नगरला अद्यापही रेमडेसिव्हीर मिळेना ! नेते, अधिकाऱ्यांची अशीही हुलकावणी

माझ्या चिमुरड्यांना सावली कोण देणार, त्यांचं शिक्षण कसं होणार...' असं बरंच काही सांगून हुंदके देतोय... नातेवाईक हे मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकूण भांबावलेत, डोकं गरगरलंय. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार सगळ्यांना फोन केले. पण... पण उपयोग नाहीच...
remdishivir.jpg
remdishivir.jpg

नगर : तो अजून बोलतोय... मला वाचवा-वाचवा म्हणतोय... नातेवाईकांशी अखेरचे दोन शब्द बोलतोय... "माझ्या चिमुरड्यांना सावली कोण देणार, त्यांचं शिक्षण कसं होणार...' असं बरंच काही सांगून हुंदके देतोय... नातेवाईक हे मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकूण भांबावलेत, डोकं गरगरलंय. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार सगळ्यांना फोन केले. पण... पण उपयोग नाहीच... ! 

अधिकारी म्हणतात, "प्रशासनाने जाहीर केलेल्या ई-मेलवर रेमडेसिव्हिरची नोंदणी करा. आम्ही मागणी नोंदवतो. उपलब्ध झाल्यावर मिळेल इंजेक्‍शन. ऑक्‍सिजनचीही मागणी केलीय. लवरकच मिळेल.' 

काही लोकप्रतिनिधी तर "एसएमएस नेते' बनलेत. फोन केल्यास उचलत नाहीत. स्वीय सहायकाला फोन केल्यास, "साहेब बिझी आहेत, तुमचं काही काम असेल, तर त्यांना एसएमएस करा. ते उत्तर देतील,' असं सांगतात. त्या लोकप्रतिनिधींचा फोनही येत नाही अन्‌ एसएमएसला उत्तरही नाही. अर्थात काही लोकप्रतिनिधी कोरोना रुग्णाला कोविड सेंटरमध्ये जाऊन भेटतात. त्यांची विचारपूस करतात, हा अपवाद म्हणावा लागेल. 

कोरोना रुग्ण अखेरीची घटका मोजतोय. मात्र अधिकारी-पदाधिकारी तोंड दडवून बसलेत. एक-एक क्षण मोजणारे रुग्ण ई-मेलवर इंजेक्‍शनची मागणी नोंदवून कसा दम काढतील. लोकप्रतिनीधींचा "एसएमएस' रुग्ण मेल्यानंतर येणार का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. हा अनुभव जिल्ह्यातील बहुतेकांना येत आहे. 

नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख खाली येईना. रोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडतेय. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख 42 हजार 153 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक हजार 635 रुग्णांनी मृत्यूला कवटाळले. ही झाली सरकारी आकडेवारी. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी भयान परिस्थिती आहे. नगरच्या अमरधाममध्ये रोज 30 ते 40 जणांवर अंत्यसंस्कार होतात, हे कशाचे प्रतीक आहे. स्मशानभूमी अपुरी पडलीय. इतर दोन ठिकाणी विद्युत दाहिनी उभारण्याची तयारी झाली आहे. माणसं जगविण्यापेक्षा त्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी करण्याची नामुष्की यावी, यापेक्षा दुर्दैव कोणते. काल रंगलेले ऑक्‍सिजननाट्य तर नगरच्या इतिहासात नोंदविले जाईल. नगर जिल्ह्याच्या कपाळावर पुढे काय लिहून ठेवले, हे सर्वांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. 

महापालिकेचे पाणीपुरवठा, सफाई कर्मचारी "फ्रंटलाईन कर्मचारी" म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर प्राधान्याने उपचार व्हावेत, असे संकेत आहेत; परंतु काल पाणीपुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याने रेमडेसिव्हिरअभावी तडफडून जीव सोडला. अजून दोन अत्यवस्थ आहेत.

कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी त्यासाठी जीवाचे रान केले. जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी सर्वांना फोन लावले. त्यांना उत्तरेही अनपेक्षित मिळाली. उत्तरांची, आश्‍वासनांची खैरात झाली. पण... पण रेमडेसिव्हिर मिळालेच नाही. अखेर त्याला जीव गमवावा लागला. हे पाप अधिकारी-पदाधिकारी कुठे फेडणार, हाच मोठा प्रश्‍न आहे. 

जिल्ह्यातील एका मंत्र्याचे बंधूही कोरोनामुळे नगरमध्येच एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनाही रेमडेसिव्हिर मिळाले नाही. अखेर त्यांना मुंबई किंवा पुण्याला हलविल्याचे समजले. रुग्णालयाच्या प्रशासनाने वास्तव मंत्र्यांसमोर मांडले, तेव्हा मंत्र्यांचे खाडकन डोळे उघडले; परंतु रेमडेसिव्हिर त्यांना मिळू शकले नाही. त्याच रुग्णालयात एका तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याला रेमडेसिव्हिर मिळेना. दहा दिवसांपासून संबंधित अधिकारी रुग्णालयात एक-एक दिवस मोजत आहे.

प्रशासन, राजकीय नेत्यांकडे विनंत्या करूनही त्यांना इंजेक्‍शन मिळू शकले नाही. ही बड्या लोकांची स्थिती, तर सर्वसामान्य तर पालापाचोळाच. केव्हा उडून जातो, ते कुणालाच कळत नाही. अश्‍वत्थाम्याने म्हटले आहे, "मृत्यू माणसाचा मित्र असतो,' हेच सत्य स्वीकारून लोकांनी ऑक्‍सिजन अन्‌ रेमडेसिव्हिर अभावी मृत्यूला मित्र म्हणावे का? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com