"माणसं जळतायंत' हे उघड्या डोळ्यांना दिसत नाही ?  - Can't open eyes see "People are burning"? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

"माणसं जळतायंत' हे उघड्या डोळ्यांना दिसत नाही ? 

प्रकाश पाटील
सोमवार, 19 एप्रिल 2021

मास्क लावणे इतक्‍याही सोप्या गोष्टी आपण करू शकत नाही का ? कधी स्वयंशिस्त पाळणार ! माणसं दररोज जळतायंत हे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही का ? 

नगर : कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. मात्र कोरोनाचे संकट लोक खूप गांभीर्याने घेताना दिसत नाहीत, याचे सर्वाधिक दु:ख वाटते. नगर जिल्ह्याचा विचार करता, गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज पाचपन्नास कोरोना रुग्णांचा बळी जाताना दिसतोय. स्मशानभूमीत शरीरं जाळण्यासाठी रांगा लागल्या आहेत. विद्युत दाहिनी कमी पडू लागलीय. त्यामुळे खुल्या जागेत मृतदेह जाळण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

स्मशानातील कर्मचारी थकले 

नगरच्या स्मशानभूमीतील कर्मचारी अंत्यसंस्कार करून पार थकून गेलेत. असे चित्र नगरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही, असे ज्येष्ठ सांगतात. कोरोनाला इतक्‍या सहजतेने कसे काय घेतले जात आहे, हे कळण्यास मार्ग नाही. केवळ नगरच नव्हे तर राज्यातील कोणताही जिल्हा घ्या माणसं उपचारासाठी कशी तडफडत आहेत, याचा अनुभव आपण घेत आहोत. ज्या अंत्यसंस्कारासाठी दोन-तीनशे लोक स्मशानभूमीत जमत असत, तेथे आज हातगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ माणसावर आली. आक्रोश सुरू आहे. प्रशासन हतबल आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाहीत, बेड नाहीत. उपचारासाठी पैसे नाहीत. कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत चार-पाच लाखांच्या घरात खर्च जातो. जर निरोप घेतला, तर पैसेही जातात. 

संयम ठेवला पाहिजे 

कोरोना संकटाचं वादळ घोंघावत आले आहे. रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे ऑक्‍सिजन कमी पडत आहे. रेमडेसिव्हिरसाठी हात जोडावे लागत आहेत. उपचार सुरू रुग्ण निरोप घेताहेत. अशाच एका रुग्णाच्या नातेवाईकांनी एका कोविड सेंटरवर हल्ला केला. संताप व्यक्त केला. जवळची माणसं अशी निघून जात असल्याचे दु:ख समजण्यासारखे आहे. पण, कोरोनाच्या संकटात डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांनाही आपण समजून घेतले पाहिजे. 

जनता कर्फ्यूचे स्वागत 

कोरोना इतका क्रूर आहे की त्याला फक्त माणसाचे जीव हवेत. आपला जीव त्याला घेऊ द्यायचा नसेल, तर आपण आपले संरक्षण करायला नको का! मायबाप सरकारने पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लागू केला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता कर्फ्यूबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत आहे. खरंतर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. तरीही "देरसे आये, दुरुस्त आये,' असे म्हणावे लागेल. आपण अत्यावश्‍यक सेवा समजू शकतो. पण कारण नसताना लोक रस्त्यावर का मोकाट हिंडत होते ? 

"लकडीशिवाय मकडी वठणीवर येत नाही' 

लोकहो, दुसऱ्या लाटेचे संकट मोठे आहे. मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, डॉक्‍टर, सामाजिक संघटना कळकळीचे आवाहन करूनही आपण का सुधारत नाहीत. पोलिसांनी जर काठीचा प्रसाद द्यायला सुरवात केली, गुन्हे दाखल केले त्यानंतरच आपले डोळे उघाडणार का ? आपल्याकडे म्हण आहे, "लकडीशिवाय मकडी वठणीवर येत नाही.' घरात बसण्यासाठी पोलिसांनी लकडी उचलावी का ? जनता कर्फ्यूच हवा का ? आपण एक जबाबदार नागरिक आहोत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरात बसणे, आवश्‍यक कामासाठीच बाहेर पडणे, मास्क लावणे इतक्‍याही सोप्या गोष्टी आपण करू शकत नाही का ? कधी स्वयंशिस्त पाळणार ! माणसं दररोज जळतायंत हे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही का ? 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख