या आधारे व ज्या कलमांच्या खाली राणेंना अटक झाली त्यानुसार विचार केल्यास राणेंना जामीन द्यायला पाहिजे होता, असे सरोदे म्हणाले.
Narayan Rane should have been granted bail says Adv Asim Sarode
Narayan Rane should have been granted bail says Adv Asim Sarode

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर पोलिसांनी अखेर राणेंना अटक केली आहे. त्यावर विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयानं राणेंना जामीन द्यायला हवा होता, असं म्हटलं आहे. (Narayan Rane should have been granted bail says Adv Asim Sarode)

सरोदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांची भूमिका, न्यायालायनं फेटाळलेला जामीन, राणेंना अटक झाल्यास पोलिसांनी घ्यायची दक्षता आदी मुद्यांवर आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची विनंती जरी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असेल तरीही जेव्हा या प्रकरणी युक्तिवाद होईल तेव्हा नारायण राणेंना जामीन नक्की मिळेल.

ज्या वक्तव्याच्या आधारे व ज्या कलमांच्या खाली राणेंना अटक झाली त्यानुसार विचार केल्यास राणेंना जामीन द्यायला पाहिजे होता, असे मला वाटते पण रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. गुन्ह्याची खोली (gravity of offence) विचारात घेऊन उच्च न्यायालय नारायण राणेंना काही विशिष्ट अटी व शर्तींच्या आधारे नक्कीच जामीन मान्य करेल. त्यामुळे आज ना उद्या नारायण राणेंना नक्कीच जामीन होईल, असं सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. 

एक माजी मुख्यमंत्री व आताचे केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंना अटक केल्यावर सुद्धा पोलिसांनी मानवी सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांना इतर सामान्य नागरिकांसारखीच वागणूक पोलीस कोठडीत मिळणार असेल तरीही पोलीसांनी त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण करावे, सरोदे यांनी नमूद केलं आहे. 

या प्रकरणाचे ज्या पद्धतीने राजकारण झाले आहे आणि होणार आहे त्याचा अंदाज जर पोलिसांना आला असेल तर नारायण राणे यांना जर पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस लॉक अप मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना CCTV देखरेख असलेल्या ठिकाणी ठेवावे आणि सगळे CCTV फुटेज नंतर त्यांना कॉपी करून घ्यावे. नाहीतर त्यांना त्यांच्या घरातच हाऊस अरेस्ट करावे व त्यासाठी त्यांना तशी पूर्ण कल्पना द्यावी, असे सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

नारायण राणे यांना जर पोलिसांनी ताब्यात घेण्याचे ठरविले तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे डॉक्युमेंटेंशन करावे, व्हिडीओ डॉक्युमेंटेंशन करावे. अशा गोष्टींचा पोलिसांना पुढे उपयोग होईल आणि अशा प्रकरणी होऊ शकणारे राजकारण टाळता येईल. या प्रकरणी सध्या नारायण राणे आहेत पण त्यांच्याजागी सर्वपक्षीय अनेक नेते असू शकतात इतकी असभ्य नेत्यांची संख्या आहे. त्यामुळे नागरिकांच्यासाठी मुख्य मुद्दा हाच असला पाहिजे की आम्हाला जबाबदारीने बोलणारे, अभ्यासू, सभ्यतेचे नियम पाळणारे, नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे व स्वतःला केवळ सामान्य लोकप्रतिनिधी समजणारे विनम्र नेतेच हवेत, असंही सरोदे यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com