फकीर योद्‌ध्याला सलाम ! 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनाला खूप वेदना दिल्या आहेत. कितीतरी माणसं आपल्यातून चालताबोलता जग सोडून गेली.
Lanke and pawar.jpg
Lanke and pawar.jpg

नगर : आमदार नीलेश लंकेंचे काम पाहताना आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांना आर. आर. आबांची आठवण यावी, त्यांनी पाठ थोपटावी, गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत, यापेक्षा लंके यांना मोठी पोचपावती कोणती मिळू शकते? कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी योद्धा बनून लढत आहात. तुमच्या कार्याला सलाम ! (Salute to the fakir warrior!)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनाला खूप वेदना दिल्या आहेत. कितीतरी माणसं आपल्यातून चालताबोलता जग सोडून गेली. घरातील कर्ता माणूस जेव्हा जगाचा निरोप घेतो, तेव्हा त्या कुटुंबावर आभाळ कोसळतं. आपला माणूस तर निघून गेलाय, आता पुढे कसं होणार, या चिंतेत आज हजारो कुटुंबे असतील. 
कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात भरायला पतीच्या उपचाराचे पैसे नव्हते म्हणून पत्नीने मंगळसूत्र विकले. त्यातूनही बिलाची रक्कम भरता आली नाही म्हणून नगरमधीलच एका रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. 

यापेक्षाही भयावह परिस्थिती आज प्रत्येक तालुक्‍यात दिसून येत आहे. कोरोनाने गंभीर झालेल्या रुग्णाचे उपचार करताना पदरमोड करून पैसे पुरत नाहीत. पैपाहुणे, गणगोताकडे हात पसरून पैसा गोळा केला जातो. आयुष्यभराची जी काही पुंजी आहे, ती आपला माणूस जगविण्यासाठी खर्ची केली जात आहे. माणसे संकटात सैरभैर झाली आहेत. त्यांनी जगायचं तरी कसं, हा प्रश्‍न आहे. संकटाच्या काळात मृताच्या टाळूवरील लोणी खाणारे महाभागही काही कमी नाहीत. आता वेळ आली आहे ती कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची.

हेही वाचा..

आमदार, खासदार, सामाजिक संघटना आपल्या परीने काम करीत आहेतच; परंतु या संकटात पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी नगर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत खऱ्या अर्थाने अंजन घातले आहे. 

लंके गोरगरिबांसाठी जिवाची बाजी लावण्यास तयार झाले आहेत. आपण आमदार आहोत, हे त्यांनी मुळात डोक्‍यातून काढून टाकलेले दिसते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांसाठी ते प्राणपणाने लढताना दिसत आहेत. त्यांचे वेगळेपण म्हणजे ते कोरोना सेंटरमध्ये राहतात. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "मला भीतीबीती काही नाही. भीती कोणाला असते? माझ्या कारखान्याचं काय व्हायचं, शिक्षण संस्थेचं काय व्हायचं, माझ्या पोराबाळांचं काय व्हायचं, असा विचार करणाऱ्यांना. माझ्याकडे भीती नाही. नीलेश लंके फकीर आहे ना? माझी ना शिक्षण संस्था, ना सोसायटी. माझं काही बरंवाईट झालं तरी माझं काही नुकसान नाही. पण मी गरिबांची सेवा करणार. लोकांचे जीव वाचविणार.' खरंतर त्यांची प्रतिक्रिया पाहताना मन भरून आलं. प्रत्येकाला मदत कशी मिळेल, हे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारा त्यांच्यासारखा लोकप्रतिनिधी म्हणून आगळावेगळाच म्हणावा लागेल. 

खरं तर नीलेश लंकेंना जनसेवेसाठी दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना लोक करीत आहेत. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेनं त्यांचं कार्य सुरू आहे. कोरोना संकटात माणसानं माणसाच्या जवळ जाऊ नये, हा नियम बनला आहे. पण, हा माणूस सतत माणसांबरोबर आहे. प्रत्येक कोरोना रुग्णाला कोणती मदत करता येईल, यासाठी धडपडत आहे. समाज कधीच अशा गोष्टींसाठी हात आखडता घेत नाही, हे पुन्हा दिसून आले आहे. 

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आपल्यात नाहीत; पण त्यांची आठवणही येतच असते. काल पारनेरमध्ये लंके यांनी सुरू केलेल्या कोरोना सेंटरला भेट दिल्यानंतर पोपटराव पवार यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांचं राजकारणही असंच राहिलं. त्यांनी रंजल्यागांजलेल्यांना कशी मदत मिळेल हे पाहिले. गडचिरोली असो किंवा तासगाव- कवठेमहांकाळ; त्यांनी गरिबांवर उपचार करण्यासाठी नेहमीच शर्थीचे प्रयत्न केले. अशा कितीतरी रुग्णांना मुंबईत नेऊन त्यांच्यावर उपचार केले; पण त्याचं राजकारणासाठी भांडवल कधी केलं नाही. कोणत्याही खात्याचा मंत्री असो; त्यांनी शेतकरी, कष्टकरी, गरीब माणूस हा आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला. 

लंकेंचे काम पाहताना पोपटराव पवार यांना आबांची आठवण यावी, त्यांनी पाठ थोपटावी. गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत, यापेक्षा आमदार नीलेश लंके यांना मोठी पोचपावती कोणती मिळू शकते? लंकेसाहेब, आपण लोकांसाठी योद्धा बनून लढत आहात. तुमच्या कार्याला सलाम ! 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com