कॉंग्रेसवाल्यानो आधी 'आपलं घर' ठीक करा मग,अमित शहांच्या नावाने बोंब मारा !

देशात अनेक राज्यांत आज भाजपची तर काही राज्यांत कॉंग्रेस आणि इतर पक्षांची सरकारे आहेत. विरोधीपक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे कटकारस्थान अर्थात केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप हा तर नेहमीच असतो. मुळात आज कॉंग्रेस जो आरोप करीत आहे. तोच आरोप एकेकाळी भाजप, जनता दल, डावे किंवा कॉंग्रेसला विरोध करणारे पक्ष करीत असत. म्हणजेच जो पक्ष केंद्रात सत्तेवर असतो. त्या पक्षाला घोडेबाजार हा शब्द चिकटविला जातो. हे काही आता नवे राहिले नाही.
Congress Blaming Amit Shah for Political Developments in Rajashthan
Congress Blaming Amit Shah for Political Developments in Rajashthan

राजस्थानात राजकीय भूकंप घडल्यानंतर पुन्हा एकदा 'घोडेबाजार' या शब्दाला महत्त्व आले आहे. सचिन पायलटांच्या बंडानंतर मुख्यमंत्री गेहलोतापासून रणदीप सुरजेवाला, राजीव सातव यांच्यापर्यंत कॉंग्रेसचे नेते भाजपवर घोडेबाजारचा आरोप करीत आहेत. आमच्या आमदारांना प्रत्येकी वीस-वीस कोटींची ऑफर दिल्याचा आरोपही केला जात आहे. म्हणजे दिल्लीतील भाजपचे नेते विशेषत: गृहमंत्री अमित शहा हेच या घडामोडीमागचे खरे सूत्रधार असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.

कुठून आला घोडेबाजार !

घोडेबाजाराविषयी कथा आणि व्याख्या आहे. केंब्रिज डिक्‍शनरीतही त्याचा अर्थ सांगितला आहे. तर अमेरिकेत आणि परदेशातही त्याचे वेगवेगळे अर्थ सांगितलेत. मात्र भारतात नेहमी याविषयी एक कथा सांगितली जाते की, राजांसाठी भारतातील व्यापारी घोडे खरेदी करण्यासाठी अरब देशांत जायचे. इतक्‍या लांबचा प्रवास करणे सोप नसायचे. समजा एखाद्या व्यापाऱ्याने शंभर घोडे खरेदी केले की त्यापैकी येताना दहा वीस घोडे रस्त्यात मरत असत. त्याचा पुरावा काय द्यायचा तर मेलेल्या घोड्यांचे शेपूट कापून ते राजाला दाखविले जात असे. पुढे यात चलाखी होऊ लागली. व्यापारी ८०-९० च घोडे खरेदी करू लागले आणि अरब देशात मेलेल्या घोड्याच्या दहा-वीस शेपट्या आणून तो पुरावा म्हणून देऊ लागले. म्हणजे खोटे काम करू लागले. हा खोटेपणा भारतीय राजकारणात पुढे आला. अर्थात ही कथा आहे घोडेबाजाराची. हा शब्द आज राजकारणाला चिकटला आहे.

देशात पक्षांतर कायद्यात बदल करण्यात आला. त्यामुळे फोडाफोडी करताना मोठा प्रश्‍न निर्माण होऊ लागला. विधानसभा असो की लोकसभा कोणत्याही पक्षाला जर बहुमत मिळू शकले नाही. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर इतर पक्षांची जुळवाजुळव करून 'मॅजिक फिगर' गाठण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वात मोठा पक्ष म्हणजे ज्या पक्षाला अधिक जागा मिळालेल्या असतात. तो पक्ष इतर छोटे छोटे पक्ष किंवा प्रतिस्पर्धी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत असतो. पक्षांतर करायचे असेल आणि निवडणूक लढवायची नसेल तर दोन तृतींयांश आमदार पक्षाबाहेर पडावे लागतात. तरच त्या गटाला मान्यता मिळते. अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागले. अशा आमदारांची फोडाफोडी करताना त्याला आमिष दाखविले जाते. कोट्यवधीची ऑफर दिली जाते. मन वळविले जाते.

प्रत्येकाला मंत्री बनायचे असते. जे छोटे पक्ष असतात त्यांना काही अडचण येत नाही. असे पक्ष सत्ताधाऱ्याला पाठिंबा देतात आणि त्या बदल्यात काही तरी पदरात पाडून घेतात. हे आता चालत आले आहे. एकमात्र खरे की ज्या राज्यातील सरकार अस्थिर होते तेथे मात्र घोडेबाजारची चर्चा अधिक होत असते. प्रत्येक नेत्याच्या मुखात तो असतोच.

पंतप्रधान मोदींची पकड

केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे आणि त्यांची पक्षावर मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील कोणत्याही खासदार किंवा आमदारांची फुटण्याची हिम्मत होत नाही. 2014 नंतर देशात मोदी पर्वाला सुरवात झाली आणि कॉंग्रेस अधिक खिळखिळी होऊ लागली. कधी नव्हे इतका पालापाचोळा या पक्षाचा झाला. कॉंग्रेसच्या हातातून एक एक राज्य निसटू लागले. जो पक्ष बहुमताने केंद्रात होता त्या पक्षाला विरोधीपक्षनेतेपदही मिळू शकले नाही. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जी राज्ये ओळखली जात होती. ती राज्ये आज एकतर भाजपच्या ताब्यात आहेत किंवा तेथे विरोधकांची सरकारे आहेत.

राहुल गांधी टीमला यश

२०१८ मध्ये देशात मोदी सरकारच्याविरोधात जनमत वळविण्यात राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला यश आले होते. छत्तीसगड,राजस्थानमध्ये बहुमत मिळाले होते तर मध्यप्रदेशमध्ये काठावर पास झाले होते. त्यापूर्वी कर्नाटकात कॉंग्रेससह तीनचार पक्ष मिळून कुमारस्वामींचे सरकार बनले. काही महिने हे सरकार तरले पण, शेवटी कॉंग्रेसचेच आमदार फुटले. त्यांनी राजीनामा दिला. पुढे भाजपत प्रवेश केला. भाजपचे येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले. तेच मध्यप्रदेशात घडले. तेथेही कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे फुटले. त्यांनी आपल्या २४ आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला. अल्पमतात आलेले कॉंग्रेसचे सरकार कोसळले.

सिब्बलांना गांभीर्याने घेत नाहीत

राजस्थानात कॉंग्रेसचेच उपमुख्यमंत्री सचिन पायलटांनी बंड केले आणि घोडेबाजाराचा आरोप सुरू झाला. या बंडामागे भाजप आणि अमित शहाच असल्याचा आरोप गेहलोत, रणदीप सुरजेवाला, राजीव सातव आदी मंडळी करीत आहेत. एकीकडे हे घोडेबाजारची चिंता करीत असताना त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल मात्र घोड्याचे उदाहरण देऊन कॉंग्रेसविषयी चिंता व्यक्त करीत आहेत. ही चिंता भाजपवर आरोप करणारे लक्षात घेत नाही. सिब्बल म्हणाले, की तबेल्यातून एक एक घोडे पळून जावू लागले तर तबेला एक दिवस रिकामा होईल. म्हणजे आपली माणसं सांभाळून ठेवण्याची जबाबदारी कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्यांची आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

घोडेबाजाराचा मुद्दा उपस्थित करून भाजपवर आरोप करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांची तर कीव करावीशी वाटते. मुद्दा येथे असा आहे की कॉंग्रेसचे घरच जर ठीकठाक नाही. घरातील मंडळींमध्ये एकजूट नाही. मतभेद, मनभेद आहेत तर लोकांच्या नावाने कडाकडा बोटं मोडून काय फायदा. समजा आपण एकवेळ असे म्हणू की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवित आहे. पण, कॉंग्रेसचे आमदार का लाचार आहेत. ते का गळाला लागत आहेत. त्यांचे पक्षावर इतके प्रेम आणि निष्ठा आहे तर भाजपच्या आमिषाला का बळी पडत आहेत. आपलेच नाणे खोटे असताना लोकांना दोष देण्यात तरी काय अर्थ !

कॉंग्रेसने नऊ राज्ये बरखास्त केली

दुसरे असेही समजा की केंद्रात भाजप आहे. ते सत्तेसाठी हे सर्व करीत असतील तर ते का नाही करणार ? शेवटी ते राजकारणात आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, की आम्ही राजकारणात आहोत म्हणजे आम्ही संन्यासी नाही. आम्हीही राजकारण करणारच. याचाच अर्थ विशेषत: कॉंग्रेसवाल्यांनी समजून घायला हवा. यापूर्वी देशात कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती त्यावेळी ज्या राज्यात विरोधीपक्षाचे सरकारे होती त्यावेळी कॉंग्रेसच्या तत्कालिन नेतृत्वाने काय केले होते ? महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारसह प्रकाशसिंग बादल (पंजाब), रामसुंदर दास (बिहार), बाबूभाई पटेल (गुजरात), सुंदरलाल पटवा (मध्यप्रदेश), भैरवसिंह शेखावत (राजस्थान), निलमनी रॉट्रे (ओरिसा), बनारसी दास (यूपी), एम.जी. रामचंद्रन (तमिळनाडू) ही सरकारे कोणी खाली खेचली होती. ती का पाडली होती याचा इतिहास आज उगळण्यात अर्थ नाही. पण, केंद्रात ज्याची सत्ता असते. तो पक्ष प्रत्येक राज्यात आपले सरकार असावे असा विचार करतो. त्यातूनच फोडाफोडी होते. याचा अर्थ भाजप धुतल्या तांदळासारखा आहे असे समजण्याचे मुळी कारण नाही.

आजतर सत्ता मिळवायची म्हटले की एकतर बहुमत हवे नाहीतर आघाडी सरकार करावे लागते. महाराष्ट्रातही तीन पक्षाचे सरकार आहे. हे सरकारही अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप या सरकारचे नेते करीत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दररोज तेच सांगतात की, आम्ही कधीही हे सरकार पाडू शकतो. पण, आम्ही ते पाडणार नाही. हे सरकार आपल्या कर्मानेच कोसळेल म्हणून. जर हे सरकार कोसळले तर कुठला तरी एक पक्ष भाजपला पाठिंबा देऊ शकतो. जो पक्ष सत्तेवर जाणार नाही तो घोडेबाजारचा आरोप करेल म्हणजे करेल.

कॉंग्रेसने आपलं घर सांभाळावं

हे सर्व सांगण्याचे कारण असे की राजस्थानच्या मुद्दयावरून कॉंग्रेस नेत्यांनी भाजला लक्ष्य करताना घोडेबाजारचा आरोप चालवला आहे त्याचे लोकांना काही देणंघेणं नाही. या घोडेबाजारात लोकांना काय फायदा होणार आहे. मात्र ज्या कॉंग्रेसने आजपर्यंत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळविली. त्यांनी सुसंस्कृत आणि नितीमत्तेचा आव आणू नये. कॉंग्रेसने विरोधीपक्षांची सरकारे कशी पाडली याची उदाहरणे वर दिली आहेत. काही राज्यात राष्ट्रपती राजवट कशा लागल्या होत्या याची यादी वाचायची म्हटली तर ती लांबत जाईल. म्हणूनच कॉंग्रेसने आपले आमदार, नेते सांभाळले पाहिजेत. ते का फुटतात. ते का पक्ष सोडतात ? याचा विचार करायला हवा ! सत्ता गेली तरी चालेल ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली ते बरेच झाले. काही असले तरी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com